वृत्त क्रमांक 948
भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन विषयावर चर्चासत्र संपन्न
नांदेड दि. 9 सप्टेंबर :- भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा विविध भाषा बोलल्या जातात. या विविध भाषेने समृद्ध असलेला नांदेड हा भारतातला एकमेव जिल्हा असून आपण सर्वांनी जिल्ह्यातील भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
आज नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या विषयावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर तसेच वारसा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे बोलत होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय.कुलकर्णी, वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.पी.कुलकर्णी, नायब तहसिलदार मकरंद दिवाकर, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासचंद काला, सहसचिव धनजंय जोशी, इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कोटूरवार, माजी कुलगुरु डॉ. कल्याणकर, मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरचे राजेश महाराज देगलूरकर, किल्लेदार ॲड . ओम गिरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात पुरातन स्थळे मोठया प्रमाणात असून या स्थळांच्या संवर्धनासाठी शासनाच्यावतीने विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. लवकरच नांदेड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सज्ज असणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन याबाबतची चर्चासत्रे न राहता हे कृतीशिलतेकडे नेता आली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
नांदेड जिल्ह्यातील पुरातत्व संवर्धन अनुषंगाने गडकिल्ल्यासाठी निधी राखीव ठेवला आहे. पुरातन स्थळ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली असून कंधार किल्ल्यातील तटबंदी मधील गाळ काढण्याची मोहीम नियोजित आहे. होट्टल येथील जमीन संपादनाचे काम संपुष्टात आले असून, माहूर येथील पर्यटन संदर्भाने सोयी सुविधा उभारण्याच्या कामाला गती दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिली.
यावेळी लक्ष्मणराव संगेवार यांनी नांदेड जिल्हृयातील अमुर्त कला वारसा, चंद्रकला पोतदार यांनी नंदगिरी किल्ला, सुरेश जोंधळे यांनी होट्टल, करडखेड, येरगी या विषयावर, प्रमोद देशपांडे यांनी राहेर/सगरोळी, डॉ. अरविंद सोनटक्के यांनी दशरेश्वर मंदिर/बारव मुखेड, प्रा. राजश्री भोपाळे यांनी अर्धापूर केशवराज मंदिर, डॉ. सुभाष रगडे यांनी कंधार, बहादरपूरा, सप्तमातृका, प्रा. डॉ. वसंत कदम यांनी परमेश्वर मंदिर/शिऊर लेणी, हिमायतनगर, हदगाव याविषयावर तर प्रा. डॉ. दत्ता जाधव यांनी किनवट, माहूर याविषयावर, डॉ. गंगाधर देशमुख यांनी मुक्रमाबाद येथील खडकेश्वर महादेव मंदिर व मुर्ती शिल्प, गजानन सुरकुटवार यांनी तामसा येथील शिवपुरी मंदिर, डॉ. विजयकुमार कुलकर्णी यांनी शिवलिंग बादशहा मठसंस्थान बेटमोगरा या विषयावर सादरीकरण केले.
00000

