Wednesday, May 10, 2017

'एमएचटी-सीईटी- 2017' परीक्षेसाठी गुरुवारी 27 केंद्रावर
8 हजार 42 विद्यार्थ्यांची व्यवस्था, यंत्रणा सज्ज
परीक्षा केंद्र प्रवेशासाठी कोणताही 'ड्रेस कोड' नाही
नांदेड, दि. 10 :- राज्यातील अभियांत्रीकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्फे घेण्यात येणारी 'एमएचटी-सीईटी -2017' परीक्षा गुरुवार 11 मे 2017 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी नांदेड केंद्रांतर्गत 27 परीक्षा उपकेंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी नांदेड केंद्रांतर्गत 8 हजार 42 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्यावतीने परीक्षेसाठीचे संयोजन करण्यात येत आहे.
नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी विभागीय प्राधिकारी म्हणून तथा गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे काम पाहत आहेत. नांदेडसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे जिल्हा केंद्र प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य पी. डी. पोपळे काम पाहत आहेत. परीक्षेच्या संयोजनासाठी उपकेंद्र प्रमुख - 30, समवेक्षक - 370, पर्यवेक्षक - 90, उपसंपर्क अधिकारी - 7, सुक्ष्म निरीक्षक - 5 यांच्यासह वीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 'एमएचटी-सीईटी 2017' ही अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) व फार्म.डी या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षा केंद्राची विभागणी 'एमएम', 'एमबी', 'बीबी' अशी करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी निश्चित केलेली 27 परीक्षा केंद्र (कंसात विद्यार्थी संख्या) पुढील प्रमाणे :- 'एमएम'साठीची केंद्र- यशवंत कनिष्ठ महाविद्यालय - ब्लॅाक 1 (384), यशवंत कनिष्ठ महाविद्यालय- ब्लॅाक 2 (408), यशवंत महाविद्यालय विज्ञान विभाग (288), यशवंत वरीष्ठ महाविद्यालय- ब्लॅाक 1 (288), यशवंत वरीष्ठ महाविद्यालय- ब्लॅाक 2 (480), नारायणराव विधी महाविद्यालय (306), महात्मा फुले हायस्कूल पहिला मजला - ब्लॅाक 1 (456), महात्मा फुले हायस्कूल तळमजला- ब्लॅाक 2 (273). 'एमबी'साठीची केंद्र - शासकीय तंत्रनिकेतन मुख्य इमारत (360), शासकीय तंत्रनिकेतन माहिती तंत्रज्ज्ञान इमारत तळ व पहिला मजला (240), शासकीय तंत्रनिकेतन विस्तारित इमारत तळमजला व पहिला मजला (168), नांदेड फार्मसी कॅालेज (192), राजर्षी शाहू विद्यालय (336), केंब्रीज माध्यमिक विद्यालय (468). 'बीबी'साठीची केंद्र - एनईएस सायन्स कॅालेज (360), नागसेन विद्यालय (192), पीपल्स हायस्कूल (216), प्रतिभा निकेतन हायस्कूल (240), शिवाजी हायस्कूल (240), गुजराथी हायस्कूल (480), एनएसबी महाविद्यालय (240), खालसा हायस्कूल (192), सना उर्दू हायस्कूल (216), नागार्जूना पब्लिक स्कूल (384), एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय क्लास रूम कॅाम्प्लेक्स इले. इंजिनीयरींग इमारत (144), एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालय मेकॅ-केम-आयटी-कॅा. इमारत (231), शारदा भवन हायस्कूल (260). दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी- महात्मा फुले हायस्कूल तळमजला ब्लॅाक 2, केंब्रिज माध्यमिक विद्यालय आणि शारदा भवन हायस्कूल या केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने परीक्षेसाठी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय ठेवून परीक्षा केंद्रांवरील सुविधांबाबत त्या-त्या यंत्रणांना वेळीच निर्देशीत केले आहे. त्यानुसार परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच या कालावधीत वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. परीक्षा कालावधीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तसेच परीक्षा साहित्याच्या वाहतुकीसाठीही पोलिस सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधला आहे. याशिवाय दोन-तीन परीक्षा केंद्राच्या जवळपास एक वैद्यकीय पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तैनात रहणार आहे. उपकेंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उपकेंद्रावर "तक्रार निवारण समिती" कार्यरत असणार आहे. परीक्षा केंद्र परीसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.
परीक्षा संयोजनासाठीचा प्रशिक्षणाचा पहिला व दुसरा टप्पा नुकताच डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये परीक्षा यंत्रणेतील सर्वच घटकांना परीक्षा संयोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्क अधिकारी प्राचार्य पोपळे यांच्यासह तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
'एमएचटी-सीईटी -2017' परीक्षेचे वेळापत्रक
'एमएम' केंद्रावर पेपर- 1 गणित व पेपर- 2 (फिजीक्स व केमिस्ट्री) असून सकाळी 9.15 पासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 2 वा. परीक्षा संपणार आहे.
'एमबी' केंद्रावर पेपर-1 गणित, पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री) आणि पेपर-3 (बायोलॉजी) आहे. सकाळी 9.15 वाजेपासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
'बीबी' केंद्रावर पेपर-2 (फिजीक्स व केमिस्ट्री ) व पेपर-3 (बायोलॉजी) असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दुपारी 12 वाजेपासून प्रवेश मिळणार असून सायं. 4.30 वा. परीक्षा संपणार आहे.
या परीक्षेचा निकाल 4 जून 2017 रोजी किंवा त्यापुर्वीही जाहीर होऊ शकतो, असे सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनो परीक्षा केंद्रात जाताना...
'एमएचटी-सीईटी -2017' परीक्षेसाठी कोणत्याही स्वरुपाचा विशिष्ट 'परीधान संकेत'- ड्रेस कोड लागू केलेला नाही याची नोंद घ्यावी, असेही परीक्षा यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात जाताना विद्यार्थ्यांना आपल्या सोबत काळ्या शाईचा बॅाल प्वाईंट पेन, पाण्याची बाटली, बिस्किट व लिखाणाचा पुठ्ठा (रायटींग पॅड) इतकेच साहित्य ठेवता येणार आहे.
 परीक्षेचे स्वरुप बहुपर्यायी स्वरुपाचे असल्याने 'ओएमआर शीट' उत्तरपत्रिकेवर केवळ काळ्या शाईचे बॉलपेन विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल, घडयाळ नेण्याची परवानगी नाही. तसेच इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक संयंत्र आणण्याची परवानगी नाही.
परीक्षा केंद्रावरील व्यवस्थेचे, नियोजनाचे सुक्ष्म निरिक्षण करण्यासाठी राज्य सामायिक कक्षातर्फे निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...