Wednesday, November 30, 2016

शहीद जवान संभाजी कदम यांचे पार्थिव आज पोहचणार

नांदेड, दि. 30 :-  जम्मू-काश्मिरमधील नागरोटा येथील लष्करी तळावरील अतिरेक्यांच्या हल्ल्यातील चकमकीत 5- मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी यशवंत कदम ( वय 33) यांना वीरमरण आले. शहीद कदम यांचे पार्थीव जम्मू येथून तेथील युद्वजन्य परिस्थितीखराब हवामानामुळे आज नांदेड येथे पोहचू शकले नाही. जम्मू येथील सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कदम यांचे पार्थीव उद्या गुरूवार 1 डिसेंबर, 2016 रोजी नांदेड येथे पोहचणार आहे. त्यानंतर जानापुरी या त्यांच्या मुळगावी लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, अंत्यसंस्कारासाठीची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज जानापुरी येथे विविध यंत्रणांच्या समन्वयातून पुर्ण करण्यात आली.  जम्मू येथील सैन्य अधिकारी  कर्नल  हरीसींग यांनी  दिलेल्या  माहितीनुसार शहिद जवान यांचे पार्थीव दिनांक 1  डिसेबर 2016  रोजी सकाळी  जम्मू  येथून  वायुदलाच्या खास विमानाने पुणे येथे पोहचेल व तेथून  नांदेड विमानतळावर सकाळी  11 वाजता  पोहचणे अपेक्षीत  आहे.  त्यानंतर पार्थिव जानापुरी येथे शहीद कदम यांच्या मुळ गावी नेण्यात येईल. जानापुरी येथे शहीद कदम यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन तसेच त्यानंतर लष्करी प्रथेप्रमाणे मानवंदना दिल्यानंतर लष्करी व शासकीय इतमामाप्रमाणे पुष्पचक्र अर्पण करण्यात येईल.
 जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार भारतीय लष्करातील वरीष्ठ अधिकारी तसेच जानापुरी येथील व्यवस्थेसाठी विविध यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, कंधारच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्यासह, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम आदी यंत्रणांचे अधिकारी जानापुरी येथील व्यवस्थेसाठी प्रयत्नशील आहेत. शहीद जवान कदम यांच्या लष्करी व शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारासाठी जिल्हयातील  सर्व माजी सैनिक / विधवांनी सैन्यदलाचा गणवेश-मेडल व मिलीटरी कॅप लावून उपस्थित रहावे असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर तुंगार यांनी केले आहे.
0000000



शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना कॅशलेस
व्यवहाराबाबत प्रशिक्षण द्या - जिल्हाधिकारी काकाणी
बँकांना निर्देश, नागरिकांनाही डिजिटल पेमेंट मार्ग अवलंबण्याचे आवाहन

नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून, नागरिकांपर्यंत दैनंदिन व्यवहारात डिजिटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाणी घेण्यासाठीच्या मार्गांबाबत लोकशिक्षण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग, बाजार समिती, आठवडी बाजार त्याही पुढे जाऊन घराघरांत रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करण्याची माहिती पोहचावी यासाठी शाळा, महाविद्यालय यांच्याद्वारेही प्रयत्न करण्यात यावेत असेही श्री. काकाणी यांनी आज येथे बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.  जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाचे प्रमुख अधिकारी तसेच अन्य बँक अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी काकाणी यांनी विशेष बैठक घेतली. त्याबैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यातील रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहारांच्या लोकशिक्षणाकरिता कार्यक्रमही आखण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, नाबार्डचे व्यवस्थापक श्री. धुर्वे आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की,  निश्चलनीकरणानंतर रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहारांबाबत सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून माहिती देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी बाजार समिती, मोंढे, विविध सहकारी संस्था यांच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. याशिवाय बँक व्यवयाय मित्र (बीसीए) यांची संख्या वाढविण्यात यावी. दोन ते तीन गावांमागे एक बँक व्यवसाय मित्र नियुक्त करण्यात यावेत. त्यांच्याद्वारे आधारशी संलग्न तसेच बायोमेट्रीक पद्धतीने रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करता येतात. याची माहितीही पोहचविण्यात यावी. याशिवाय प्वाईंट ॲाफ सेल (पीओएस) यंत्रांची सख्या पुरेशी उपलब्ध होईल. याचाही दक्षता घेण्यात यावी. या यंत्राद्वारे व्यवहार व्हावेत यासाठी बँकांनी विशेषत्वाने प्रयत्न करावेत.  जनधन योजनेशी निगडीत खात्यांवरील व्यवहार रुपे कार्ड, किसान कार्ड यांच्या माध्यमातून व्हावेत यासाठी बँकांनी लोकांमध्ये पोहचून माहिती द्यावी.
यावेळी बैठकीत रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार व्हावेत, डिजीटल व्यवहार व्हावे यासाठी शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार तसेच दुकान निरीक्षक यांच्यासह विविध घटकांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही श्री. काकाणी यांनी दिले. या प्रशिक्षणासाठीचे साहित्य, विविध प्रकारचे माहितीपत्रके, दृक-श्राव्य (व्हिडीओज्) आदींचाही वापर करण्यावर भर द्यावा, अशीही सुचना करण्यात आली.
डिजिटल व्यवहाराची व्याप्ती वाढविताना रोखीने आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दीष्ट असून त्याद्वारे व्यवहारात पारदर्शकता आणणे हे ध्येय आहे. नागरिकांनी या पद्धतीचा अवलंब करुन अधिकाधिक डिजिटल व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकरी काकाणी यांनी केले आहे.


– डिजिटल बँकिंगचे विविध मार्ग –
1) यूपीआय : या पद्धतीत आपला मोबाईल क्रमांक बँक अथवा एटीएम मध्ये नोंदवा. संबंधित बँकेचे ॲप डाऊनलोड करा. आपला आयडी तयार करा. आपला पिन नंबर सेट करा. यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात.
2) यूएसएसडी : आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा. आपल्या फोन वरुन * 99 # डायल करा. आपल्या बँकेचे नाव भरा (फक्त पहिली तीन आद्याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिली चार अक्षरे, फंड ट्रान्स्फर- MMID हा ऑप्शन निवडा. ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि MMID टाका, द्यावयाची रक्कम आणि MPIN स्पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा. यानंतर आपण आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात.
 3) ई वॅलेट : एसबीआय बडी प्रमाणे वॅलेट डाऊन लोड करा, आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा, त्याला आपल्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी लिंक करा, आता तुमचा फोन हेच तुमचे वॅलेट अर्थात पैशाचे पाकीट झाले आहे.
4) कार्डस्‍ : आपली आर्थिक देयके आपल्या प्रिपेड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करा. आपले कार्ड स्वाईप करा, आपला पिन नंबर टाका, पावती घ्या.
5) आधार संलग्न पेमेंट पद्धती : आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी संलग्न करा. आपण आपली देवाण-घेवाण, खात्यावरील शिलकेची चौकशी, पैसे जमा करणे, काढणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पाठविणे हे सर्व व्यवहार करु शकता.

0000000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
कृषि विकास व शेतकऱ्यांची यशोगाथा मांडण्यासाठी
'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 जाहीर
लघुपट सादर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

नांदेड, दि. 30 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे  राज्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर 'महाराष्ट्र माझा शेतकरी राजा' लघुचित्रपट स्पर्धा 2016 आयोजित करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी या स्पर्धेची घोषणा केली  आहे. या स्पर्धेसाठी लघुपट सादर करण्यास शनिवार 31 डिसेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्या लघुचित्रपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
लघुचित्रपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या लघुचित्रपटांची मालकी ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राहील. लघुचित्रपट हा तीन ते पाच मिनिटे कालावधीचा असावा. चित्रीकरण HD गुणवत्तेचे असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुचित्रपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी हे लघुचित्रपट शनिवार 31 डिसेंबर 2016 पर्यंत dgiprnews01@gmail.comया ई-मेलवर पाठवावेत. लघुचित्रपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे.  जुने चित्रिकरण असलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे.
परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुचित्रपटास पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धक लघुचित्रपटाच्या सीडीज् आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी सागरकुमार कांबळे, सहायक संचालक (माहिती) 8605312555 यांचेशी  संपर्क साधावा.
0000000


Tuesday, November 29, 2016

थंडीत कुडकुडणाऱ्यांना निराधार… निराश्रीतांना मिळाले
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या संवेदनशीलतेचे पांघरूण
नांदेड शहरात रात्रीच्या फेरफटक्यात अनेकांना पांघरल्या शाली

नांदेड दि. 30 :- हाडे गोठविणाऱ्या थंडीतही काहींना उघड्यावर आश्रय घेण्याशिवाय गत्यंतर नसते. अशा काहींसाठी मंगळवार 30 नोव्हेंबर 2016 रात्री उबदार संवेदनशीलतेची ठरली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी रात्री उशिरा नांदेड शहरातील काही भागात फेरफटका मारत, अनेकांच्या अंगावर आपल्या संवेदनशीलतेची उबदार माया पांघरली. त्यामुळे अनेक निराधार, भटके, कष्टकऱ्यांना निद्रेच्या अधीन असतानाच थंडीपासून बचावासाठी दिलासा मिळाला. जिल्हाधिकारी काकाणी यांच्या या संवेदनशीलतेला तरुणाईंनेही टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. जिल्हाधिकारी काकाणी यांनी यातून प्रशासन शिरस्त्यातही मानवी आस्थेचा हा निर्झर जपल्याचा वस्तूपाठ समोर ठेवला.
कडाक्याच्या थंडीच्या दिवसातही अनेक कष्टकरी, निराधार, भटक्यांना दिवस उजाडण्यासाठी रात्र उघड्यावरच काढावी लागते. त्यांच्यासाठी धरणी अंथरूण आणि आकाश पांघरूण होते. काहीजण मिळेल, त्या गोष्टी पांघरूण कशीबशी रात्र काढतात. कित्येकदा रात्री उशिरापर्यंत चालणारे कार्यालयीन कामकाज संपवून परतताना, जिल्हाधिकारी काकाणी यांनी ही तगमग टिपली. त्यातूनच या लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली आणि ती आपल्या मोजक्याच सहकाऱ्यांच्या मदतीने तडीसही नेली. मंगळवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी काकाणी यांची दिव्याची गाडी घरून निघाली, तेव्हा बहुधा अनेक निराधार, उघड्यावर झोपलेल्यांना कल्पनाही नसेल, की आपल्या अंगावर थेट जिल्हा प्रशासनाचा प्रमुखच संवेदनशीलचे उबदार शाल पांघरणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतरच जिल्हाधिकारी काकाणी यांची नजर अशा निराधार, थंडीपासून बचावासाठी मुटकूळे करून पडलेल्यांचा शोध घेऊ लागली. मध्यवर्ती बसस्थानकात अशा अनेकांना जिल्हाधिकारी काकाणी यांनी पांघरूण घातले. कित्येकांची झोप मोड होऊ न, देता. थंडीपासून बचावासाठी आडोसा घेतलेल्यांना शोधून-शोधून पांघरूण देण्यात आले.
रात्री-अपरात्री प्रवासानंतर परतताना, रेल्वे स्थानकाच्या प्रांगणातही असे अनेक निराधार झोपलेले दृश्य, मनावर ठसलेले. त्यातूनच जिल्हाधिकारी काकाणी आणि सहकारी हुजूर साहीब नांदेड रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच्या प्रांगणात पोहचले. तिथेही झोपलेल्या निराधारांना, ज्येष्ठांच्या अंगावर शाल पांघरण्यात आल्या. आपल्यासाठी इतक्या रात्री, अशी संवेदनशीलतेची उब घेऊन, कुणी समोर उभे राहील ? अशी कल्पनाही नसलेल्यांसाठी जिल्हाधिकारी काकाणी यांनी पांघरूण देणे विस्मयकारक ठरले. त्यामुळे विस्फारलेल्या नजरेत कृतज्ञतेचे भाव आणि जोडलेले हात अशी अनेकांची स्थिती होती. रेल्वेस्थानकातून बाहेर पडतानाही, थंडीपासून बचावासाठी प्लॅास्टीक-कापडाचा आधार घेतलेल्यालाही आवर्जून बोलावून शाल देण्यात आली.  रेल्वे स्थानकाच्या गोकुळनगर प्रवेशद्वाराच्या आणि तिथल्या तिकीट घराच्या समोरही अनेकजण निद्रेच्या अधीन झालेले. रात्रीचे साडेअकरा वाजलेले, उशिरांच्या गाड्यांसाठी प्रतिक्षेत असलेल्यांसाठी जिल्हाधिकारी काकाणी स्वतः निराधारांना पांघरूण घालत असलेल्याचे पाहून आश्चर्यमिश्रीत चर्चा सुरु झाली. काही तरूणांचे मोबाईलचे कॅमेरे लखलखू लागले...आणि एका तरुणाने जिल्हाधिकारी यांच्या या कृतीला दाद म्हणून ओरडूनच आवाहन केले, आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. असा कडकडाट एकदा नाही... तर मग दोनदा झाला.. काही तरुणांनी धाडसाने पुढे होऊन जिल्हाधिकारी काकाणी यांच्यासोबत सेल्फींही घेतले, आणि त्यांच्याप्रती कौतुकाचे उद्गारही काढले. त्यांचा विनम्रतापुर्वक स्विकार करत जिल्हाधिकारी काकाणी पुढे मार्गस्थ झाले...

0000000
नांदेडचे जवान कदम यांना
वीरमरण, पार्थिव आज पोहचणार
नांदेड, दि. 29 :-  जम्मू-काश्मिरमधील नागरोटा येथील लष्करी तळावरील अतिरेक्यांच्या हल्ल्यातील चकमकीत 5-मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी यशवंत कदम ( वय 33) यांना वीरमरण आले. शहीद कदम हे जानापुरी ता. लोहा येथील वीरपुत्र आहेत. शहीद कदम यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कराचे औरंगाबाद मुख्यालय यांच्याकडून समन्वयाने व्यवस्था करण्यात येत आहे. बुधवार 30 नोव्हेंबर 2016 रोजी पार्थिव नांदेड येथे पोहचणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लष्कर सातत्यपुर्ण संपर्कात आहेत.
शहीद कदम यांच्या मागे वडील यशवंत, आई लताबाई, पत्नी शितल आणि मुलगी तेजस्विनी असा परिवार आहे.
जवान कदम यांच्या वीरमरणाबाबत जिल्हा प्रशासन तसेच जानापुरीचे सरपंच बळी पाटील यांना आज लष्करी मुख्यालयाकडून माहिती कळविण्यात आली. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी तातडीने लष्करी मुख्यालयाच्या संपर्कात राहून शहीद कदम यांचे पार्थिव नांदेडकडे आणण्यासाठी विविध यंत्रणाशी समन्वय साधला. शहीद कदम यांचे पार्थिव उद्या बुधवार 30 नोव्हेंबर,2016 रोजी नांदेड येथे पोहचणार आहे. त्यानंतर पार्थिवावर जानापुरी येथे लष्करी इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी लष्कराच्या औरंगाबाद मुख्यालयातील पथक नांदेडकडे मार्गस्थ झाले आहे. भारतीय लष्कराच्यावतीने तसेच जिल्हा पोलीस दलाच्यावतीने वीरपुत्र कदम यांना मानवंदना दिली जाणार आहे.
जानापुरी येथील या व्यवस्थेसाठी विविध यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह विविध यंत्रणांना जानापुरी येथे पोहचल्या. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, त्यांचे सहकारी आणि कंधारच्या प्रभारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, लोहा तहसिलदार शिल्पा श्रृंगारे आदींनीही यंत्रणांशी समन्वय साधत आहेत.
पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडून शहीद कदम यांना श्रद्धांजली
पालकमंत्री दिवाकर रावते यांनी शहीद कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, दहशतवाद्यांशी लढताना जम्मू-कश्मिरमधील नागरोटा क्षेत्रात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीर मरण आले. त्यातील एक नांदेड जिल्ह्याचा अर्थात मराठवाड्याचा. निजामाशी दोन हात करुन लढणारा हा मराठवाडा. या मराठवाड्यातील संभाजी कदम या वीरपुत्राने आपल्या जीवातला जीव असेपर्यंत दहशतवाद्यांशी सामना केला. मात्र यात तो धारातिर्थी पडला. त्याच्या शौर्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत. मराठवाडा ही भूमि संघर्षाची, निजामाशी लढणारी, त्यामुळे मराठवाड्यातील हा भूमिपुत्र दहशतवाद्याशी लढताना धारातिर्थी पडला. या वीरपुत्राला भावपूर्ण श्रध्दांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर देवो.

00000000
डिसेंबरचा लोकशाही दिन रद्द
नांदेड दि. 29 :- जिल्ह्यात नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सोमवार 5 डिसेंबर 2016 रोजीचा नियोजित लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याचा पहिला सोमवार म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात येतो.

000000
कापुस, तुर पिक संरक्षणासाठी 
कृषि विभागाचा संदेश
नांदेड, दि. 29 :- जिल्ह्यात कापुस व तुर पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.
कपाशीवरील फुले येणाच्या व बोंडे निर्मितीच्या अवस्थेत जर पाने लाल पडत असतील तर मॅग्नेशिअम सल्फेट 0.2 टक्के 20 ग्रॅम प्रती 10 लिटर किंवा युरिया 2 टक्के पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीसाठी सायपरमेथ्रीन 10 टक्के प्रती 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के सायपरमेथ्रीन 5 टक्के ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
तुर पिकांवरील शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब 14.5 एससी 0.50 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000000
कृषि निविष्ठांची खरेदी ऑनलाईन करण्याचे आवाहन
नांदेड दि. 29 :-  बियाणे खते व किटकनाशके या कृषि निविष्ठांची खरेदी शेतक-याकडून केली जाते. या कृषि निविष्ठांची बहतांशी खरेदी रोखीने केली जाते. सध्याच्या रोख चलन टंचाईमुळे अशा खरेदीवर अडचणी येऊ नयेत म्हणून शेतक-यांनी ऑनलाईन पध्दतीने खरेदीची रक्कम अदा करण्याची पध्दत अवलंबविणे आवश्यक झाले आहे. सध्याच्या चलनी नोटा उपलब्धता, सुट्टयांचा प्रश्न लक्षात घेवून कृषि निविष्ठांची ऑनलाईन खरेदीबाबत कृषि आयुक्त यांनी परिपत्रक काढले आहे.
            शेतकरी त्याचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बॅकेतून NEFT (National Electronic Fund Transfer) द्वारे निविष्ठा विक्री केंद्र धारकाच्या खात्यावर निविष्ठा खरेदी बिलाची रक्कम जमा करु शकतात. त्यासाठी शेतक-याने ज्या दुकानातुन कृषि निविष्ठा घ्यावयाच्या आहेत त्या दुकानदाराकडून घ्यावयाच्या निविष्ठांची रक्कम निश्चीत करुन घ्यावी व दुकानदाराकडून त्याची कच्ची पावती व दुकानदाराचे बॅक खाते क्रमांक व बॅके संदर्भातील तपशिल जसे आय.एफ.एस.सी. कोड लिहून घ्यावे. हे तपशिल शेतक-याचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बॅकेकडे देऊन घ्यावयाच्या निविष्ठांच्या रक्कमेएवढी डेबीट स्लीप बॅकेस भरुन दयावी. यानंतर बॅकेद्वारे शेतक-याच्या खात्यावरुन परस्पर दुकानदाराच्या खात्यावर निविष्ठाची रक्कम जमा होईल. बॅक शेतक-याला पोच म्हणून UTR (Unique Trasaction Reference Number) देईल. बॅकेद्वारे प्राप्त झालेली UTR (Unique Trasaction Reference Number) शेतक-याने दुकानदाराला द्यावी व त्या आधारे दुकानदाराने शेतक-याला कृषि निविष्ठा दाव्यात. या पध्दतीचा शेतक-यांनी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

Monday, November 28, 2016

कामगारांचे बँक खाते उघडण्याचे
कामगार आयुक्तांचे आवाहन
नांदेड दि. 28 :-  जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी कामगारांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आस्थापनांनी कामगारांचे बँक खाते उघडावेत, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
याबाबतच्या आवाहनात म्हटले आहे की, कामगारांचे वेतन नियमित व वेळेवर होण्यासाठी बँक खाते आवश्यक आहेत. तसेच कामगारांना आर्थिक प्रक्रियेत समाविष्ट करणे आवश्यक त्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे. किमान वेतन अधिनियम 1948 व वेतन प्रदान अधिनियम 1936 अंतर्गत कामगारांचे वेतन त्यांचे बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. असोसिएशन, संघटनेचे सभासद असलेल्या आस्थापनांना, मालकांना त्यांचेकडील कायम, कंत्राटी, हंगामी स्वरुपाच्या कामगारांची बँक खाते उघडण्याबाबत संबंधित कामगारांना सूचित करावे. यासाठी शासनाने बँकांना कामगारांचे खाते उघडण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासंदर्भात कामगारांना मार्गदर्शन करावे. तसेच कामगारांचे वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त बी. एम. मोरुडे यांनी केले आहे.

000000
जिल्‍ह्यात खरीप हंगामासाठी
आधारभूत किंमत खरेदी केंद्रांना मान्‍यता
नांदेड, दि. 28 :- जिल्‍ह्यातील सन 2016-17 खरीप पणन हंगामासाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्‍य, धान खरेदी केंद्रांना शासनाकडून मंजूरी देण्‍यात आली आहे. शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा याहेतून खरेदी केंद्र उघडण्‍याकरीता व ज्‍वारी, बाजरी, मका ही भरडधान्‍य व भाताची खरेदी करण्‍यासाठी जिल्‍ह्यात 17 केंद्रांना मंजूरी देण्‍यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
नांदेड जिल्‍ह्यात मार्केटींग फेडरेशनने प्रस्तावित केल्‍यानुसार 13 आधारभू‍त खरेदी केंद्रास तर आदिवासी विकास महामंडळाने प्रस्‍तावित केलेल्‍या 4 आधारभूत केंद्रांना मान्‍यता देण्‍यात आली आहे. ही मंजूर केंद्रे अशी तालुका सहकारी शेतीमाल खरेदी विक्री संघ कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, नायगाव, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, भोकर. नांदेड जिल्‍हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संघ नांदेड तसेच आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्र किनवट, मांडवी, इस्‍लापूर व वाई असे एकूण 17 केंद्रांना मंजुरी दिलेली आहे या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000000
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2017 मधील
स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 28 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयोगाचे अवर सचिव सु. ह. अवताडे यांनी दिली आहे.  
            सन 2017 मध्ये विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : (१) राज्यसेवा परीक्षा 2017 ची जाहिरात डिसेंबर, 2016 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 02 एप्रिल, 2017 रोजी होईल तर मुख्य परीक्षा दि. 16,17,18 सप्टेंबर, 2017 अशी तीन दिवस असेल. (2) पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 12 मार्च, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 11 जून, 2017 रोजी होईल. (3) सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 30 एप्रिल, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 06 ऑगस्ट, 2017 रोजी होईल. (4) लिपिक टंकलेखक परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी,2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 14 मे, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 03 सप्टेंबर, 2017 रोजी होईल. (5) दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 21 मे, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 08 ऑक्टोबर, 2017 रोजी होईल. (6) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 02 जुलै, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 15 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. (7) महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 04 जून, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 24 सप्टेंबर, 2017 रोजी होईल. (8) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 09 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 व महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 26 नोव्हेंबर, 2017 रोजी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 17 डिसेंबर, 2017 रोजी, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 24 डिसेंबर, 2017 रोजी होईल. (9) सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. 25 जून, 2017 रोजी होईल. 10) सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 16 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, दि. 05 नोव्हेंबर,2017 रोजी, सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2017, दि. 10 डिसेंबर, 2017 रोजी, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, दि. 07 जानेवारी,2018 रोजी होईल. (11) कर सहायक परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 20 ऑगस्ट 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 31 डिसेंबर, 2017 रोजी होईल. (12) महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 30 जुलै, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 17 डिसेंबर, 2017 रोजी होईल.(13) विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात सप्टेंबर, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. 05 नाव्हेंबर, 2017 रोजी होईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या www.mpsc.gov.in, https://mahampsc. mahaonline.gov.in या संकेतस्थळांस भेट द्यावी. शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे वरील अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकाबाबतची अद्ययवत माहिती वेळोवेळी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

000000
रब्बी हंगामातील पाणीपाळीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :-  शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 ऑक्टोंबरच्या उपयुक्त साठ्यावर रब्बी हंगाम सन 2016-17 मधील उभ्या पिकांना पिक संरक्षणात्मक एक पाणीपाळी 10 डिसेंबर 2016 पासून देण्यात येणार आहे. लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना नंबर 7, 7 अ , सोबत मागील थकबाकीची एक तृतीअंश पाणीपट्टी व चालू अग्रीम पाणीपट्टी संबंधीत शाखा कार्यालयात भरणा करावी. राज्य जलसंपदा विभागाने निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची संबंधीत लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

0000000
केळी पिक संरक्षणासाठी
कृषि विभागाचे संदेश
नांदेड, दि. 28 :-   उपविभागीय कृषि कार्यालय नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापूर तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिकांवर प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. पिवळ्या रंगाचे डाग पानावर दिसून आल्यास त्वरीत कार्बेडॅझिम 50 डब्लु,. पी 0.1 टक्के एक ग्रॅम प्रती लिटर पाण्यात एक मि.ली. स्टीकर टाकुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
  कौमी एकता सप्ताह संपन्न
नांदेड, दि. 28 :- दरवर्षी 19 ते 25 नोव्हेंबर 2016 दरम्यान कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानुसार शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करुन सप्ताह साजरा करण्यात आला.
 सप्ताहानिमित्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी  व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात दररोज परिपाठावेळी एक प्राध्यापक व एक प्रशिक्षणार्थी यांनी कौमी एकता सप्ताहानिमित्त आपआपल्या विचारानूसार व्याख्याने दिली. तसेच महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बी. एड. प्रशिक्षणार्थ्यांना निरनिराळया गटात विभाजन करून गटनिहाय भित्तीपत्रक निर्मिती व विमोचन करण्यात आले.
            कौमी एकता सप्ताह समाप्ती कार्यक्रमात प्रा. डॉ. साबळे यांनी कौमी एकता ही संकल्पना सविस्तरपणे विशद करीत असतांना भारत हे प्राचीन राष्ट्र कसे आहे हे स्पष्ट करून सागितले. सप्ताह समापन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे होत्या. प्रा. श्रीमती सत्यशिला सोळुंके यांनी सप्ताहाचे संयोजन केले.

000000
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने
विद्यापीठात संविधान दिन साजरा
नांदेड दि. 28 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  नांदेडच्यावतीने स्कुल सोशल सायन्स, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापी, नांदेड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने कायदे विषय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,  न्या. . आर. कुरेशी हे होते. यावेळी जिल्हा न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. सिरसाठ,  प्रा. सौ. उषा एस. सरोदे, अॅड. विजयकुमार भोपी, अॅड. सुभाष ढाले, अॅड. श्रीमती सुकेशणी वासणीक, अॅड. सिध्देष्वर खरात आदी उपस्थित होते.
            सुरूवातीस मुंबई मधील 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्यिषिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. शाहीर शेषराव वाघमारे यांच्या संविधानपर पोवाडयाने कार्यक्रमास सुरूवात झाली. न्या. कुरेशी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संविधान एक वैश्विक दृष्टी असलेले दस्तऐवज राष्ट्रग्रंथ आहे.त्यामुळे ब्रिटीश विचारवंत अनैस्ट बार्कर यांनी जग केस असावे, तर भारतीय संविधाना सारखे असावे असे गौरवोद्गार काढल्याचे त्यांनी सांगीतले. न्या. श्रीमती सिरसाठ, अॅड. सुकेशणी वासणीक, अॅड. सिध्देश्वर खरात, अॅड. सुभाष ढोले यांची भाषणे झाली. विधी सेवा प्राधिकरणातर्फे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती असलेली माहिती पत्रके वाटण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भोपी, अॅड. राणा सारडा, अॅड. विशाखा जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन प्रा. सौ. उषा सरोदे यांनी केले तर प्रा. बाबूराव जाधव यांनी आभार मानले.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...