Thursday, August 28, 2025

 ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

वृत्त क्रमांक 910 

नायगाव तालुक्यात दोन ठिकाणी पुराच्या पाण्यातून

नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे काढले बाहेर

नांदेड दि. 28 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात 28 ऑगस्ट 2025 रोजी 17 मंडळात अतिवृष्टी व पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. नायगाव खै तालुक्यात 5 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. नायगाव तालुक्यातील नरसी गावात अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. तसेच देगलूर उदगीर रोड बंद झाला आहे. बिलोली नरसी रोड बंद झाला आहे. या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जलसंपदा विभागाच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील नदी, नाल्यांना येणाऱ्या पूरपरिस्थितीचा ते आढावा घेत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील दत्तनगर/शंकरनगर भागातील घरामध्ये पाणी शिरले. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने दोन ते तीन कुटूंबातील नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यानंतरही दोन कुटूंबे अडकली होती. या दोन कुटूंबातील नागरिकांना नांदेड येथील मनपाच्या अग्नीशामक बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलविले. यामध्ये एकनाथ वाघमारे, सोनी एकनाथ वाघमारे, प्रज्ञा एकनाथ वाघमारे, प्रशिक एकनाथ वाघमारे, अनुसया भुजंगराव वाघमारे, कवीता सुभाषराव वाघमारे, सुशांत सुभाषराव वाघमारे, चाँद पठाण, आसमा चाँद पठाण, मोहम्मद  चाँद पठाण, ऐशिया चाँद पठाण यांची सूटका या पथकाने केली. 

तसेच नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे हळदा रोडवर स्कुलबस मध्ये 18 विद्यार्थी एक शिक्षक व ड्रायव्हरसह गाडी पुराच्या पाण्यात अडकली होती. नाल्यावरुन भरपूर पाणी वाहत असल्यामुळे गावातील नागरिक, महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांनी मानवी साखळी निर्माण करुन या सर्वाना सुरक्षित ठिकाणी हलविले. आता परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी क्रांती डोंम्बे यांनी दिली आहे.  

हवामानाचा व पावसाचा अंदाज घेवून काल संध्याकाळी एसडीआरएफची टीम देगलूर येथे पाठविण्यात आली होती. या टीमने सांगवी उमर, मेदनकल्लूर, शेळगाव, तमलूर या पूरपरिस्थीती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी 2 हजार 251 नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे कार्य या टीमने केले आहे. आज सीआरपीएफची टिम नायगावला बचाव कार्य करुन धर्माबादला गेली आहे. तसेच  एसडीआरएफची टिम कंधारला बचाव कार्यासाठी पाठविली आहे. तसेच मनपाचे शोध बचाव पथक नायगाव तालुका येथे पोहोचून दोन यशस्वी बचावकार्य केले आहेत. 

सध्या सर्व जिल्ह्यात काही मंडळात मोठया प्रमाणात पाऊस सुरु असून नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000













 *विशेष लेख:*

 वृत्त क्रमांक 909 

सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम  

नांदेड दि. 28 ऑगस्ट :-  नांदेड ज‍िल्हयात व‍िव‍िध ठ‍िकाणी सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीम 15 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात झाली. या जनजागृती रथाची शेतकऱ्यांच्या आरोग्याचे तसेच शेती उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी "सुरक्षित फवारणी जनजागृती रथ" कृषी व‍िभाग व धानूका कंपनी ही नोडल एजन्सी म्हणून नांदेड ज‍िल्हयासाठी नेमण्यात आलेली असून यांच्या संयुक्त व‍िघमानाने सुरक्षित फवारणी रथाद्वारे शेतकरी जनजागृती मोहीमेची सुरवात  झालेली आहे. या अभियानाचा शुभारंभ ज‍िल्हा अध‍िक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अभ‍ियानाचा रथ मार्गस्थ केला. 

या रथाच्या माध्यमातून ज‍िल्हातंर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षाविषयक उपाययोजना, योग्य फवारणी पद्धती, वैयक्तिक संरक्षक साधनांचा, पीपीई किट वापर तसेच पर्यावरणपूरक पद्धतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी जिल्हा अध‍िक्षक कृषि अध‍िकारी नांदेड, उपव‍िभागीय कृष‍ि अध‍िकारी व तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सुलभ भाषेत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. 

जनजागृती रथ आतापर्यंत क‍िनवट तालुक्यात जलधारा, मा. कोलारी, सावरगाव, धानोरा, बोडखेंडा, इस्लापूर. ह‍िमायतनगर तालुक्यात कोसमेट, मुळझरा, वासी. लोहा तालुक्यातील सोनखेड, सुनेगाव, मडकी, कलंबर, भोपाळवाडी. कंधार तालुक्यातील ब‍िजेवाडी, शेकापूर, बाचोटी, फुलवळ, घोडज इत्यादी ठ‍िकाणी सदर जनजागृती रथाद्वारे जनजागृती करण्यात आली असून ज‍िल्हयातील व‍िव‍िध उर्वरीत तालुक्यातील गावामध्ये जनजागृती रथाद्वारे शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसाठी मास्क, हातमोजे, चष्मा, गमबूट यासारख्या साधनांचा वापर कसा करावा, औषधांची मात्रा योग्य कशी ठरवावी, तसेच फवारणीनंतर शरीर स्वच्छता व कपड्यांची निगा कशी ठेवावी याविषयी प्रात्यक्षिकासह विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून मोठया प्रमाणात जनजागृती होणार असून सुरक्ष‍ित फवारणी जनजागृती मोह‍िमेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 908 

गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम  

नांदेड दि. 28 ऑगस्ट :- जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सीएसआर फंडामधून स‍िजेंन्टा इंड‍िया ल‍ि. कंपनी व महाराष्ट्र शासन कृष‍ि व‍िभाग यांच्या संयुक्त व‍िघमानाने गुलाबी बोंडआळी अभ‍ियान जनजागृती रथाची 15 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. या जनजागृती रथाचे उद्घाटन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. या जनजागृती मोह‍िमाचा ज‍िल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ज‍िल्हा अध‍िक्षक कृष‍ि अध‍िकारी यांनी केले आहे. यावेळी कृष‍ि उपसचांलक श्री वानखेडे, ज‍िल्हा गुणन‍ियंत्रण न‍िरीक्षक श्री पेकम व प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती गुंजकर यांच्या उपस्थ‍ितीत पार पडले. यावेळी कंपनीचे प्रत‍िन‍िधी सुद्धा उपस्थ‍ित होते. 

सदर मोहिमेची आत्तापर्यंत नांदेड, धर्माबाद, उमरी, ब‍िलोली, नायगाव या तालुक्यामधील व‍िव‍िध गावांमध्ये गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माह‍िती पत्रक वाटून जनजागृती रथाद्वारे जनजागृती केलेली आहे. ज‍िल्हयातील उर्वरीत सर्व तालुक्यात वेगवेगळया गावामध्ये टप्याटप्याने जनजागृती रथ फ‍िरणार असून मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार आहे. गुलाबी बोंडआळी संदर्भांत शेतीशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये शेतक-यांनी गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व‍िव‍िध उपयोजनेची माह‍िती सदर शेतीशाळेत म‍िळणार असून त्या शेतीशाळाचा सुद्धा शेतक-यांनी लाभ घ्यावा. एक ज‍िल्हास्तरीय व तीन तालुकास्तरीय गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यशाळा आयोज‍ित करण्यात येणार आहेत.

0000





वृत्त क्रमांक 907

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 28ऑगस्ट :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर 450 रुपये तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745रुपये इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्ट 2025 रोजीपर्यत 1 लाख 8 हजार 968 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली असून 52 हजार 340 इतक्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे.  एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 30 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 906

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 28 ऑगस्ट :- विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एकरकमी 10 हजार व 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाच्यावतीने देण्यात येतो. तरी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक / पत्नी व त्यांच्या पाल्यांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह 15 सप्टेंबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक व लिपिक यांचा मोबाईल क्रमांक 8698738998, 8707608283 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

सन 2024-25 या वर्षासाठी कल्याणकारी निधितून विशेष गौरव पुरस्कार उत्कृष्ट क्षेत्रातील कामगिरी नुसार प्रदान केला जाणार आहे. इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य, इत्यादी क्षेत्रातील राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी विद्यापीठात प्रथम, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस मध्ये प्रवेश प्राप्त व्यक्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य इत्यादींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात प्रदान केला जाणार आहे.

00000

 वृत्त क्रमांक 905

मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड तयार करुन घ्या - जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्माण केले 104 वर्षीय आजीबाईंचे आयुष्यमान कार्ड 

                                                                                                                                                                        नांदेड दि. 28 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात सध्या आयुष्यमान कार्ड निर्मिती मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः आयुष्यमान कार्ड तयार करून नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला. यावेळी त्यांनी गरजू व आजारी लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी अनन्या रेड्डी उपस्थित होत्या.

जिल्ह्यात एकूण 27 लाख 38 हजार  लाभार्थी असून, त्यापैकी 10 लाख 38 हजार नागरिकांना कार्ड वितरित झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी देखील तात्काळ आपले कार्ड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकतेच वजीराबाद भागातील कस्तुराबाई शर्मा या 104 वर्षीय आजीबाईंचे ‘आयुष्यमान वय वंदना’ कार्ड तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले यांनी आयुष्यमान कार्ड स्वत: तयार केले हा क्षण पाहून उपस्थित नागरिकांच्या गहिवरुन आले. आजीबाईंनी जिल्हाधिकाऱ्यांना आशीर्वाद देऊन आभार मानले.

या योजनेत पात्र लाभार्थ्यांना शासकीय मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा आहे. विशेष म्हणजे गंभीर आजारांवर 34 विशेष श्रेणींमध्ये 1 हजार 356 शस्त्रक्रिया व उपचारांचा समावेश असून, सांधे प्रत्यारोपण, लहान मुलांचे कर्करोग उपचार, मानसिक आजारांवरील उपचार यांचा देखील समावेश आहे.

“हा फक्त शासकीय उपक्रम नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. समाजसेवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचे कार्ड तयार करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.”असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रत्यक्ष सहभाग व कर्तव्यदक्षता पाहून इतर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी बारदेवाड, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेशकुमार शर्मा, आरोग्यमित्र नवदीप जाधव, अक्षय बुरसे, मोहम्मद इब्राहीम, गजानन कोमटवार तसेच परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

00000












सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यास दुपारी ०१:०० वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट असून सद्यस्थितीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. आज सकाळी १० वाजता जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निझामसागर धरणातून सकाळी १० वाजता २४ गेट उघडून १,९९,२४४ क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. तसेच श्रीराम सागर प्रकल्पातून सुद्धा ३९ दरवाजे उघडून २,७६,००० क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत विसर्ग चालू आहे. तरी धर्माबाद, बिलोली, देगलूर या गावातील नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे व सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी पूल, नाल्यावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
000000


 दि. 26 ऑगस्ट 2025

वृत्त क्रमांक 904

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारसाठी

30 सप्टेंबरपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 26 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्गंत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रं‍थालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस.आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक‍ ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.   

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील वर्गातील अ,ब,क,ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख रुपये , 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. 

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये तसेच राज्यातील प्रत्येकी महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि  रोख रक्कम, गौरविण्यात येते.

सन 2024-25 वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्हयातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन राज्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

000000

दि. 26 ऑगस्ट 2025

 वृत्त क्रमांक 903

गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे

 अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

नांदेड दि. 26 ऑगस्ट : जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी भाविकांना दिला जाणारा प्रसाद स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक त्या खबरदारी घेणे बंधनकारक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

सर्व गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या, स्टेनलेस स्टीलच्या भांडयात किंवा पारदर्शक अन्न श्रेणी प्लॉस्टीकच्या भांडयात झाकुन ठेवावा. जेणेकरुन प्रसादाला धुळ, माती, माशा, मुंग्या या इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही.  भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तीचे कपडे स्वछ असावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने साबणाने /हँड वॉशने धुवुनच कामास सुरुवात करावी. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोके व केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने शिंकने व थुकणे तंबाखु वा धुम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करु नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थीत कापलेली असावीत व त्यात  घाण साचलेली असु नये. गणेश मंडळांनी आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद विशेषत दुध व दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेला प्रसाद भक्ताना सेवनास देण्यात यावा. शिल्लक प्रसाद योग्य त्या तापमानास साठुन ठेवण्यात यावा. 

कच्या अन्न पदार्थाचा टाकाऊ कचरा आणि भक्तांना कचरा टाकण्यासाठी झाकण असलेली कचरा कुंडी ठेवावी जेणेकरुन आजुबाजुचा परीसर स्वछ राहील. प्रसाद तयार करण्यासाठीचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्या योग्य असावे. पिण्याचे पाणी भांडयात साठवावे, त्यावर झाकण झाकलेले असावे व पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करुन पिण्यास द्यावे. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ते भांडी धुण्याच्या साबणाने/द्रावणाने घासून व पाण्याने धुवूनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी कपडयाचा वापर करावा तसेच प्रसाद तयार करणाऱ्या व्यक्तीने हात मोजे व अॅप्रॉन घालावा, तसेच केस संपुर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा.

प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तीनी वैयक्तिक स्वछतेच्या सर्व नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी. प्रसाद स्वत: तयार करुन भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोदणी करावी. नोंदणीसाठी FOSCOS.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये फी भरुन अन्न  व औषध प्रशासन यांचेकडे नोंदणी करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न  पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावीत, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नांदेड यांनी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे केले आहे.

00000

दि. 26 ऑगस्ट 2025

 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २६,२७ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक २६ व २७ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच दिनांक २८ ऑगस्ट २०२५ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे.


या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

००००००

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...