नुकसान भरपाईसाठी पीक नुकसानीची माहिती
विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळवावी
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानहोण्याची शक्यता आहे.नुकसान झालेल्या पिक विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत विविध माध्यमांद्वारे नुकसानीची पूर्वसुचना पिक विमा कंपनीस कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे तसेच पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे तसेच शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या पिकांमध्ये कापणी पासून 14 दिवसांपर्यंत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस ई. कारणामुळे नुकसान झाल्यास होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते.
सदस्थितीमध्ये Mid-Season Adversity साठी अधिसुचना काढलेली असताना देखील स्थानिक नैसर्गीक आपत्ती अंतर्गत व काढणी पश्चात नुकसान झाल्यास पूर्वसुचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदरील घटकाअंतर्गत नुकसान भरपाई मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती/पूर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पिक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop-Insurance (क्रॉप इन्शुरन्स) ॲप डाउनलोड करुन त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा टोल फ्री क्रमांक 18002337414 /180042533333 किंवा ई-मेल (pmfbypune@uiic.co.in / 230600@uiic.co.in ) द्वारे नुकसानीची पूर्वसुचना द्यावी.
काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पूर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी, कार्यालयास किंवा आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यकाकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment