Thursday, July 31, 2025

 वृत्त क्र. 789

महसूल दिन आज होणार साजरा 

नांदेड तालुक्यात महसूल सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 31 जुलै : शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट महसूल दिन हा विविध महसूल विषयक कार्यक्रम घेऊन साजरा होणार आहे. नांदेड तालुक्यात 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आज बैठक घेण्यात आली. 

येत्या 7 दिवसात विविध कार्यक्रम महसूल खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यामार्फत गावात राबविले जाणार आहेत. त्याचअनुषंगाने 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वा. तहसील कार्यालयात विविध प्रकारचे प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, बिडी कामगारांना राशन कार्ड, वंचितांना प्रमाणपत्र व राशन कार्ड वाटप, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार इत्यादी पार पडणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

साप्ताहात अतिक्रमण नियम कुलकर्णी, रस्त्याच्या दुतर्फावर वृक्ष लागवड करणे, एम सेंडच्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी व परवाने देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही, विशेष सहाय्य योजनाच्या लाभार्थ्याचे डीबीटी करणे, छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान राबवणे इत्यादी कामे नांदेड तहसील कार्यालयाच्यावतीने तालुक्यात करण्यात येणार आहेत. बैठकीस नायब तहसीलदार संजय नागमवाड, स्वप्निल दिगलवार, सुनील माचेवाड, रवींद्र राठोड, अव्वल कारकून देवीदास जाधव आदी उपस्थित होते.

महसूल सप्ताहातील कार्यक्रमाचे स्वरुप 

शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले आहे.

शनिवार 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येईल. रविवार 3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे.  सोमवार 4 ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्यात येईल. मंगळवार 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण झालेले नाही, त्यांना घरभेटी देऊन डीबीटीद्वारे अनुदानाचे वाटप केले जाईल.

बुधवार 6 ऑगस्टला शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करून त्या अतिक्रमणमुक्त केल्या जातील. तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेतले जातील. गुरुवार 7 ऑगस्टला एम सँड धोरणाची अंमलबजावणी करून नवीन मानक कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेले जाईल आणि ‘महसूल सप्ताहाचा’ सांगता समारंभ आयोजित केला जाईल.  

 00000

वृत्त क्र. 788


जिल्ह्यात डाक कार्यालयातील आर्थिक/पत्रव्यवहार 2 ऑगस्ट रोजी राहणार बंद

 

·   आयटी 2.0 या नवीन तांत्रिक प्रणालीत सर्व डाक कार्यालय 4 ऑगस्ट पासून विलीन होणार  

 
नांदेड दि. 31 जुलै : नांदेड विभागातील सर्व डाक कार्यालय आयटी 2.0 या नवीन तांत्रिक प्रणालीत 4 ऑगस्ट 2025 पासून विलीन होत आहेत. त्यासाठी नांदेड विभागातील सर्व डाक कार्यालयातील आर्थिक/ पत्रव्यवहार हे 2 ऑगस्ट 2025 रोजी पूर्णपणे बंद राहणार आहेत. याबाबत डाक कार्यालयाच्या ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक यांनी केले आहे.

 

टपाल विभागाला पुढील पिढीतील एपीटी अॅप्लिकेशनची (आयटी 2.0) अंमलबजावणी करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. जो आमच्या डिजिटल उत्कृष्टता आणि राष्ट्रउभारणीच्या प्रवासात एक मोठी झेप आहे. या परिवर्तनकारी उपक्रमाचा एक भाग म्हणून, अपग्रेड केलेली प्रणाली नांदेड विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये 4 ऑगस्ट रोजी लागू केली जाणार आहे. या प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक अखंड आणि सुरक्षित संक्रमण सक्षम करण्यासाठी येत्या 2 ऑगस्ट रोजी नियोजित डाउन टाइम करण्यात आला आहे. त्यामुळे 2 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड विभागातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये कोणतेही आर्थिक, पत्र व्यवहार केले जाणार नाहीत.

 

डेटा मायग्रेशन, सिस्टम व्हॅलिडेशन आणि कॉन्फिगरेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, नवीन सिस्टम सुरळीत आणि कार्यक्षमतेने लाइव्ह होईल याची खात्री करण्यासाठी सेवा या 2 ऑगस्टला तात्पुरती बंद राहणार आहे. APT अॅप्लिकेशन वापरकर्त्याचा अनुभव वाढविण्यासाठी, जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-अनुकूल इंटरफेस प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहे. जे गुणवत्तापूर्ण, कार्यक्षम आणि भविष्यासाठी तयार पोस्टल ऑपरेशन्स प्रदान करण्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. डाक कार्यालयाच्या ग्राहकांना आवाहन केले आहे त्यांनी त्यांच्या भेटींचे आगाऊ नियोजन करावे आणि या छोट्या व्यत्ययादरम्यान आमच्यासोबत रहावे. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते पण डाक कार्यालयाच्या ग्राहकांना, नागरिकांना चांगल्या, जलद आणि अधिक डिजिटल सक्षम सेवा देण्याच्या हितासाठी पावले उचली जात आहेत, असे अधीक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


वृत्त क्र. 787 

शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध  

 
नांदेड दि. 31 जुलै : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी व खाजगी ग्राहकांना 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या जवळच्या वाळू डेपोमधून वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधीत गरजु ग्राहकांना ऑनलाईनद्वारे महाखनिज प्रणालीवर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कालावधी (सार्वजनिक सुट्टी वगळून) वाळू बुकिंग करुन बुकिंग केलेल्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत वाळू डेपोतून वाळू उचल करणे बंधनकारक राहणार आहे.

 

त्यामुळे ज्या ग्राहकांना वाळूची आवश्यकता आहे त्या ग्राहकांनी शासनाचे महाखनिज प्रणालीवर mahakhanij.maharashtra.gov.in ऑनलाईन बुकिंग करुन वाळू उचल करावी, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अधिकृत संकेतस्थळ nanded.gov.in वर प्रसिद्ध केले आहे.

00000

वृत्त क्र. 786

आजपासून जागतिक स्तनपान सप्ताहास सुरुवात 

स्तनपान ; एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी

नांदेड दि. 31 जुलै : दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीचा जागतिक स्तनपान सप्ताह "स्तनपान: एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी" या संकल्पनेवर आधारित आहे. स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि मातांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. 

सुपोषित नांदेड बनवण्यासाठी आयआयटी बॉम्बे यांनी जे परिश्रम घेतले, तसेच प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक बनवले. त्यांनी  संपूर्ण जिल्ह्यात त्याचा उपयोग करून सुपोषित नांदेड ध्येय, उद्देश साध्य करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आरोग्यदायी पिढी घडवण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने  संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बाळासाठी आईचे दूध हे अमृततुल्य आहे. जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान देणे हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, पोटाचे विकार कमी होतात आणि दमा व ऍलर्जीसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. स्तनपान करणाऱ्या बाळांचे वजन संतुलित राहते आणि त्यांना भविष्यात मधुमेह किंवा स्थूलपणासारख्या समस्या होण्याची शक्यता कमी असते.

आईसाठी देखील स्तनपानाचे अनेक फायदे आहेत. यामुळे प्रसूतीनंतर गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येते, रक्तस्राव कमी होतो आणि वजन कमी करण्यास मदत करते. स्तनपानामुळे आई आणि बाळात भावनिक नाते अधिक घट्ट होते. या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक गट एकत्र येऊन स्तनपानाविषयी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे, आरोग्य शिबिरे आणि माहितीपर सत्रे यांचा समावेश असेल. स्तनपानाचे महत्त्व, योग्य पद्धती आणि येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

00000

वृत्त क्र. 785

कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी धोरण जाहीर  

जमिनीची माहिती सादर करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 31 जुलै :- महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 23 मे 2025 अन्वये नैसर्गिक वाळूला एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) पर्याय म्हणून विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाने धोरण जाहीर केले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने 28 जुलै 2025 रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे माहिती व अर्ज 14 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शासनाकडे किंवा कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे निहित असलेल्या कोणत्याही जमिनीवर मंजूर करावयाच्या खाणपट्टयाबाबत पाच एकरापर्यंतच्या क्षेत्रासाठी लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची माहिती तहसिलदार यांनी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करावी. इच्छुक व्यक्तींनी mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 14 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत.

यापुर्वीपासून खाणपटटा मंजूर असलेल्या खाणपटटाधारकांनी 100 टक्के एम-सॅन्ड उत्पादन करण्यास इच्छुक असल्याबाबत अर्ज mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत. याबाबत सविस्तर प्रसिध्दीपत्रक जिल्हाधिकारी नांदेड यांचे अधिकृत संकेतस्थळ (nanded.gov.in) वर प्रसिध्द केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आले आहे.

000000

वृत्त क्र. 784

महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी 

1 ते 7 ऑगस्ट कालावधीत महसूल सप्ताह होणार साजरा

नांदेड दि. 31 जुलै :  जिल्ह्यात महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट 2025 रोजी ‘महसूल दिन आणि 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

महसूल दिन व महसूल सप्ताहात विशेष उपक्रम राबविण्याबाबत आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसिलदार विपीन पाटील, शंकर लाड आदीची उपस्थिती होती. 

या सप्ताहात प्रत्येक दिवशी तहसिल कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदातलीचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व महसूल अधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे दिल्या.  

महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असून यात 156 गावांत गाव तीथे स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. एम-सँड’ धोरणाची अंमलबजावणी, गावातील जे मोठे रस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहेत तिथे दुतर्फा वृक्षारोपण करणार, 4 ऑगस्टपासून ऑनलाईन सुनावनीस प्रारंभ. भूसंपादनाचे सॉफ्टवेअर सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून या कामाला पुर्णत्वाकडे नेणार. महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ सेवापुस्तके अद्ययावत करण्याचे नियोजन केले असल्याचे माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिली आहे.

महसूल सप्ताहातील कार्यक्रमांचे स्वरुप 

शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे. या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले आहे.

शनिवार 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्यात येईल. रविवार 3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे.  सोमवार 4 ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्यात येईल. मंगळवार 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे थेट लाभ हस्तांतरण झालेले नाही, त्यांना घरभेटी देऊन डीबीटीद्वारे अनुदानाचे वाटप केले जाईल.

बुधवार 6 ऑगस्टला शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करून त्या अतिक्रमणमुक्त केल्या जातील. तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेतले जातील. 

गुरुवार 7 ऑगस्टला एम सँड धोरणाची अंमलबजावणी करून नवीन मानक कार्यप्रणालीनुसार धोरण पूर्णत्वास नेले जाईल आणि ‘महसूल सप्ताहाचा’ सांगता समारंभ आयोजित केला जाईल. या महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

000000




वृत्त क्र. 783

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय प्रगतीमध्ये किनवटचा समावेश

जिल्हाधिकाऱ्यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने 2 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सन्मान 

नांदेड दि. 31 जुलै :  नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने 6 निर्देशकांपैकी 4 निर्देशक 100 टक्के पूर्ण केल्यामुळे राज्यातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्यावतीने  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा आयआयएम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील 500 तालुके यात सहभागी झाले. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत 6 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील 27 आकांक्षित तालुक्यानी सहभाग घेतला होता. यात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर - जिवती, दुसऱ्या क्रमांकावर वाशीम - मालेगाव, पालघर - जवाहर तर तिसऱ्या क्रमांकावर नांदेड-किनवट, वर्धा - कारंजा, यवतमाळ-पुसद, गडचिरोली-अहेरी, नंदुरबार-अकराणी या आकांक्षित तालुक्यानी स्थान पटकाविला आहे.

समावेशित निर्देशक 'संपूर्णता अभियाना'चे फोकस क्षेत्र

तालुक्यातील गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण 100 टक्के करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची उच्च रक्तदाब संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची मधुमेह संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील गर्भवती महिलांना आयसीडीएसच्या पूरक पोषण आहार वितरण कार्यक्रमांतर्गत 100 टक्के पूरक पोषण आहाराचे वितरण करणे. मृदा आरोग्य तपासणी कार्ड 100 टक्के वितरण करणे. तालुक्यातील महिला स्वयं सहायता समूहाना खेळत्या भांडवलाचे 100 टक्के वितरण करणे.

संपूर्णता अभियानात किनवट तालुक्याची कामगिरी

संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आकांक्षित किनवट तालुक्याने तालुक्यातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी, उच्च रक्तदाबासाठी तपासणी, आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी आणि माती नमुना संकलन लक्ष्याविरुद्ध तयार केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी हे 4 निर्देशक 100 टक्के संतृप्त केले आहेत.

संपूर्णता अंतर्गत राबविलेले उपक्रम

महिन्याच्या संपुर्णता अभियान मोहिमेत सदर निर्देशक संतृप्त करण्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी संदर्भात - ग्रामपंचायत निहाय उच्च रक्तदाब-मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन, नियमित आढावा, क्षेत्रभेटी, रिक्त पदांची भरती, जनजागृती इत्यादी उपक्रम घेऊन कामास गती देण्यात आली. 

पोषण आहार संदर्भात - पोषण आहारासंदर्भात जनजागृती, पौष्टिक आहार मेळा, पोषण परसबाग निर्मिती, आयसीडीएस शिबीरे, नुक्कड नाटक,  जागरूकता रॅली, प्रदर्शने, पोस्टर बनवणे, पोषण ट्रॅकर अँप चे प्रशिक्षण, पोषण पंधरवडा व पोषण महाचे आयोजन, माता दिनाचे नियमित आयोजन, जनजागृती पर विभिन्न स्पर्धाचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. 

मृदा आरोग्य पत्रिका संदर्भात - शेतीशाळाद्वारे गावस्तरावर माती तपासणीच्या अनुषंगाने जनजागृती, गावनिहाय शिबिरांचे आयोजन, कृषी मित्रांची मदत, जिल्हास्तरीय लॅबशी सातत्याने पाठपुरावा, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून कॅम्पेन मोड वरती माती नमुने गोळा करणे या माध्यमातून दिलेले 1 हजार 500 चे उद्दिष्ट तीन महिन्यात 100 टक्के पूर्ण करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने नागपूर येथे सन्मान 

या अभियानात तालुक्याने संपूर्णता प्रतिज्ञाद्वारे मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्धारित वचनबद्धता 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त करून यात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल राज्य शासनाच्यावतीने  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आय आय एम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत आकांक्षित तालुका किनवटचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस व संबंधित आकांक्षित तालुका फेलो हे राज्यस्तरीय सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर संपूर्णता अभियान सन्मान समारोह

संपूर्णता अभियान मोहिमेत योगदान दिलेल्या संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना पदक व प्रशस्तीपत्र तर तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाचे गाव पातळीवर उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

00000




    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...