Monday, May 21, 2018


जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवनातून
स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल  
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 21 :- माजी मालगुजारी तलाव पुनरुज्जीवनातून पाणीसाठा वाढल्यास पाणी पातळी वाढून त्या भागातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होऊन स्थानिकांना मत्स्य व्यवसायातून मोठयाप्रमाणात रोजगार निर्मिती आणि आर्थिक उत्पन्नातही भर होईल. यासाठी जिल्ह्यातील माजी मालगुजारी तालावातील गाळ काढण्यासह, दुरुस्तीच्या कामांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून अर्थसहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. कदम बोलत होते. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2017-18 च्या माहे मार्च 2018 अखेर झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.   
नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार अशोकराव चव्हाण, खा. सुनिल गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, आ. अमर राजूरकर, आ. डी. पी. सावंत, आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. श्रीमती अमिताताई चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. डॉ. तुषार राठोड, महापौर शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना तसेच समिती सदस्य, जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महावितरण यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री कदम यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील विविध बाबींचा सर्वंकष आढावा घेतला. दलितवस्ती विकास निधीची कामे दलितवस्तीची असतील तर त्यावर चर्चा करुन अंतीम स्वरुप देण्यात येईल. नियोजन समितीच्या सदस्यांना यशदामार्फत पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येईल. नियोजन समितीच्या बैठकीत महिला सदस्यांनी मांडलेले विषय अहवालात नोंद घेण्यात यावी. तुप्पा परिसरातील घनकचरा प्रक्रिया न करता जाळण्यात येत असल्याने तेथील विहिरीचे दुषीत पाणी होत आहे. त्यावर मनपाने उपाययोजना कराव्यात. घनकचऱ्याबाबत डिपीआर मधून मनपाला निधी देण्यासाठी मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करण्यात येणार आहे.  
जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी वाळू वाहतूक होत आहे तेथील रस्ते टिकले पाहिजे यासाठी रस्ते बांधणीसाठी लक्ष देण्यात येईल. चोरी किंवा जास्त वाळू उपसा झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत चांगली कामे होत असून पावसाचे पाणी थांबले पाहिजे यासाठी बंधाऱ्यांचे गेट तांत्रिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीचे वापरण्याबाबत प्रयत्न केले जातील. जेणेकरुन पाणीसाठा वाढण्यास मदत होईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून वरच्या भागात जास्तीचा पाणी उपसा होत असल्यास मराठवाड्यात सिंचनाचा अनुशेष निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात येईल, असेही कदम यांनी सांगितले.
उमरी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यासाठी निधी देण्यात येईल. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची स्वच्छता, उर्दू घर लोकार्पण सोहळा, कॅन्सर रोगाचे निदान करण्यासाठी दवाखाना तसेच मालेगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर, कंधार शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी मानव विकास अंतर्गत निधी दिला जाईल. हदगाव तालुक्यातील आष्टी येथील भिमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या योगेश जाधव यांच्या कुटुंबियांचे पूनर्वसन करण्यासाठी सकारात्मक असल्याचे पालकमंत्री श्री. कदम यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 मध्ये सर्वसाधारण योजनेचा खर्च शंभर टक्के झाला असून अनुसूचित जाती उपयोजना 99.83 टक्के, आदिवासी उपयोजना 95.56 टक्के खर्च झाला आहे. या तिन्ही योजना मिळून 99.23 टक्के असा खर्च झाला आहे. मागील 26 जानेवारी 2018 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालन मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानसभा सभागृहातील सन 2016-17 या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार प्राप्त आमदार सुभाष साबणे यांना मिळाल्याबद्दल सर्व संमतीने अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
नाविन्यपूर्ण योजनेतील कामांचा आढावा
            बैठकीपुर्वी नाविन्यपूर्ण योजनेत केलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार वेळेत पूर्ण करावीत. बियाणे, खत, औषधी बोगस उत्पादन करणाऱ्या कंपनी मालकांवर कारवाई करावी. पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे यासाठी नाला खोलीकरण, बंधाऱ्यांची कामे तसेच आरोग्याशी संबंधीत, विविध विभागांना दिलेल्या कामाचे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री कदम यांनी दिले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडे लोकाभिमुख कामांचा आराखडा असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा. त्यास जिल्हा नियोजन समितीतून योग्य प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
---000---


No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...