Friday, November 30, 2018


-निविदाबाबत कृषि कार्यालयाचे आवाहन
            नांदेड, दि. 30 :  उपविभागी कृषि अधिकारी नांदेड कार्यालयांतर्गत लोहा तालुक्यातील वाका 1, 2 मजरेसांगवी येथील जलयुक्त शिवार अभियान या योजनेअंतर्गत ढाळीचेबांध माती नाला बांधची कामांची निविदा www.mahatender.gov.in वर प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही -निविदा भरण्याचा कालावधी 3 ते 10 डिसेंबर 2018 असा आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यात 15 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

शबरीमला केरळ उत्सवास
जाणाऱ्या भाविकांना आवाहन
नांदेड, दि. 30 :- शबरीमला केरळ येथे उत्सवास जाणऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्टया योग्य असलेल्या प्रवासी वाहनातून प्रवास करावा, असे आवाह उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
शबरीमला केरळ येथे 17 नोव्हेंबर 2018 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत होणाऱ्या उत्सवात राज्यातील निरनिराळया ठिकाणाहून तसेच नांदेड जिल्हयातून भाविक जातात. भाविक या यात्रेस ज्या वाहनातून प्रवास करतात ती तांत्रिकदृष्टया योग्य असल्यास अपघात होण्याची शक्यता नसते. प्रवासी वाहनाव्यतिरीक्त अन्य वाहनातून किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करु नये, असेही आवाहन केले आहे.
00000

Thursday, November 29, 2018


लोकशाही दिनाचे 3 डिसेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 29 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 3 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


शस्त्र परवाना नुतनीकरणाचे आवाहन  
नांदेड, दि. 29 :- जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत 31 डिसेंबर 2018 रोजी संपुष्‍टात येत आहे, अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
परवानाधारकाने 1 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनिकरण शुल्‍क (चलनाने) शासनास जमा करावी. आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा.
तसेच केंद्र शासनाचे निर्देशानुसार National Data Base (NDAL) च्‍या संकेतस्‍थळावर  शस्‍त्र परवानाधारकाची माहिती अपलोड करण्‍यात आली असून अशा शस्‍त्र परवानाधारकांना युआयएन नंबर देण्‍यात आला आहे. ज्‍या शस्‍त्र परवानाधारकांनी या कार्यालयाकडून युआयएन नंबर प्राप्‍त करुन घेतला नाही त्‍यांचा शस्‍त्र परवाना दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर अवैध समजण्‍यात येणार आहे, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
00000


कापूस, तूर पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 29 :-  जिल्हयात काप, तुर  पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतक-यांसाठी पिकासाठी किडीपास संरक्षणासाठी कृषी संदेश देण्यात आला आहे.
कापुस- फरदड  कापुस घेण्याचे टाळावे आणि थायमिथोक्झॅम 12.6 + लॅमडा सॅहलोथ्रीन 9.5 झेड सी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.
तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. तसेच इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर  पाण्यात मिसळुन फवारावे. गुंडाळलेली पाने अळीसहीत नष्ट़ करावीत. पक्षी थांबे लावावेत. हरभरा पिकावर घाटेअळीसाठी पक्षी थांबे तसेच कामगंध सापळे लावावेत आणि निरीक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000


नवोदय विद्यालयात सहावी प्रवेश
परिक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 29 :- जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 15 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश परिक्षा 6 एप्रिल 2019 रोजी घेण्यात येणार आहे. संबंधीत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. एच. व्ही. प्रसाद यांनी केले आहे.
0000


नांदेड ग्रंथोत्सवात वक्तृत्व स्पर्धेसाठी
प्रवेशिक पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 29 :- नांदेड ग्रंथोत्सव निमीत्त उच्च माध्यमीक विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी  प्रवेशिका बुधवार 5 डिसेंबर 2018 पर्यंत पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.  
           उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 8 9 डिसेंबर 2018 या कालावधीत आयोजित दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सव 2018 निमीत्त माध्यमीक विद्यार्थ्यांसाठी "बेटी बचाव बेटी पढाव" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा  9 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी श्री गुरु गोंविदसिंघजी स्टेडीयअम परीसर नांदेड येथे होणार आहे.
या स्पर्धेचे विषय व अटी पुढील प्रमाणे राहतील. प्रत्येक स्पर्धकाला भाषणासाठी 6 मिनिटे (5+1) देण्यात येतील. स्पर्धकांची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. भाषणासाठी स्पर्धकाचे नाव पुकारल्यावर स्पर्धक उपस्थित असला पाहिजे. मराठी भाषेत भाषण करावे लागेल. कोणत्याही माध्यमीक विदयालयातील दोन स्पर्धकांना प्रवेश दिला जाईल. मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या भाषणातील सरासरी गुणांवरुन पारितोषिक दिले जातील. प्रथम क्रमांक 500 रुपये, ग्रंथ व प्रमाणपत्र. व्दितीय क्रमांक पारितोषिक 400 रुपये, ग्रंथ व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक पारितोषिक 300 रुपये ग्रंथ व प्रमाणपत्र. उत्तेजनार्थ 200  रुपये, ग्रंथ व प्रमाणपत्र पारितोषिक विजेत्यांना ग्रंथोत्सवात लगेच होणाऱ्या समारोप समारंभात प्रदान करण्यात येतील.
          नाव नोंदणीसाठी नांदेड जिल्हयातील माध्यमीक विदयालयांनी मुख्यध्यापकांच्या स्वाक्षरीच्या पत्रासह (नाव, शाळा, वर्ग इत्यांदीसह ) दोन विदयार्थ्यांची स्पर्धक म्हणून प्रवेशिका (नाव नोंदणी) 5 डिसेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालयात लेखी नोंद केली पाहिजे. नंतर आलेल्या प्रवेशिका स्विकारता येणार नाही. मुदती नंतर भाषणासाठी केलेल्या विनंतीला मान्य करता येणार नाही. स्पर्धकाला प्रवेशाच्या वेळी ओळखपत्र आसणे आवश्यक आहे. स्पर्धकास कोणतीही प्रवेश शुल्क नसून कोणताही प्रवास भत्ता देय होणार नाही.
          नाव नोंदणी स्पर्धकासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री गुरु गोविदसिंघजी स्टेडीयअम परिसर नांदेड या पत्यावर किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-236228 -मेल dlonanded.dol@maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी नांदेड जिल्हयातील सर्व उच्च माध्यमिक विदयालयाच्या विदयार्थ्यांनी, इच्छूकांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000

Wednesday, November 28, 2018

शस्त्र परवाना नुतनीकरणाचे आवाहन   
नांदेड, दि. 28 :- जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचेमार्फत निर्गमीत शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत 31 डिसेंबर 2018 रोजी संपुष्‍टात येत आहे, अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
परवानाधारकाने 1 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनिकरण शुल्‍क (चलनाने) शासनास जमा करावी. आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे दाखल करावा.
तसेच केंद्र शासनाचे निर्देशानुसार National Data Base (NDAL) च्‍या संकेतस्‍थळावर  शस्‍त्र परवानाधारकाची माहिती अपलोड करण्‍यात आली असून अशा शस्‍त्र परवानाधारकांना युआयएन नंबर देण्‍यात आला आहे. ज्‍या शस्‍त्र परवानाधारकांनी या कार्यालयाकडून युआयएन नंबर प्राप्‍त करुन घेतला नाही त्‍यांचा शस्‍त्र परवाना दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर अवैध समजण्‍यात येणार आहे, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

Tuesday, November 27, 2018

लेख


गोवर-रुबेला लसीकरण मोहिम : धार्मिक नेत्यांची भूमिका
                                      
              अनिल आलुरकर
                                                                        जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                         नांदेड

गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम 27 नोव्हेंबर पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. आपल्या देशाने गोवरचे दूरीकरण करण्याचा आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय केला आहे. आपण एका लसीद्वारे दोन आजारांवर मात करु शकतो. गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत धार्मिक नेते या नात्याने त्यांची भूमिका याविषयी माहिती या लेखात देण्यात येत आहे.
      
गोवर आणि रुबेला या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्या देशाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला प्रतिबंधासाठी राज्यव्यापी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेविषयी सर्वस्तरातील नागरिक व पालकांकडून सकारात्मक सहकार्याची अपेक्षा ठेवली जात असतांना राष्ट्रीय बंधुभाव जपणाऱ्या व प्रचंड धार्मिकतेच्या आपल्या देशात धार्मिक नेत्यांच्या प्रबोधनाला अत्यंत महत्व आहे. त्यादृष्टीने लसीकरणाविषयी समाजात शुभसंदेश गेला पाहिजे आणि त्यासाठी धार्मिक नेत्यांची भूमिका सकारात्मक आणि अत्यंत महत्वाची ठरते.
           लसीकरणाच्या आधी एमआर लसीकरणासंबंधी समुदायामध्ये स्वयंप्रेरित आणि उत्साहवर्धक वातावरण असणे महत्वाचे आहे. धार्मिक नेत्यांनी लसीकरणाच्या होणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात कृपया सहभागी व्हा अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना एमआर लसीकरणाबद्दल थोडक्यात माहिती देण्याची विनंती करण्यात आली पाहिजे. स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तुमच्या गरजेनुसार अधिकाधिक माहिती प्राप्त करा अथवा आरोग्य केंद्रातील कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्यांशी बोला / भेटा. वॉट्स-ॲप, ई-मेल आणि एसएमएस तसेच आपापसांतील गप्पांच्या माध्यमातून लसीकरणासंबंधीच्या माहितीचा नियमितपणे प्रचार करावा. तुमच्या विभागात सामुदायिक बैठकांचे आयोजन करावे आणि उपस्थितांना एमआर लसीकरणासंबंधी थोडक्यात माहिती द्यावी. आरोग्य कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या आरोग्य शिक्षण साहित्याचा वापर करा अथवा एमआर लसीकरणासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी त्या बैठकीत / सभेत एखाद्या आरोग्य कर्मचाऱ्याला बोलवा. ज्या पालकांना 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालके आहेत त्यांच्यापर्यंत संदेश अवश्य पोचेल याची खात्री करुन घ्या. मशीद, मंदिर, चर्च तसेच इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या धार्मिक बैठकीत यासंबंधी आपल्यामार्फत घोषणा केली जाईल याची खात्री करुन घ्या. शुक्रवारचा नमाज तसेच मंगळवार किंवा रविवारच्या प्रार्थनासभांच्यावेळी तुमच्या विभागातील समुदायातील सदस्यांच्या उपस्थितीत एमआर लसीकरणासंबंधी घोषणा करा आणि चर्चा घडवून आणा. लसीकरण सत्र आयोजित करण्यासाठी आरोग्य सेविकेला योग्य जागा उपलब्ध करुन द्या. त्यामुळे तुमच्या समुदायातील सदस्यांची विश्वासाची भावना वाढेल.
लसीकरणादरम्यान पालकांना लसीकरणासाठी त्यांच्या बालकांना घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन द्या. तुम्ही स्वत: लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या विभागातील यादीत असलेल्या कुटुंबांची जमवाजमव करण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी तुमच्या एखाद्या प्रतिनिधीला पाठवा. एमआर लसीकरणाची माहिती लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुमच्या धार्मिक स्थळावरुन सकाळी घोषणा होईल याची खातरजमा करा आणि ही घोषणा दिवसाउजेडी होईल यासाठी प्रयत्न करा. जर समुदायातील सदस्यांनी काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करा आणि सदस्यांना योग्य उत्तरे मिळतील याची खात्री करुन घ्या.
लसीकरणानंतर लक्ष देण्यात आलेल्या एखाद्या बालकाला तापाची लक्षणे अथवा डोळे लालसर झाल्याचे दिसून आले तर पर्यवेक्षकाला किंवा आरोग्य सेविकेला त्वरित खबर द्या आणि समुदायातील सदस्य घाबरुन जाऊ नये यासाठी त्यांना दिलासा द्या. जर बालकाला अशक्तपणा अथवा थकल्यासारखे वाटत असले तर वैद्यकीय अधिकारी / आरोग्य सेविका यांना कळवून गैरसमज पसरणार नाहीत याची दक्षता घेणे महत्वाचे आहे.  
एका राष्ट्रव्यापी अभियानाद्वारे शाळा आणि बाह्यसंपर्क लसीकरण सत्रांच्या माध्यमातून गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणाऱ्या गोवर-रुबेला (एमआर) लसीकरण मोहीमेची सुरुवात झाली आहे. त्यानंतर नियमित लसीकरणामध्ये एमआर लसीचा समावेश करण्यात येणार आहे. बालकांना एमआर एमएमआरची लस यापूर्वी टोचण्यात आली असली अथवा नसली तरी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांनी एमआरची लस टोचून घेणे महत्वाचे आहे.
विषाणुद्वारे पसरणारा गोवर हा प्राणघातक रोग आहे. गोवरमुळे बालकांना शारीरिक दुर्बलता येऊ शकते आणि त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. रुबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणूमुळे होतो. त्याची लक्षणे गोवरसारखीच असतात. त्याचा संसर्ग मुलगा आणि मुली दोघांनाही होतो. परंतू गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याचा परिणाम सीआरएसमध्ये (कॉनजेनिटल रुबेला सिंड्रोम) होऊ शकतो. ज्याचे परिणाम गर्भासाठी आणि नवजात शिशूसाठी घातक ठरु शकतात.
एमआर मोहिमेदरम्यान 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही लस अवश्य टोचून घ्यावी. वरील वयोगटातील सर्व बालकांना, त्यांचे लिंग, जात, पंथ व धर्म असा भेदभाव न करता ही लस देण्यात येईल. ही लस शाळा, सामुदायिक सत्र, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रांवर टोचण्यात येईल. जरी बालकाला एमआर एमएमआरची लस यापूर्वीच देण्यात आली असली तरी त्याचा एमआरची लस जरुर टोचून घ्या. मोहिमेदरम्यान देण्यात येणारा हा अतिरिक डोस म्हणजे बालकाला मिळाणारे अतिरिक संरक्षण. एमआर लस अतिशय सुरक्षित आहे आणि तिचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे गोवर तसेच रुबेला रोगांपासून दीर्घकाळ रक्षण होते. एमआर लस आणि वंध्यत्व या दोहोंचा परस्परांशी काहीही संबंध नाही. बालकांना ही लस प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत टोचली जाईल या मोहिमेत तुमचा सहभाग असेल हे सुनिश्चित करा.
धार्मिक नेत्यांची या लसीकरणामध्ये आपल्या समुदायाच्या मुला-मुलींचे गोवर व रुबेला या आजारापासून संरक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका असून शासनाला धार्मिक नेत्यांकडून यासंबंधीची जागरुकता वाढविण्याची व लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. ती पूर्ण होईल यात शंकाच नाही.
000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...