Sunday, August 3, 2025

अवयवदान चळवळीत महाराष्ट्राचा पुढाकार...
अवयवदान पंधरवडा : दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५
मरणोत्तर सेवा ही जीवनोत्तर प्रतिष्ठा आहे!






 

वृत्त क्रमांक 805

राज्यस्तरीय संपूर्णता अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा सन्मान

नांदेड,३ ऑगस्ट:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि आकांक्षित किनवट तालुक्याचे समन्व्यक पांडुरंग मामीडवार यांची उपस्थिती होती.

००००





वृत्त क्रमांक 804

अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत जनजागृती  रॅली संपन्न 

नांदेड ३ ऑगस्ट:- अवयवदान दिनानिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. 

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४  रोजी भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३  ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हा उद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली शहरातील आय टी आय कॉर्नर येथील  महात्मा फुले पुतळ्यापासून श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड अशी काढण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनजिल्हा परिषदेच्यामुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली 

अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, डॉ.यशवंत पाटील अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, डॉ. संजय पेरके जिल्हा शल्यचिकित्सक श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड, डॉ हनुमंत पाटील आरएमओ, श्रीमती बोथीकर प्राचार्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड, डॉ. प्रल्हाद कौटकर अध्यक्ष इंडियन मेडीकल असोसीएशन , डॉ. संजय देलमाडे अध्यक्ष निमा, डॉ. मैदपवाड स्टार किडनी सेंटर , इनेर्वेल क्लब चे अध्यक्ष विद्या पाटील अवयवदान अर्पण समितीचे माधव अटकोरे निमा वुमेन्स फोरम चे अध्यक्ष डॉ. करूणा जमदाडे व सचिव माया पवार हे  उपस्थित होते.सदरील रॅलीचा समारोप हा श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके  यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती कार्यक्रम दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अवयवदानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीवन वाचवू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाचा संकल्प करावा तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक (२४*७) १८००-११४७-७० संपर्क साधावा.

weblink – https://notto.abdm.gov.in/pledge-registry/&website www.notto.mohfw.gov.in    

तसेच शहरातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले.  

या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील सर्व अधिकारी कर्मचारी व शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.

०००००




वृत्त क्रमांक 803

महसूल सप्ताह निमित्त तळणी तालुका नांदेड येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम 

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड,३ ऑगस्ट:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्‍या निर्देशानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘महसूल सप्ताह’ राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 3 ऑगस्ट 2025 रोजी मौजे तळणी (ता. नांदेड) येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमांतर्गत गावातील पानंद रस्ते व शिव रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 310 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड मानवी साखळी तयार करून  करण्यात आली. या उपक्रमात गावातील नागरिक, शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी व्यक्तीने स्वतः झाडे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

कार्यक्रमाला तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी आडेराघो परिविक्षाधिन तहसीलदार अभयराज नंदुंडे,  सुनील माचेवाड, पीएसआय निजाम सय्यद (लिंबगाव पोलीस स्टेशन), बिडकर मॅडम (आरोग्य उपकेंद्र, तळणी) आदी अधिकारी उपस्थित होते.

गावच्या सरपंच श्रीमती वेणूबाई संभाजी सूर्यवंशी, उपसरपंच श्रीमती त्रिशला मारुती सावंत, ग्रामसेवक परतवाड, कृषी सहाय्यक श्रीमती मोरे, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.

याशिवाय कार्यक्रमास माजी सरपंच वैजनाथ शंकराव सूर्यवंशी, माजी सरपंच घनश्याम सखाराम सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष पंजाबराव सूर्यवंशी यांच्यासह इतर ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रसंगी तहसीलदार संजय वारकड यांनी वृक्ष लागवडीचे पर्यावरणीय, सामाजिक व आरोग्यदायी फायदे स्पष्ट करत, झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. “फक्त झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन ही सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

या उपक्रमामुळे तळणी गावात हरित पट्टा तयार होऊन पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना शाश्वत वारसा मिळवून देण्यासाठी मोलाची भर पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

०००००







वृत्त क्रमांक 802

काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

नांदेड,३ ऑगस्ट :-मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड  व यशोसाई हॉस्पिटल तसेच काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने काळेश्वर मंदिर  परिसरात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये नांदेडचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. ऋतुराज जाधव, अस्थिरोग तज्ञ डॉ. देवेंद्र  पालीवाल, भीषक तज्ञ डॉ. रोहन ढसे, फिजिओथेरपिस्ट डॉ. विजय भारतीया, शल्यचिकित्सक डॉ. सागर कोटलवार व त्यांचा सर्व चमू  होता. 

तसेच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे उपस्थित होते. 

यावेळी 206   रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.  प्रारंभी काळेश्वर मंदिर संस्थानचे  सचिव शंकरराव हंबर्डे, कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे, विश्वस्त धारोजी हंबर्डे,बालाजीराव हंबर्डे, सतीश भेंडेकर, गणेश  ढनमने व्यवस्थापक  प्रभू हंबर्डे यांनी मान्यवरांचा सत्कार करून शिबिराची सुरुवात केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशोसाई हॉस्पिटलचे फिरोज पटेल, विशाल काशीदे, गजानन पाठक, आशिष राठोड, माधव देवकांबळे, संदीप घोंगडे आदींनी परिश्रम घेतले.

०००००






 वृत्त क्रमांक 799

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. २ ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

सोमवार 4 ऑगस्ट रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी 4.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील. हिंगोली येथून रात्री 8 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 800

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित 

कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी   येथे थेट प्रक्षेपण व तांत्रिक प्रशिक्षणाने शेतकऱ्यांमध्ये उत्साह

नांदेड दि. २ ऑगस्ट – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता वाराणसी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २०,५०० कोटींचा निधी जमा करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील २.२१ लाख शेतकऱ्यांना ४८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. संपूर्ण राज्यात हा आकडा ४,६०० कोटी रूपयावर पोहोचला. कार्यक्रमात बनौली येथे ₹२,२०० कोटींच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करण्यात आला.

सागरोळीत थेट प्रक्षेपण व मार्गदर्शन

या ऐतिहासिक कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांना यावेळी केंद्र शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती मिळाली आणि त्यांचे समाधान व्यक्त झाले.

फळपिकांवरील विशेष तांत्रिक प्रशिक्षण

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आंबा आणि लिंबवर्गीय फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. यात आधुनिक लागवड प्रणाली, उत्पादन वाढीचे उपाय, सेंद्रिय शेती पद्धती आणि विपणन साखळी यावर भर देण्यात आला. डॉ संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांनी अत्यंत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी विवेक गुडुप यांच्या हस्ते झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नवीन कृषी धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी मंचावर डॉ माधुरी रेवणवार, प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, डॉ कपिल इंगळे, वेंकट शिंदे, नांदेड प्रगतीचे शिवशेटे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणातून लाभ मिळाल्याचे सांगत आपले अनुभवही शेअर केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ज्ञानवृद्धीची संधी मिळाली. PM-KISAN योजनेच्या लाभांबरोबरच आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. एकंदरीत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा ठरला.

 ०००००

 वृत्त क्रमांक 801

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

नांदेड दि.२ ऑगस्ट:-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते काल जागतिक स्तनपान सप्ताहाचे (World Breastfeeding Week) उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करताना स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य विभागाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दीप प्रज्वलन करून सप्ताहाचे उद्घाटन केले.

 मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुपोषित बाळ पुरस्कार देण्यात येणार आहे. आपल्या मार्गदर्शनात, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या की, "आईचे दूध हे बाळासाठी अमृतसमान आहे. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ आणि केवळ स्तनपान देणे आवश्यक आहे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, बाळ निरोगी राहते आणि आई व बाळ यांच्यात भावनिक नाते अधिक दृढ होते." 

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संगीता देशमुख यांनी आरोग्य कर्मचारी,आशा सेविका आरोग्य विभाग आणि अंगणवाडी सेविकांना स्तनपानाबद्दल समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना योग्य आहार, स्वच्छता आणि स्तनपानाचे फायदे याबद्दल माहिती देण्यावर भर देण्यास सांगितले.

हा सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत चालणार असून, या काळात विविध ठिकाणी स्तनपानाचे महत्त्व विशद करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच आयटी बॉम्बे मधे प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थीने कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्वांना स्तनपान या विषयाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

आयटी बॉम्बेने जे प्रशिक्षण दिले ते प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व स्तनदा माता व गरोदर मातांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.

कार्यक्षेत्रातील बाळंतपण सरकारी दवाखान्यात व्हाव्यात यासाठी समाजात जनजागृती करावी व शासकीय संस्थेमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवावे असे सूचना दिल्या.

या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख , महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात , सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी राठोड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, वैशाली बेरलीकर, प्रा. आ केंद्रातील अधिकारी व कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि स्तनदा माता मोठ्या संख्येने माता उपस्थित होत्या.

०००००


    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...