Thursday, July 7, 2022

लेख

नांदेड जिल्ह्यात या कारणांमुळे

निर्माण होते पूर परिस्थिती  

मराठवाड्यातील गोदावरी सारख्या प्रमुख नदीसह पेनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मनार या नद्या पावसाळ्यात जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापून टाकतात. हमखास पर्जन्याच्या क्षेत्रात नांदेड जिल्हा येत असल्याने अपवाद वगळता बऱ्याच वेळा अतिवृष्टीने जिल्ह्यातील अनेक गावात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील जवळपास 337 गावे पूरप्रवण क्षेत्रात आहेत. याचबरोबर गोदावरीवर 7 ठिकाणी पूर नियंत्रणासाठीचे ठिकाणे मोडतात. 

गोदावरीतील पाणी वाढण्यासाठी हे आहेत प्रवाह

जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरीच्या पात्रातून ढालेगाव बंधारा, माजलगाव धरणातील पाणी सोडल्यास सिंधफना नदीद्वारे ते गोदावरी नदी पात्रात, मुळी बंधारा, दिग्रस बंधारा, दुधा नदीचे पाणी पुर्णा नदीच्या पात्रात, सिद्धेश्वर धरणाचे पाणी पुर्णा नदीच्या पात्राद्वारे एकत्रित गोदावरीच्या पात्रात येऊन मिळते. हे सर्व पाणी वरच्या बाजुला असलेल्या बंधाऱ्यातून सोडण्यात आले तर ते सर्व पाणी एकत्र होत गोदावरी पात्रातून विष्णुपुरी धरणात पोहचते. विष्णुपुरीच्या खालच्या बाजुला गोदावरी पात्रात धर्माबाद जवळ बांभळी बंधारा व पुढे पोचमाड धरणात हे पाणी टप्याटप्याने पोहचत जाते.    

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती समजून घेण्यासाठी गोदावरी नदी पात्रातील विविध बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ज्या-ज्या वेळेला मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होतो तेंव्हा स्वाभाविकच गोदावरी नदीच्या पात्रात पाणी वाढीस लागते. नाशिक परिसरात जेंव्हा जास्त पाऊस होतो तेंव्हा हे पाणी गोदावरी मार्गे जायकवाडीला येऊन मिळते. जायकवाडीचे पाणी सोडल्यानंतर ते सरळ नांदेड मार्गे पुढे पोचमपाड धरणापर्यंत सरकत जाते. पोचमपाड धरण भरल्यावर त्याचा फुगवटा स्वाभाविकच गोदावरीच्या पात्रात निर्माण होतो. तीच स्थिती बाभळी बंधाऱ्याची आहे. बाभळी बंधारा ते विष्णुपुरी प्रकल्प यातील अंतर गोदावरीच्या फुगवट्यामुळे अधिक बाधित होते. एका बाजुला विष्णुपुरीतून सोडलेले पाणी तर दुसऱ्या बाजुला खालचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा झालेला ठहराव अधिक काळजीचा होऊन जातो. 

प्रशासनाची ही आहे दक्षता

जिल्ह्यातील या नैसर्गिक स्थितीमुळे प्रशासन नेहमी पूर आणि आपत्कालीन परिस्थितीबाबत वेळोवेळी योग्य ती खबरदारी घेऊन असते. संभाव्य परिस्थितीतून सावरण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे याही वर्षी संपूर्ण आढावा घेऊन सुरक्षिततेचा व्यापक आराखडा तयार केलेला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वत: लक्ष ठेवून असून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन विभाग 24 तास सुरू करण्यात आला आहे. यासाठी तीन पाळ्यांमध्ये अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. आजच्या घडिला जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद बलाचे एक पथक तैनात आहे. जिल्हा प्रशासनाकडे एकुण 11 बोटी आहेत. 8 आसन क्षमता असलेल्या 8 बोटी रबर तर 3 बोटी या एचडीपीईच्या आहेत. प्रत्येक बोट लाईफ जॅकेटसह आवश्यक त्या सुरक्षा साहित्याने परिपूर्ण आहेत. 80 लाईफ जॅकेट, 80 लाईफ बॉय (गोल रिंग), स्वाकटर, टुलकिट, रेस्क्यू रोप आदी साहित्य आहे. 

पाच वर्षातील पर्जन्यमान

गत पाच वर्षाच्या पर्जन्यमानामध्ये 2020 वर्षाचा अपवाद वगळता दरवर्षी पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. एकुण वार्षिक सरासरी 891.30 मिमी एवढी आहे. सन 2017 मध्ये या सरासरीच्या तुलनेत 72 टक्के, सन 2018 मध्ये 87 टक्के, सन 2019 मध्ये 106 टक्के, 2020 मध्ये 103 टक्के तर गतवर्षी म्हणजेच 2021 मध्ये 138 टक्के एवढा पाऊस झाला. स्वाभाविकच एवढा पाऊस झाल्याने काही भागातील शेतीतील माती वाहून गेली. शासनाने सर्वत्र नदीच्या काठावर असलेल्या गावात, संबंधित ग्रामपंचायतींना, ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे. आजच्या घडीला पूराचे आव्हान जरी नसले तरी प्रशासन योग्य ती खबरादारी घेऊन आहे.

 -        विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...