Tuesday, August 12, 2025

वृत्त क्रमांक 839 

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू

 

·  समाज कल्याण कार्यालयामार्फत महाविद्यालय प्राचार्यांना आढावा बैठक संपन्न

 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे नवीन व नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडिबीटी MAHADBT पोर्टल 30 जून 2025 पासून सुरु झाले आहे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न  असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आढावा बैठक नुकतीच 11 ऑगस्ट रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते.

 

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील काही महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्जाबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये योजनांबाबत जनजागृती करावी. बैठकीत भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे. स्वाधार योजनेच्या बाबतीत विद्यार्थ्यांची उपस्थित तपासून सादर करणे. महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर स्वाधार व भा.स.शी.बाबत नोटीस लावणे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल त्वरीत सादर करणे. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

00000






 

वृत्त क्रमांक 838

रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना  : चैतन्य अंबेकर 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात सौ. विष्णुप्रिया अंबेकर यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- अनेक रुग्णालयांचे अनुभव आम्ही घेतले पण येथे दाखल झाल्यानंतर जे वातावरण अनुभवायला मिळाले ते खरोखरच मनाला स्पर्श करून गेले. प्रत्येक रुग्णाची येथे काळजी घेतली जाते. जणू काही तो त्यांच्या कुटुंबातील सदस्यच आहे. रुग्णालयात स्वच्छता, शिस्त, सेवा, सहानुभूती व रुग्णालयातील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना आहे. ती भावना आम्हाला येथे जाणवली. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे नेतृत्व प्रेरणादायी आहे.  त्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, असे गौरव उद्‌गार रुग्णनातेवाईक चैतन्य अंबेकर यांनी काढले.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारासाठी परभणी येथील सौ. विष्णुप्रिया अंबेकर वय 48 वर्ष या 28 जून रोजी दाखल झाल्या होत्या. या रुग्णांचे अगोदरच तीन वेळेस शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना पोटाचा अत्यंत गुंतागुंतीचा हर्निया झाला होता. त्यांच्या पोटावर अत्यंत गुंतागुंतीची शस्रक्रिया शल्यचिकित्स विभाग प्रमुख डॉ. अनिल देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल बोंबले यांनी यशस्वीपणे नुकतीच करुन दाखविली. 

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वैद्यकीय सेवा, प्रशासनिक कार्य, रुग्णालयामधील स्वच्छता व्यवस्थापन आणि रुग्ण-नातेवाईकांशी असलेला संवेदनशील संवाद शिस्तबद्ध, कडक प्रशासकीय कार्यामुळे गरीब गरजू रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळत आहे. सर्वसामान्य गरीब, गरजू रुग्णांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारचे उपचार मोफत मिळत असून सर्व डॉक्टर्स, परिचर्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना मिळत असलेले योग्य उपचार, प्रेमळ आपुलकीची वागणूक या बाबींमुळे रुग्णसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचा प्रतिनिधीक स्वरुपात सत्कार परभणी येथील चैतन्य अंबेकर यांनी नुकताच केला. 

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. विद्याधर केळकर सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्सा, डॉ. शिवानंद देवसरकर, उप वैद्यकीय अधीक्षक, श्रीमती. अल्का जाधव अधिसेविका, शल्यचिकित्साशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी, निवासी डॉक्टर रुग्णालयातील परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण व रुग्ण नातेवाईक उपस्थित होते.

00000




 वृत्त क्रमांक 837 

कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे

- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत 

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- सन 2024 च्या विविध कृषि पुरस्कारासाठी शेतकरी, गट, संस्था यांनी आपले प्रस्ताव 3 प्रतीत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6 वा. पर्यंत सादर करावे. परिपूर्ण प्रस्तावासोबत योग्य ती कागदपत्रे, केलेले उल्लेखनिय कार्य असे सर्व दस्ताऐवजासह मार्गदर्शक सुचानेप्रमाणे विहित वेळेतच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास अथवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याची आवेदकाने काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा सहायक कृषि अधिकारी (कृषि सहायक) किंवा उपकृषि अधिकारी (कृषि पर्यवेक्षक) किंवा मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय, अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्याला, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे व्यक्ती, गट, संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल  यांचे  हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. 

पुरस्काराचे स्वरुप

सन 2024 करीता संपूर्ण महाराष्ट्रातून देण्यात येणारे  पुरस्कार, त्यांची संख्या व धनादेश रक्कम पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राज्य स्तराव 1 पुरस्कार रक्कम 3 लाख रुपये, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, जिजामाता कृषी भूषण (केवळ  महिला शेतकरी) पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, वसंतराव नाईक शेतिमित्र पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख 20 हजार रुपये, उदयान पंडीत पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख, युवा शेतकरी पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख 20 हजार तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट-34 आणि आदिवासी गट 6 याप्रमाणे 40 पुरस्कार असून रक्कम 44 हजार रुपयाचा धनादेशाद्वारे दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक 836

सण, उत्सव शांततेत साजरे करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर

गणेश विसर्जन कृत्रिम तलावात करा  

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद व दहीहंडी  हे सण येत्या काळात एकत्रित येत आहेत.  जिल्ह्यात हे सण साजरे करतांना सर्व धर्मियांनी एकमेकात परस्पर सौहार्द व शांतता ठेवून साजरे करावेत. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज शांतता समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर   तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती.   

डिजेचा आवाजामुळे उत्सव काळात ध्वनी प्रदूषण मोठे होते. नागरिकांनी डीजे न लावता सण उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. गणेशोत्सव साजरा करतांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्यावर भर द्यावा. नदीच्या वाहत्या प्रवाहात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम तलावात करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सण उत्सवाच्या काळात नागरिक- मंडळाच्या अडचणी  सोडविण्यासाठी प्रशासनाकडून व्हॉटसअपग्रुप तयार करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी त्यांच्या अडचणी थोडक्यात मांडाव्यात अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.  

नागरिकांनी कायदा हातात घेवू नये : पोलीस अधिक्षक 

उत्सव काळात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. पोलीस प्रशासन नेहमी दक्ष असून नागरिकांनी योग्य माहिती द्यावी. उत्सव काळात येणाऱ्या अडचणी व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यावर भर दिला जाईल. कोणत्याही नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. उत्सव काळात गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी चांगले नियोजन केले असून नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशानाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.

महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी पूर्ण: मनपा आयुक्त 

गणेशोत्सवाचे सुयोग्य नियोजन महापालिकेच्यावतीने केले आहे. मिरवणूक मार्गात कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे. यावर्षी तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गोदावरी नदीत श्री गणेशाचे विसर्जन होणार नाही याची काळजी गणेश भक्तांनी घ्यावी. गोदावरी नदी शुद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी केले.  

शांतता समितीच्या सदस्यांनी गणेशोत्सव, दहीहंडी व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य, सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.  

00000







 वृत्त क्रमांक 835

दि. 15 व 16 ऑगस्ट 2025 रोजी  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 13:35 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 12 ते 16 ऑगस्ट 2025 या पाच दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 12, 13 व 14 ऑगस्ट 2025 हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व दि. 15 व 16 ऑगस्ट 2025 हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 834

हर घर तिरंगा अभियानात स्वच्छता अभियान 

महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता 

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला स्वच्छता मोहिमेत सहभाग

नांदेड दि. 12 ऑगस्ट :- ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्यापासून या स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला. 

जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानांतर्गत 2 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळे अभियान उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी या मोहिमेत सहभागी होताना स्वतः महात्मा गांधी पुतळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महापालिका उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनीही या मोहिमेत सहभागी होत ‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील, उपविभागीय कार्यालय येथेही आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाणे ज्यामध्ये पुतळा परिसर, शासकीय कार्यालय, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. 

यावेळी शहरात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथही दिली.

 या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, महसूल विभागाचे विभाग प्रमुख, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

00000












वृत्त क्रमांक 833

मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 120 रुग्णांची तपासणी व औषधोपचार

नांदेड दि.१२ ऑगस्ट:– मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि अभ्युदय लाईफ केअर हॉस्पिटल, साठे चौक नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिव मंदिर, चैतन्य नगर चौक येथे 10 ऑगस्ट  रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीवल्लभ कार्लेकर व डॉ. संतोष मेकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टिमने 120 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले.

यावेळी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे, लिपिक नारायण वाडेकर, शिव मंदिर ट्रस्टचे सचिव उदय तोरणेकर, पुजारी काशिनाथ मठपती उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जितू कांबळे व इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

००००






वृत्त क्रमांक 832

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १४ ऑगस्टला विभाजन विभीषीका दिवसाचे आयोजन

नांदेड दि.१२ ऑगस्ट– राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तांत्रिक ज्ञानाबरोबरच सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्य याबाबत प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महिन्यातून एकदा सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता ‘विभाजन विभीषीका दिवस’ साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे.

००००००

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...