Friday, April 16, 2021

                                                              जिल्ह्यात किनवटदेगलूर पाठोपाठ

तेरा तालुक्यांच्या ठिकाणी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट

-          पालकमंत्री अशोक चव्हाण

▪ तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणावर अधिक भर

▪ मालेगाव येथे येत्या सोमवार पासून कोविड केअर सेंटरचा प्रारंभ

 


नांदेड (जिमाका) दि. 
16 :- नांदेड जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणेचे अधिकाधिक सक्षमीकरण करुन ग्रामीण भागात कोविड उपचाराच्या उत्तम वैद्यकीय सुविधा पोहचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ऑक्सिजन उपलब्धतेच्या दृष्टीने जिल्ह्यातील किनवट आणि देगलूरच्या धर्तीवर लवकरच इतर तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

 


ग्रामिण भागातील रूग्णाला वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास ते जिल्ह्याच्या ठिकाणी धाव घेतात. त्यामुळे कोरोना बाधितांना तालुक्याच्या पातळीवरच ऑक्सिजनसह योग्य उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देणे अत्यावश्यक आहेअसे स्पष्ट करुन त्यांनी येत्या सोमवारी मालेगाव येथे व त्यानंतर अर्धापूर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती दिली.  

 

जिल्ह्यातील कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेवून सर्वसामान्यांपर्यंत वैद्यकीय सुविधा अधिक चांगल्या प्रकारे पोहचाव्यात यादृष्टीने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेजिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळेअतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशीडॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिपक म्हैसकरजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड आदी उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत आरोग्य सुविधा आपण उभ्या केलेल्या आहेत. काही गावांमध्ये या सुविधा कमी पडत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीही आपण उभ्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी काम पूर्णत्वास आले आहे. आरोग्याच्या या मुलभूत सुविधा लक्षात घेवून याठिकाणी कोविड उपचाराच्या दृष्टीने ज्या अत्यावश्यक बाबी आहेतअशा ऑक्सिजन सुविधेसह उपचाराच्या अन्य सुविधा लवकरच उपलब्ध करुन देण्याच्या सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला दिल्या. 

 

रेमडेसिविर इंजेक्शनची उपब्धता आणि याची आवश्यकता असलेले गंभीर रुग्ण यांचा दररोज आढावा घेवून नियोजन करणे आवश्यक आहे. या इंजेक्शनची कमतरता नाकारता येत नाही. परंतु कोरोना बाधित व्यक्तींसाठी केवळ हाच एक उपचार आहेहा गैरसमज आरोग्य विभागाने दूर करावा असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

 

मालेगाव समवेत भोकर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले जाईल. या ठिकाणी प्रत्येकी 30 बेडची सुविधा उपलब्ध आहे.सोमवारपासून सुरु होणाऱ्या मालेगाव येथील कोविड केअर सेंटरमधील 30 खाटांना ऑक्सिजनची सुविधा लवकरच उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

 

ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध

ज्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. अशा कोरोना बाधितांना ऑक्सिजनची गरज भासते. जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण लक्षात घेता ऑक्सिजनसाठी वेळेवर धावपळ होवू नयेयाबाबत खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. आजच्या घडीला जिल्ह्यातील एकूण मागणी 28 ते 30 टनाची आहे. आपल्याकडे सद्यस्थितीत 39 टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. रोज मागणीप्रमाणे ऑक्सिजन पोहचत असून धास्तीचे कारण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिली.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 10 केएलचे दोन मोठे टँक कार्यरत असून या ठिकाणी आणखी 20 केएलचा मोठा टँक उभारला जात आहे. जिल्हा रुग्णालय येथे 13 केएल क्षमतेचा मोठा टँक आहे. सत्यकमल गॅसेस यांचा 20 केएलचा मोठा टँककलावती एअर प्रोडक्टचा 20 केएल क्षमतेचा एक मोठा टँक असे एकूण 93 केएल स्टोरेजची क्षमता आहे. या व्यतिरिक्त एअर सेप्रेशनचा तीन टनगुरु गॅस पाच टनअनुसुया (कृष्णूर) चा पाच टन अशी 13 टन रोज उत्पादन क्षमता असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहीत राठोड यांनी दिली.

 

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...