Friday, August 23, 2019


वृत्त विशेष:
शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ५० लाखाहून अधिक
कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ
- सुभाष देशमुख
मुंबई, दि.२३ शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शासन राबवित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये आतापर्यंत  ५०.२७ लाख कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. त्यासाठी  २४ हजार १०२ कोटी रूपये एवढी रक्कम   शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. या योजनेची  प्रभावी अमंलबजावणी  करण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबविली जात आहे. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
देशातील सर्वांत मोठी ही कर्जमाफी असून यापूर्वी पंजाब राज्याने १० हजार कोटी रुपयांची, आंध्र प्रदेश- १५ हजार कोटी रुपयांची, कर्नाटक- ८ हजार कोटी, तेलंगणाना- १०  हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती.
या योजनेत प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे प्रत्येकी दीड लाखापर्यंतचे  थकीत कर्ज माफ करण्यात आले . नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जाचे पुर्नगठण करण्यात आले. त्यामुळे नवीन पीक कर्ज घेण्यासाठी कर्जदार शेतकरी  पात्र झाला.
 यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. अद्याप कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची  रक्कम मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहाणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा  सातबारा कोरा झाला  असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
००००










वृत्त विशेष:                                                   वृ.वि.2217
23 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रात 2 कोटी 55 लाख जनधन बँक खाती
पाच वर्षात जमा झाल्या 6,136 कोटींच्या ठेवी
            नवी दिल्ली दि 23 : प्रधानमंत्री जनधन योजनेत महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात 2 कोटी 55 लाख 93 हजार बँक खाते उघडण्यात आली आहेत. या खात्यांत आजअखेर 6,136 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत.गेल्या एक वर्षाच्या कालावधीत 31 लाखांहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून ठेवीमध्ये 1,482 कोटी रूपयांची वाढ झाली आहे.
28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत  गेल्या पाच वर्षात देशभरात 36 कोटी 63 लाख 82 हजार 527 बँक खाती उघडण्यात आली असून या बँक खात्यांत आजअखेर 102 लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या आहेत.
31 लाख नवीन बँक खाती
महाराष्ट्रात ऑगस्ट 2018 अखेर 2 कोटी 24 लाख 5 हजार 708 बँक खाती उघडण्यात आली होती. गेल्या वर्षभरात यामध्ये 31 लाख 87 हजार 304 नवीन बँक खात्यांची  भर पडली.
1 कोटी 82 लाख  ' रुपे कार्डचे वितरण '
गेल्या पाच वर्षात जनधन योजनेअंतर्गत  महाराष्ट्रात 1 कोटी 82 लाख 74 हजार 735 रुपे कार्डचे वितरण करण्यात आले. ऑगस्ट 2018 अखेर ही संख्या 1 कोटी 56 लाख इतकी होती, गेल्या वर्षभरात 26 लाखाहून अधिक नवीन रूपे कार्डचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण बँकांत 1 कोटी 26 लाख बँक खाती
जनधन बँक योजनेमध्ये ग्रामीण बँकात आज अखेर 1 कोटी 26 लाख 11 हजार 107 खाती उघडण्यात आली तर शहरी व महानगरातील बँकांमध्ये  14 लाखांहून अधिक खात्यांची भर पडली आहे. शहरी बँकामध्ये  एकूण 1 कोटी 29 लाख 81 हजार 905 बँक खाती उघडली गेली आहेत.
०००००

वृत्त क्र. 594    
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 23 :- राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 24 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई येथून खासगी विमानाने सकाळी 10.15 वा. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. वाहनाने परळी जि. बीडकडे प्रयाण करतील.
रविवार 25 ऑगस्ट 2019 रोजी परळी येथून वाहनाने दुपारी 12.45 वा. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 1 वा. खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.   
00000
वृत्त क्र. 595    
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
निदेशकाच्या जागेसाठी मुलाखती
नांदेड, दि. 23 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथील कोपा व्यवसायासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर निदेशकाच्या जागेसाठी मंगळवार 27 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वा. पात्र उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मुकुंद कुलकर्णी यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 596     
जप्‍त रेती साठ्याच्या लिलावाची
सोमवारी अंतिम फेरी  
नांदेड, दि. 23 :- जप्‍त केलेल्या रेती साठयाचा अंतिम लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्‍या अधिपत्‍याखाली सोमवार 26 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
नांदेड तालुक्‍यातील विनापरवानगी अनाधिकृत रेती साठा केल्‍याचे निदर्शनास आले आहे. हा रेती साठा जप्‍त करुन त्‍याची ईटीएस मोजणी करण्‍यात आली आहे. हा रेतीसाठयाचा लिलाव यापूर्वी  9 ऑगस्ट 2019 रोजी करण्‍यात आला होता. परंतू लिलावधारकांनी लिलावात 25 टक्के रक्‍कम लिलावाच्‍या दिवशीच शासन खाती जमा करणे आवश्‍यक होते. लिलावधारकांनी लिलावात 25 टक्के रक्‍कम भरणा केला नसल्‍यामुळे अटी व शर्तीनुसार संबंधितांची अनामत रक्‍कम जप्‍त करुन या रेती साठयाचा अंतिम लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्‍या अधिपत्‍याखाली सोमवार 26 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्‍यात येणार आहे.
जप्‍त अवैध रेती साठयाच्‍या लिलावामध्‍ये लिलावधारक कोणीही सहभागी न झाल्‍यास सदर जप्‍त रेती साठे हे विविध शासकीय योजनाच्‍या कामासाठी किंवा घरकुल बांधकामासाठी विनामूल्‍य विविध शासकीय विभागास देण्‍यात येईल याची नोंद घ्‍यावी.
रेतीसाठा मौ. भंनगी येथे 1,261 ब्रास, मौ. गंगाबेट - 730 ब्रास,मौ. नाळेश्‍वर  -191 ब्रास,मौ. सिध्‍दनाथ -326 ब्रास, एकूण -2,508 ब्रास उपलब्‍ध आहे.
नांदेड तालुक्‍यातील वरील दर्शविलेल्‍या ठिकाणी  रेती साठा गट क्रमांक निहाय असून तो पाहुन तपासुन घेवुन लिलावात भाग घ्‍यावा. स्‍थळाचे ठिकाण असलेला साठा तपासुनच बोलीत भाग घ्‍यावा. अटी शर्ती बाबतची माहिती तहलिस कार्यालय नांदेड येथे गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहवयास मिळेल, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त  क्र. 597
कृषी सहायक कार्यालयाचे उद्घाटन ;
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा शुभारंभ
नांदेड दि. 23 :- कृषी विभागाच्यावतीने नांदेड तालुक्यातील तुप्पा येथे कृषी सहायक कार्यालयाचे उद्घाटन नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी सुखदेव आर. टी., तुप्पा गावचे सरपंच देवराव टिपरसे, नांदेड तालुका कृषी अधिकारी विनायक सरदेशपांडे यांचे हस्ते  करण्यात आले. 
यावेळी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा शुभारंभ करून शेतकऱ्यांना उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सुखदेव यांनी  योजनेविषयी माहिती  दिली. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत सहभागी होऊन निवृत्ती पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा व आपले भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन करून  गावातील शेतकऱ्यांनी कृषी सहायक यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेती शाळेचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करण्याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुप्पा गावचे सरपंच देवराव टिपरसे हे होते तर कापूस संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तेलंग यांनी रासायनिक किटकनाशकांचा कमीतकमी वापर करून विषमुक्त शेती करण्याविषयी माहिती दिली. 
      या कार्यक्रम प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी सतिष सावंत, प्रकाश पाटील, तुप्पा गावचे उपसरपंच बबनराव कदम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गंगाधर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 
       तुप्पा गावच्या कृषी सहायक अर्चना कास्टेवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी मित्र सुरेश कदम, गुलाबराव कदम, माधव कदम, गंगाधर पवार, रवी पंडित यांनी परिश्रम घेतले. 
            या प्रसंगी तुप्पा गावातील भगवान कदम, आनंदा ढेपाळे, मारोतराव तळणे, बाबाराव कदम, पांडुरंग भालेराव यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.  गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कृषी सहायकांचे कामकाजाविषयी प्रशंसा बोलून दाखविली व शेतीशाळेचा कीड व्यवस्थापनामध्ये उपयोग होत असल्याचे सांगितले. शेवटी आभार देवराव टिपरसे यांनी मानले.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...