Monday, August 18, 2025
दि.१७ ऑगस्ट 2025
वृत्त क्रमांक 873
पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश
नांदेड, दि. 18 ऑगस्ट:-जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. मुखेड तालुक्यात लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. यामुळे चार गावे जलमय झाली आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात २०० मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. महसूल व एसडीआरएफच्या टीमचे सकाळपासून शोध व बचाव कार्य सुरु आहे.
तसेच नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पातून १ लाख २५ हजार क्यूसेस विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे शहरात व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सर्व परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. तसेच सर्व परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
०००००
वृत्त क्रमांक 872
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
* नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करु नये
* प्रशासनाच्यावतीने शोध व बचाव कार्य सुरु
* नदी नाल्यावर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नये
नांदेड दि. 18 ऑगस्ट :- जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. अनेक तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त पाऊस झाला आहे. यामुळे विष्णुपूरी प्रकल्प क्षेत्रात पाऊस आणि विसर्ग दोन्हीही वाढले आहेत. विष्णुपूरी प्रकल्पाच्यावरच्या भागातील सिध्देश्वर व येलदरी धरण भरले आहेत. त्यांचा विसर्गही वाढलेला आहे. त्यामुळे विष्णुपूरी धरणाचे 8 गेट उघडले असून 94 हजार क्युसेस वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. हा विसर्ग आता वाढविण्यात येणार असून 1 लाख 25 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड शहर व नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे. नागरिकांनी अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आणि लातूरच्या उदगीर तालुक्यात आणि कर्नाटकच्या बिदर तालुक्यात काल अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद मंडळात 206 मी.मी पावसाची नोंद झाली. यामुळे लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रातील रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी घुसले. रावणगावमध्ये 225 नागरिक अडकले होते. हसनाळमध्ये 8 नागरिकांनी बुरुजावर आश्रय घेतला, तर रावणगावमध्ये मशिदीवर 4 तर झाडांवर 8 नागरिक अडकले होते. भिंगोलीत साधारण: 40 नागरिक अडकले होते. यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली होती. सकाळपासून महसूल व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम कार्यरत आहे. यासोबतच पोलीसांची एक टीम कार्यरत असून आर्मीची एक टीम या गावामध्ये पोहोचली आहे. सकाळपासून सुरु झालेल्या एसडीआरएफ टिमने शोध व बचाव कार्य केले आहे. अजूनही रावणगावमध्ये 80 ते 100 लोक पुराच्या पाण्याने वेढलेले असून दोन तासात या नागरिकांची सोडवणूक करण्यात येणार आहे. आतापर्यत 5 नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. जनावरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
पैनगंगा प्रकल्पांची परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. विष्णुपूरी प्रकल्पातून विसर्ग वाढल्यानंतर काही समस्या उदभवू नये यासाठी तेलंगनातील पाटबंधारे विभागाच्या सचिवाशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन बिदर व लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे.
अतिवृष्टी व सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी,नाल्यांना पूर आला आहे. नागरिकांनी पूराचे पाणी आलेल्या ठिकाणावरुन वाहने चालवू नये. तसेच पूर पाहण्यासाठी किंवा धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी अतिउत्साहात पाण्यात जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 871
एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी 31 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
प्रादेशिक परिवहन विभागाचे आवाहन
नांदेड दि. 18 ऑगस्ट :- ज्या वाहनांची 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहे. त्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही. अशा वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन 31 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष दरगोडे यांनी केले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम,1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. 1162 (E) 04 डिसेंबर 2018 व S.O. 6052(E) दि.06.12.2018 नुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट विहित वेळेत न बसविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार परिवहन विभागातर्फे दंड आकारणी करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी दंड टाळण्यासाठी 31 नोव्हेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी.
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 01.04.2019 पूर्वी उत्पादीत वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता मे. रोजमर्टा सेफ्टी सिस्टम लिमीटेड या संस्थेची/उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनधाकारंनी वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटसाठी https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या व्यतिरीक्त कुठल्याही इतर संकेतस्थळावर नोंदणी करणे टाळावे. मोटार सायकल व ट्रॅक्टरसाठी दर 450 रुपये तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये व सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांसाठी 745रुपये इतका दर आकारला जाणार आहे. या व्यतिरीक्त जीएसटीचा दर भरावा लागणार आहे व हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे.
सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यामध्ये 18 ऑगस्ट 2025 रोजीपर्यत 1 लाख 961 वाहनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी करण्यात आली असून 46 हजार 469 इतक्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून वाहनांना एचएसआरपी बसविण्याची अंतिम 31 नोव्हेंबर 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.
01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे एचएसआरपी बसविण्याकरिता ॲपाईटमेंट घेण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक 870
शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा
नांदेड दि. 18 ऑगस्ट :- कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळणार आहे. राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण या योजनेतून "प्रथम अर्ज, प्रथम लाभ” (FCFS) या तत्वानुसार लाभार्थ्यांची ट्रॅक्टर खरेदीसाठी एकूण 1 हजार 352 शेतकऱ्यांची निवड झालेली असून याकरिता 16 कोटी 52 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान वाटप होणार आहे. तसेच कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 144 शेतकऱ्यांची निवड झालेली असून या घटकाखाली 10 कोटी 25 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान वाटप होणार आहे.
कृषि यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेमधुन कृषि अवजार बँकेसाठी 101 शेतकऱ्याची निवड झालेली असुन या करीता 6 कोटी 7 लाख 80 हजार रुपयाचे अनुदान वाटप होणार आहे. जर निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी व कृषी अवजार बँकेचा लाभ घेतला, तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडून मिळणाऱ्या या अनुदानाचा
लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका
कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड
जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केली आहे.
00000
वृत्त क्रमांक 869
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या
विविध कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 ऑगस्ट :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योनजेअंतर्गत कर्ज प्रकरणाचे सन 2025-26 या आर्थिक वर्षातील उद्दीष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झाले आहे. अनुसूचित जातीतील गरजू अर्जदारांकडून कर्जाचे ऑनलाईन अर्ज विविध व्यवसायासाठी मागविण्यात आली आहेत. महामंडळाच्या नियमानुसार अटी व शर्तीच्या अधिन राहून ऑनलाईन अर्ज भरुन हार्डकॉपी जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक डी. एस. गायकवाड यांनी केले आहे.
सन 2025-26 या आर्थिक वर्षातील विविध योजनेअंतर्गत अनुदान योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत कर्ज अर्ज करता येते. यामध्ये 25 हजार रुपये हे महामंडळाचा अनुदान व 25 हजार रुपये बँकेचे कर्ज दिले जाते. बीजभांडवल योजनेत 5 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी अर्ज करता येते. यामध्ये महामंडळाचे अनुदानासह 20 टक्के कर्ज, बँकेचा सहभाग 75 टक्के कर्ज व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असे एकुण 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. थेट कर्ज योजना रुपये 1 लाखपर्यंत महामंडळाकडुन 50 हजार रुपये अनुदान, 45 हजार रुपये कर्ज व्याजदर द.स. 4 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 हजार रुपये असे एकुण 1 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. अशा विविध योजना महामंडळाकडून राबविण्यात येते. या योजनेचे उदिष्ट मुख्यालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी हा अनुसूचीत जातीचा असणे आवश्यक आहे. जसे बौध्द, महार, बुरुड व हिंदु खाटीक या समाजातील गरजु व्यक्तींना स्वत:चा उदरनिर्वाह व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी छोटे-मोठे लघु उद्योग जसे किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर, शेळीपालन, डेअरी व्यवसाय, रेडीमेड गारमेंट इ. व्यवसायासाठी महामंडळामार्फत कर्ज व अनुदान दिले जाते.
कर्ज मागणी अर्ज करण्यासाठी अर्ज ऑनलाइन मागविण्यात आली आहेत. महामंडळाचे संकेतस्थळ http://mpbcdc.maharashtra.gov.in महा-दिशा पोर्टलवर लागणाऱ्या कागदपत्रासह अटी व शर्ती निहाय ऑनलाइन अर्ज करुन महामंडळाच्या योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी कर्ज व अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
योजनेच प्राप्त उद्दीष्ट
अनुदान योजना (50 हजार रुपयापर्यंत) यात 25 हजार रुपये बॅकेचे कर्ज व 25 हजार रुपये अनुदान राहील. भौतिक उद्दिष्ट 90 असून आर्थिक उद्दिष्ट रु. लाखात 45.00 तर बीजभांडवल कर्ज निरंक राहील. बीजभांडवल योजना (50001 ते 5 लाख पर्यंत) भौतिक उद्दिष्ट 90, आर्थिक उद्दिष्ट रु. लाखात 45.00 तर बीज भांडवल कर्ज रु. लाखात 180.00 आहे. थेट कर्ज योजना (रु.1 लाख पर्यंत) भौतिक उद्दिष्ट 36 तर आर्थिक उद्दिष्ट रु. लाखात 18.00, बीज भांडवल कर्ज रु. लाखात 16.20 याप्रमाणे आहे.
महा-दिशा पोर्टलवर या योजनेची परिपुर्ण माहिती दिली आहे. ही माहिती पाहुनच ऑनलाइन
अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा
व्यवस्थापक डी. एस. गायकवाड यांनी केले आहे.
000000
राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती शोध-बचाव कार्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
मुंबई / नांदेड दि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बृहन्मंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. तर नांदेड येथून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, संबंधित विभागाचे अधिकारी आदीची प्रत्यक्षात उपस्थिती होती.
बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली, नांदेड जिल्ह्यात अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी नांदेड जिल्ह्यात काल लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात 200 मी.मी. पाऊस झाल्यामुळे काही पुनर्वसित गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होवून चार गावे जलमय झाली आहेत. या गावामध्ये पुरामुळे 5 नागरिक बेपत्ता असून अनेक जनावरांचे नुकसान झाले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, विष्णुपूरी प्रकल्पावर लक्ष ठेऊन असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.
00000
वृत्त क्रमांक 868
पूरपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क
पूरपरिस्थिती अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव कार्य सुरु
नांदेड दि. १८ ऑगस्ट :- लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे.
पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली व हासनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत.
मुखेड तालुक्यातत खालील गावांमध्येप शोध व बचाव कार्य चालु आहे.
• रावनगाव येथे अंदाजे225 नागरिक पाण्याहच्याी वेढयामध्येा अडकलेले आहेत. पैकी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अडकलेले 7-8 जणांना सुखरुप वाचवले आलेले आहे. मस्जीधदवर अंदाजे 15-16 नागरीक अडकलेले आहेत त्यांडचा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडुन चालु आहे.
• हसनाळ- येथे अंदाजे 7-8 नागरीक अडकलेले आहेत त्यां चा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडुन करण्यानत आली आहे.
• भासवाडी- येथे सुमारे20 नागरिक सुरक्षित आहेत, बचाव कार्य चालू आहे.
• भिंगेली- येथे सुमारे40 नागरिक सुरक्षित आहेत, बचाव कार्य चालू आहे.
हे सर्व नागरिक पूरस्थितीत अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाच्या एसडीआरएफ राज्या आपत्तीव प्रतिसाद दल, पोलीस, अग्नीनशमन दल, क्युआरटी (सिघ्र प्रतिसाद दल) व स्थाअनिक शोध व तत्परतेमुळे यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत.
जिल्हासधिकारी राहूल कर्डिले स्वसतः जातीने लक्ष ठेऊन आहेत तसेच उपविभागीय अधिकारी देगलूर व तहसिलदार मुखेड हे सुध्दाल घटनास्थवळी उपस्थित राहुन बचाव कार्य करत आहेत. जिल्हा प्रशासन पूर्णतः सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविले आहे.
०००००
वृत्त क्रमांक 867
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड दौरा
नांदेड दि.17 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12.10 वा.मुंबई येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.15 वा. हेलिकॉप्टरने पुसद जि. यवतमाळ कडे प्रयाण. सायं. 4.10 वा. मौजा काकडदाती पुसद जि. यवतमाळ येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 4.15 वा. विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
दि. 17 ऑगस्ट 2025
वृत्त क्रमांक 866
पूराचे पाणी ओसरेपर्यंत पुलावरुन अथवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये- तहसीलदार वारकड
नांदेड,दि. १७ ऑगस्ट:- नांदेड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे नांदेड – मालेगाव रस्त्यावरील पासदगाव येथील पुलावरून तसेच निळा – एकदरा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पासदगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्री तांबे पोलीस निरीक्षक भाग्यनगर पोलीस स्टेशन हे स्वतः त्या ठिकाणी हजर होते.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूंना नदीपात्राजवळ बेरिकेडिंग करून वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. तसेच कोणत्याही अप्रिय घटनेची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पूरामुळे आसना नदीकाठावरील बोंढार, नेरली, एकदरा, पासदगाव, निळा, खुरगाव या गावांमधील शेतीमध्ये पाणी शिरल्याने काही प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी स्वतः सर्व ठिकाणी स्थळ पाहणी केली. त्यांनी बंद असलेल्या रस्त्यांची व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. सोबत मंडळाधिकारी श्री स्वामी, तलाठी गोपीनाथ कल्याणकर, दयानंद पाटील, स्वाती शेलगावकर , सरपंच मारुती बागल बोंढार तर्फे नेरली इत्यादी हजर होते.
पूराचे पाणी ओसरेपर्यंत कोणीही पुलावरून किंवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहान तहसीलदार वारकड यांनी केले.
तहसीलदारांनी क्षेत्रातील महसूल, पोलीस व ग्राम प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सतत जागरूक राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
पूरपरिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन केले जाणार असून नागरिकांनी कोणत्याही अडचणीसाठी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
०००००
दि. 17 ऑगस्ट 2025
वृत्त क्रमांक 865
जिल्हाधिकाऱ्यांनी विष्णुपूरी प्रकल्पाला भेट देवून केली पाहणी
• नदी काठच्या ग्रामस्थांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन
• पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा कार्यरत
नांदेड दि. 17 ऑगस्ट:- जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड येथील डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली.
प्रकल्पातील एकूण 18 दरवाजापैकी सध्या 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 48 हजार 478 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अधिक करण्यात होईल. प्रकल्पातील पाण्याची सध्याची पातळी 353.25 मीटर आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी (SCADA) एससीएडीए रूममध्ये गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यांच्या पाणी पातळी संबंधांत तसेच उपसा सिंचन योजने संदर्भात सविस्तर माहिती घेतली.
पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. तसेच गोदावरी नदीकाठी असलेल्या गावातील ग्रामस्थांनी विशेष काळजी घ्यावी. सतर्क राहावे जेणेकरून जीवित हानी होणार नाही. आपले जनावरे मोकळे सोडू नये जेणेकरून पुराच्या पाण्यात वाहून जाणार नाहीत, इत्यादी खबरदारी सर्वांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सावंत, डॉक्टर उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, सहाय्यक अभियंता व इतर महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
दि. 16 ऑगस्ट 2025
⭕ ALERT⭕
🛑 विसर्ग वाढ🛑
उर्ध्व पेनगंगा प्रकल्प प्रकल्प
ईसापुर धरण
धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने
आज दि. 16/08/2025 रोजी 22.00 वाजता आणखी 2 गेट 50 सेंटीमीटर ने ऊघडण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत
इसापूर धरणाच्या सांडव्याची एकूण 13 वक्रद्वारे 50 सेंटिमीटर ने चालू असून पेनगंगा नदीपात्रात 22062 क्युसेक्स (624.709 क्युमेक्स) इतका विसर्ग सूरू आहे.
धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.
तरी, नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी.
ईसापुर धरण पुरनियंत्रण कक्ष
दि. 16 ऑगस्ट 2025
विशेष लेख
न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला 17 ऑगस्टपासून सुरुवात
कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय उपलब्ध होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश व महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय श्री. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बेंचचा शुभारंभ होणार असून, हा सोहळा न्यायदानाच्या विकेंद्रीकरणातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
यानिमित्ताने कोल्हापूर नगरी या ऐतिहासिक घटनाक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली असून 17ऑगस्टला होणाऱ्या या सोहळ्याची सर्व स्तरातील जनतेला प्रतीक्षा आहे.
50 वर्षांच्या लढ्याचे यश
कोल्हापूरसाठी सर्किट बेंचची मागणी मागील पाच दशकांपासून सुरू होती. विविध वकील संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, माध्यमांनी आणि स्थानिक नेत्यांनी या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले. 2014 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही ही मागणी कायम ठेवली. त्यांच्या कार्यकाळात ही मागणी पूर्ण होत असल्याने विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. ते उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा खंडपीठासोबत आता कोल्हापूरचे सर्किट बेंच न्यायव्यवस्थेत नवे स्थान घेणार आहे.
उद्घाटन सोहळा, मान्यवरांची उपस्थिती
17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता सी.पी.आर.हॉस्पिटल समोरील जुन्या न्यायालय इमारतीमध्ये या सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे.
हा सोहळा भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते होईल.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,तसेच न्यायमूर्ती मकरंद कर्णिक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहा जिल्ह्यांचा लाभ
या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे. याआधी या जिल्ह्यांतील नागरिकांना आपली प्रकरणे मुंबईत नेऊन लढावी लागत होती, ज्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत असे.आता मात्र ही प्रकरणे कोल्हापुरातच चालवली जाणार असल्याने सर्वांसाठी मोठी सोय होणार आहे.
सोलापूर वगळता इतर जिल्ह्यांना तीन-चार तासांत कोल्हापूर गाठता येते, तर सोलापूरलाही साधारण पाच तासांचा प्रवास करून कोल्हापुरात पोहोचता येईल.
सर्किट बेंच आणि खंडपीठ – काय फरक?
सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण,जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठरावीक कालावधीत येऊन प्रकरणे चालवतात. याची स्थापना करण्याचा अधिकार राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना असतो आणि त्याचे नोटिफिकेशन राज्यपाल प्रसिद्ध करतात.
खंडपीठ मात्र कायमस्वरूपी स्वरूपाचे असते. यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असून, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रस्ताव तयार करून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात. त्यास मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतात.
दोन्ही ठिकाणी न्यायदानाची पद्धत आणि प्रक्रिया सारखीच असते.मात्र सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्तींची नियुक्ती तात्पुरती असते,तर खंडपीठात ती कायमस्वरूपी असते.कोल्हापूरचे सध्याचे सर्किट बेंचही भविष्यात खंडपीठात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
न्यायदानाची कार्यपद्धती
या सर्किट बेंचमध्ये नागरी, फौजदारी, कामगार, मालमत्ता, सार्वजनिक हक्क अशा विविध प्रकारचे खटले चालणार आहेत. मात्र कंपनी ॲक्ट, करसंबंधी प्रकरणे आणि एनआयए न्यायालयाशी संबंधित खटले मुंबईतील मुख्य न्यायालयातच चालतील.मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्ती तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर येथे नियुक्त होऊन प्रकरणे चालवतील.
कोल्हापूर – न्यायदानासाठी आदर्श केंद्र
कोल्हापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे केंद्र असून, येथे उत्तम लॉजिस्टिक सुविधा, हॉटेल्स, धर्मशाळा, शासकीय विश्रामगृहे यांचा उत्तम ताळमेळ आहे. त्यामुळे वकिलांना, पक्षकारांना आणि साक्षीदारांना मुक्काम व प्रवास सोयीस्कर होणार आहे. शिवाय कोल्हापूर हे सहा जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने हे स्थान न्यायदानासाठी आदर्श आहे.
शेंडा पार्क येथे 25 एकर जमीन राखीव
कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क येथे स्वतंत्रपणे 25 एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय खंडपीठ इमारत बांधकाम व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूदही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे.यामुळे आता या कामालाही गती येणार आहे. एक अद्यावत इमारत या ठिकाणी उभी येत्या काळात राहणार आहे.
कोल्हापुराततील न्यायदानाची परंपरा
न्याय,नीती, समता, न्यायदान यासाठी कोल्हापूर शहराचे दायित्व मोठे असून या शहराने 1867 पासून न्यायव्यवस्थेला आपलेसे केले आहे.या शहरात पूर्वी 'राजा ऑफ कोल्हापूर ' या सहीने न्यायदान होत होते.महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरला पहिले न्यायाधीश होते.ब्रिटिश राजवटीतील काही ऐतिहासिक नोंदीनुसार 1893 मध्ये 'कोल्हापूर स्टेट रूल्स ' म्हणून स्वतंत्र कायद्याचे पुस्तक होते.राजाराम महाराजांच्या काळात 1931 मध्ये कोल्हापुरात स्वतंत्र हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट स्थापन झाले होते.
शाहू महाराजांच्या आदर्शाला सलाम
भारतामध्ये न्यायदान भेदाशिवाय, निकोप, समानतेच्या तत्त्वावर असावे हा संदेश राजर्षी शाहू महाराजांनी दिला होता. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा शुभारंभ हा त्यांच्या विचारांना खरी आदरांजली आहे.
हे बेंच सुरू झाल्यामुळे न्यायाच्या दारी सर्वसामान्य माणसाला सहज पोहोचता येईल, न्यायासाठी होणारा खर्च आणि वेळ कमी होईल, आणि न्यायदानाची गती वाढेल.
17 ऑगस्टपासून सुरू होणारे हे सर्किट बेंच केवळ न्यायदानाची नवी सुविधा नाही, तर "न्याय विकेंद्रीकरणाचा आणि न्याय सुलभतेचा" एक भक्कम पाया आहे. पन्नास वर्षांच्या अथक प्रयत्नांना मिळालेलं हे यश, कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी न्यायदानाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे.
प्रवीण टाके
उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मुंबई
9702858777
दि. 16 ऑगस्ट 2025
नांदेडमध्ये आज ‘इंद्रधनू २०२५’ तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव
नांदेड १६ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व सप्तरंग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंद्रधनू २०२५’ हा तृतीयपंथी विशेष सांस्कृतिक महोत्सव रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे पार पडणार आहे.
तृतीयपंथी समाजातील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून महोत्सवाचे उद्घाटन विविध शासकीय व प्रशासकीय मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांत पुण्याचे जगदीश भोसलेंचे वर्ध्याचे समीर मेश्रार यांचे कथ्थक नृत्य, अमरावतीच्या शुभम सोनुनेचे घडा लोकनृत्य, मुंबईच्या विद्यासागर व अक्षया पुणेकर यांचे रंगतदार लावणी सादरीकरण, नागपूरच्या मिशन विश्व ममत फाउंडेशनकडून मंगलमुखींचे देवी स्तोत्र, बुलढाण्याच्या नटराज लोककला संचाचे भारुड तसेच गौरव हजारिक लिखित व दिग्दर्शित ‘निर्वाण’ हे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन प्रगती हाटे (गंगा), मुंबई करतील.
तृतीयपंथी समाजातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना योग्य प्रोत्साहन मिळावे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या पुढाकारातून साकारलेला हा उपक्रम नांदेडकरांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.
०००००
वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)













.jpeg)

.jpeg)

