Tuesday, October 7, 2025

 वृत्त क्रमांक  1065 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे आज ऑनलाईन उद्घाटन 

नांदेड, दि. ७ ऑक्टोबर :  ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एकाच वेळी राज्यातल्या ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे, अशी माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे दिली. 

कामगार हा समाजाचा अविभाज्य घटक असून या घटकाचा सन्मान झाला पाहिजे हा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला असून याच अनुषंगाने कामगारांचा सन्मान करण्यात येत असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत असतानाच  राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मांच्या हस्ते अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड संस्थेत विश्वकर्मा मारोती पांचाळ  यांच्या हस्ते 8 अल्पमुदत अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी  स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार  रविंद्र  चव्हाण, विधान परीषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरीद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात विश्वकर्मा अर्थात कामगार वर्गाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांचा विचार आम्ही या निमित्ताने पुढे घेऊन जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी नमूद केले आहे. याच संकल्पनेतून  प्रस्तूत संस्थेमध्ये आयोजित या कार्यक्रमात कामगारांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून चालू वर्षात ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प कौशल्य विभागाने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग व्यवस्थापन समित्या (IMC) स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे. 

या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यात अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, लातूर, नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक  1064 

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ 

नांदेड, दि. ७ ऑक्टोबर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंडळाने केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या इयत्ता दहावी फेब्रु-मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखांना 7 ते 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

माध्यमिक शाळांनी दिनांक 15 सप्टेंबर, 7 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नियमित शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये "Draft चा Send to Board Payment Status मध्ये Not Paid चा Paid असा बदल झाला आहे का याची खात्री करावी. शुल्क जमा केलेली आरटीजीएस/एईएफटीसह पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व माध्यमिक शाळाप्रमुख, मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी. 

सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी.. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी. 

इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी UDISE + मधील PEN-ID मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर UDISE + मधील PEN-ID वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. 

पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्रमांक  1065

देगलूर नाका बीट अंतर्गत ८ वा “राष्ट्रीय पोषण माह” उत्साहात साजरा

नांदेड, दि. ७ ऑक्टोबर – बाल विकास प्रकल्प कार्यालय, नागरी प्रकल्प नांदेड शहर अंतर्गत देगलूर नाका बीटमध्ये ८ वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रम्हपुरी चौफाळा चौक येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांनी विविध वेशभूषा परिधान करून पोषण विषयक जनजागृती केली. श्रीमती मीनाक्षी सोने यांनी वासुदेवाच्या वेशात सन २०२५ मधील “पोषण माह”च्या विविध थीम्सची माहिती दिली. श्रीमती संगीता माड यांनी भारूड या लोककलेच्या माध्यमातून ICDS योजनेतील सेवा व भरड धान्याचे महत्त्व यावर सादरीकरण केले, तर श्रीमती संगीता गाजलवाड यांनी निरोगी आरोग्यासाठी आवश्यक फळे व भाज्यांचे महत्त्व गाण्यातून सादर केले.

‘Vocal for Local’ या थीम अंतर्गत ग्रामीण जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडविण्यात आले. तसेच ‘पोषण भी पढ़ाई भी’ या थीमनुसार लाभार्थी बालकांनी व महिलांनी विविध क्षेत्रांतील भूमिका वेशभूषेतून साकारल्या. किशोरी मुलींच्या रॅली व लेझीम सादरीकरणाद्वारे पोषण जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्यसेविका श्रीमती सुषमा शिसोदे यांनी केली. अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बाल संगोपनात पुरुषांचा सहभाग आणि आरोग्यदायी सवयींचे महत्त्व यावर भर दिला.

या प्रसंगी मुख्यसेविका श्रीमती गुंडारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले, तर पोलीस पाटील सिरमेवार यांनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी मुख्यसेविका श्रीमती गुंडारे, पैंदे, गरूड, शिसोदे आणि खिराडे उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका वर्षा गवारे, अश्विनी महल्ले, विजया जाधव तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

00000



 वृत्त क्रमांक  1064 

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

 

नांदेडदि. ७ ऑक्टोबर :  हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असूनत्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली.

 

बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी एकत्रित समन्वय ठेवून काम करावेतसेच नेमून दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीतअशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात सुमारे चार लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असूनभाविकांच्या निवासभोजन व पार्किंग व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुखअतिरिक्त पोलिस अधीक्षक सुरज गुरवतसेच माजी उपमहापौर सरजीतसिंग गिलरणजितसिंग गिलतेजसिंग राजेदसिंग बावरी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यात आला असूनभाविकांना सर्व सुविधांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

0000





वृत्त क्रमांक  1063

नांदेडमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या पूर्व नियोजन बैठक संपन्न

वृत्त क्रमांक  1062

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालयांमध्ये अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण

नांदेड, दि. ७ ऑक्टोबर : राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच उद्योग क्षेत्राला आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी “मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम” राबविण्यात येणार आहे. दरवर्षी ७५ हजार युवकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या योजनेचे उद्घाटन बुधवार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये विविध आधुनिक आणि उद्योगसापेक्ष अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
अभ्यासक्रमांमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), ड्रोन तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल रिपेअर टेक्निशियन, अॅपरेल इलेक्ट्रॉनिक्स, सोलार टेक्निशियन, सायबर सुरक्षा, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणांत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी निर्दिष्ट ऑनलाईन लिंकद्वारे आपली इच्छुकता नोंदविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड किंवा संबंधित तालुक्यातील प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

वृत्त क्रमांक  1061

आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ मार्फत परिचयात्मक सराव सत्रास सुरुवात 

नांदेड, दि. 7 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA) यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात दिनांक ६ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाबाबत परिचयात्मक सराव सत्र (Familiarization Exercise Program 2025-26) आयोजित करण्यात आले आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी कार्यालय यांच्यावतीने करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे. 

प्रशिक्षणाचे संचालन NDRF 5 बटालियन पुणे युनिट मार्फत कमांडर रवींद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय पथकाद्वारे करण्यात येत आहे. प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे आणि म. सहायक बारकुजी मोरे यांनी केले आहे. 

 दि. ६ ऑक्टोबर रोजी या प्रशिक्षणाचा प्रारंभ नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी येथील जि.प. हायस्कूलमध्ये झाला. या प्रसंगी पूर, भूकंप इत्यादी आपत्ती प्रसंगी करावयाच्या उपाययोजना, CPR प्रक्रिया, आपत्ती प्रसंगी वापरायचे साहित्य व साधने, तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध साधनसामग्रीतून बचाव साहित्य तयार करण्याच्या पद्धतींचा प्रत्यक्ष सराव घेण्यात आला. 

कार्यक्रमास NDRF युनिट अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्ती समितीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, स्थानिक अधिकारी, गावकरी, विद्यार्थी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे आणि सहायक गौरव तिवारी हे उपस्थित राहिले. 

पुढील प्रशिक्षण सत्र दि. ७ ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर (बिलोली) येथे आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच महसूल, नगरपरिषद, पोलीस व पंचायत विभागातील स्थानिक शोध व बचाव पथक सदस्यांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

00000









    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...