Monday, April 11, 2022

गावाचा विकास साधायचा असेल तर

सरपंच हा कडक गुरूजीच हवा

-        माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- ग्राम विकासाची संकल्पना बाहेरचा कोणी व्यक्ती येऊन आपल्या गावात राबवेल ही धारणा चुकीची आहे. आपल्या गावात जे काही चांगले होते, जे काही वाईट होते ते गावातले लोकच करत असतात, ग्रामस्थच ठरवत असतात. चांगल्या गोष्टीची मेळ साधण्यासाठी व वाईट प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील सरपंच हा कडक गुरुजीच्याच भूमिकेत असला पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

 

आज होट्टल महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासमवेत ग्राम विकासाच्या दृष्टिने लोकप्रबोधन व्हावे यासाठी आवर्जून माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे भाषण ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

या समारोपात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने, देगलूरचे गटविकास अधिकारी मुक्कावार, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर यांची विशेष उपस्थिती होती.

 

जीवन जगण्यासाठी केवळ आहाराची आवश्यकता नसते तर त्याच्याबरोबर शुद्ध हवा ऑक्सिजनची तेवढीच गरज असते. याकडे आपण लक्ष दिले नाही. चांगले ऑक्सिजन झाडे देतात. यासाठी गावकऱ्यांनी झाडांची जोपासना केली पाहिजे. ही झाडे प्रत्येक ग्रामस्थांनी पुढे येऊन लावली पाहिजेत. ती जपली पाहिजेत. आमच्या गावात प्रत्येक प्रकारची फळ झाडे लावण्यावर आम्ही भर दिला. स्मशानभूमीत जांभळाची झाडे लावली, नारळाची झाडे लावली, सिताफळाची लावली. यात 60 क्विंटल जांभळे मिळाली, 20 लाखाची नारळ झाली. गावकऱ्यांना सीताफळ सारखा रानमेवा मिळाला. आरोग्यासाठी या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा झाला, असे सांगून त्यांनी फळझाडे लावण्यावर भर दयावा, असे आवाहन केले.

 

प्रत्येक ग्रामस्थांनी आपल्या ग्राम विकासाच्या आराखड्यात सहभाग घेतला पाहिजे. साध्या कचऱ्यापासून प्रत्येक गोष्टीची वर्गवारी ग्रामपंचायतला करता आली पाहिजे. ग्रामसेवकाकडे विकासाचा दूत म्हणून सर्वांनी पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी गावातील वृद्ध, निराधार लोकांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी पाटोदा गावातील वृध्द आणि निराधाराचे केले जाणारे संगोपन याची माहिती दिली. गावासाठी जे काही चांगले करता येईल ती करण्याची शुद्ध भावना ही ग्रामपंचायतीची असली पाहिजे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा बदला पाहिजे. महिलांच्या सुविधांसाठी खूप काही गोष्टी ग्रामपंचायतला करता येण्यासारख्या असतात. पिठाच्या गिरणी पासून मसाले काढणे, शेवाळ्याची मशिन, तेलाची मशीन हेही ग्रामपंचायतीने उभे केले पाहिजेत. आम्ही आमच्या गावात या सर्व गोष्टी करून त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिनही पुरवत असल्याचे त्यांनी स्पष्ट करून महिलांप्रती सन्मानाची दूरदृष्टी ठेवण्याचे आवाहन केले.

 

अर्चना सावंत व लहान मुलींनी सादर केलेल्या

लावणी नृत्यांने रसिकांची मने जिंकली

 

प्रसिद्ध लावणी नर्तिका अप्सरा आली फेम अर्चना सावंत यांनी बहारदार लावण्याद्वारे होट्टल येथे जमलेल्या हजारो ग्रामीण रसिकांची मने जिंकून महोत्सवाची सांगता केली.

 

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात प्रथितयश गायक मंगेश बोरगावकर यांच्या सदाबाहर गाण्यांची मैफल तर खंडेराय प्रतिष्ठाणने गण-गवळण-गोंधळ हा लोककला प्रकार सादर केला. ललीत कला केंद्र पुणेच्या कुमारी श्रृती संतोष पोरवाल यांनी कथ्थक नृत्य सादर केले. ऐनोद्दीन फखरोद्दीन वारसी व त्यांच्या संचाचे बासरी वादन केले. राजेश ठाकरे यांचे शास्त्रीय गायन, डॉ. भरत जैठवाणी यांच्या शिस्यांनी शास्त्रीय नृत्य तर विजय जोशी यांनी मराठी पाऊल पडते पुढे, मराठी लोकरंग हे कार्यक्रम सादर झाले.

 

समारोपाच्या लावणी नृत्यात कु. सोनल भेदेकर, कु. विद्याश्री येमचे, कु. आराध्या सेरीकर या तीन मुलींना दिलखेचक आदांनी महोत्सवात रंगत भरली व नांदेड जिल्ह्यातील कलागुणवत्तेचा प्रत्यय दिला.

0000 




 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...