Wednesday, October 20, 2021

 कोरोना लसीकरणाच्या सर्व व्यापक सहभागासाठी

जिल्ह्यात 75 तासांचे अभूतपूर्व सत्र

"मिशन कवचकुंडल" अंतर्गत विशेष मोहिम  

नांदेड (जिमाका) 20 :- कोविड-19 बाबत जिल्ह्यातील नागरिकांनी बाळगलेली दक्षता, आरोग्य विभागाने घेतलेली तत्परता आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी नियोजनामुळे कोरोनाचा प्रसार मर्यादित ठेवण्यास यश मिळाले आहे. तथापि अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसून जिल्ह्यातील कोणत्याही नागरीकांची यात जीवत हानी होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. हे लसीकरण नांदेड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यापासून तांड्यांपर्यंत ते शहरापासून महानगरापर्यंत प्रभावी करण्याच्यादृष्टिने दिनांक 21 ऑक्टोंबर रोजीच्या सकाळी 8 पासून ते 24 तारखेच्या सकाळी 10 पर्यंत अभूतपूर्व अशी 75 तासांची विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासह या लसीकरण मोहिमेत स्वयंमस्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी नागरीकांना केले आहे. 

या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली असून यासाठी लागणारे अत्यावश्यक मनुष्यबळाचेही नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या मदतीसाठी महसूल विभाग, पंचायत समिती, बालविकास विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांचेही सहकार्य घेतले जात आहे. ही मोहिम तीन शिफ्टमध्ये राबविली जात आहे. यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिक्षक समन्वय साधून शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 75 तासांचे हे विशेष लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी सिद्ध झाले आहे. याचबरोबर या मोहिमेत स्थानिक महाविद्यालय विद्यार्थी, स्काऊट-गाईड, राष्ट्रीय सेवायोजना यातील युवकांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक यांच्या सक्रिय सहभाग घेण्याच्यादृष्टिने नियोजन केले गेले आहे. ज्या वार्डामध्ये, गावांमध्ये लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला अशा ठिकाणी प्राधान्याने हे लसीकरण सत्र मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

अशी राबविली जाईल लसीकरण मोहिम

लसीकरणासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मनपा अंतर्गत असलेली सर्व रुग्णालय, नगरपालिका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी दवाखाना, आयुर्वेदिक युनानी दवाखाना या ठिकाणी लसीकरण मोहिम राबविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र, जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा, महाविद्यालय, मनपा, नगरपंचायत वार्ड, मनपा वार्ड, सर्व धार्मिक प्रार्थना स्थळे, यात्रेची ठिकाणे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, आठवडी बाजार, मुख्य बाजार, तालुकास्तरावरील मार्केट कमेटी या ठिकाणी स्वतंत्र लसीकरण केंद्र असतील. 

जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानावर धान्य वाटप दरम्यान लसीकरण बुथ कार्यान्वित ठेवण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभाग, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्या-त्या विभागांचे विभाग प्रमुख हे त्यांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे सनियंत्रण व नियंत्रण करतील. 

या विशेष मोहिमेंतर्गत दररोज 1 लाख लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून मोहिम कालावधीत एकुण 4 लाख उद्दीष्ट साध्य करण्याबाबत नियोजन केले आहे. यात प्राथमिक आरोग्य स्तरावर 60 हजार लसीकरण, नगरपरिषद व नगरपालिकास्तरावर 20 हजार तर मनपाअंतर्गत 20 हजार लसीकरणाचे उद्दीष्ट निर्धारीत केले आहे. सलग 75 लसीकरण मोहिमे नंतर सुद्धा दररोज किमान 75 हजार लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याबाबत जिल्हा प्रशासनाची टिम सज्ज झाली आहे.

नांदेड तालुक्यासाठी नियोजन  

शहरातील नवी आबादी, लेबर कॉलनी, गंगानगर सोसायटी,  वजिराबाद, गोवर्धनघाट, शाहूनगर, रंगारगल्ली, सिडको येथे सलग लसीकरण मोहिम राबविण्‍यात येणार आहे. ग्रामीण भागातील वाघी, वाहेगाव, मार्कंड या गावातील स्‍वस्‍त धान्‍य दुकानांवर लसीकरण मोहिम राबविली जाईल. यासाठी समन्‍वयक म्‍हणुन तलाठी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. 

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील प्रत्‍येक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशाताई यांची मोलाची मदत घेतली जात आहे. उर्वरीत तलाठी व ग्रामसेवक यांना ज्‍या गावामध्‍ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा गावात समाज प्रबोधन करुन प्रत्‍येकी 100 व्‍यक्‍तीचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट दिले आहे.

000000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...