Friday, November 15, 2019


नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित ;    
ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणात
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले मार्गदर्शन
          
नांदेड दि. 15 :- नेदरलँड सरकारच्या सहकार्याने नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे पोल्ट्री फार्म ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकतीच (गुरुवार 14 नोव्हेंबर) रोजी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.  
          यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद झडके, बिलोलीचे तहसिलदार विक्रम राजपूत, संस्थेचे संचालक श्री. देशमुख व कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
             या कार्यक्रमाचा भाग म्हणून युरोप खंडातील नेदरलँड् या देशातील "एरिस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेच्या"वतीने नांदेड जिल्ह्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे 4 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. 
          वातावरण बदलाचा शेतीवर होत असलेला अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी व शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देता यावे यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी मार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत.
         
"एरिस" या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अनुभवी तज्ज्ञांची टीम मार्गदर्शनाखाली सगरोळी येथे नेदरलँड् शासनाच्या "नफीक" या संस्थेचा व  संस्कृती संवर्धन मंडळाचा  संयुक्त उपक्रमातून प्रथमच या स्वरूपाचे  हे प्रशिक्षण  शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण चार आठवड्याचे असून ते दोन टप्प्यामध्ये घेण्यात येत आहे.
        पहिल्या दोन आठवड्यात ब्रॉयलर व्यवस्थापनाविषयी सखोल प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये जैवसुरक्षा, उन्हाळ्यातील अतिउष्ण तापमानात पक्ष्यांची घ्यावयाची काळजी, खाद्य व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, तुसाचे व्यवस्थापन, रोगनियंत्रण, लसीकरण व महत्वाच्या बाबींच्या नोंदी ठेवणे इत्यादी विषयांचा समावेश आहे. त्यानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित दोन आठवड्याचे प्रशिक्षण घेण्यात येणार असून त्यासाठी सुद्धा याच प्रशिक्षण संस्थेचे तज्ज्ञ भारतात पुन्हा एकदा येऊन पुढील प्रशिक्षण देणार आहेत.
        
या प्रशिक्षणाकरीता 26 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 17 पश्चिम महाराष्ट्रातील 4, उत्तर पूर्व राज्यातील 5  व तेलंगणातील 1  प्रशिक्षणार्थी असून यामध्ये महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी आपापल्या परिसरात तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
         नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी या स्वरूपाचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण असून त्याकरिता नेदरलँड शासनाचे सहकार्य  मिळविण्यासाठी संस्थेचे संचालक रोहित देशमुख व कृषि विज्ञान केंद्राचे प्रा.व्यंकट शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. हे प्रशिक्षण यशस्वी व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहकार्यही मिळत आहे.
000000


No comments:

Post a Comment

  लक्षवेध सादर निमंत्रण भारताच्या ७६ वा प्रजासत्ताक दिन समारंभ २६ जानेवारीला पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे संपन्न हो...