वृत्त क्रमांक
966
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची 17 सप्टेंबर पासून प्रत्येक गावात सुरूवात
पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव येथे अभियानाची सुरूवात
नांदेड, दि. 16 सप्टेंबर :- राज्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात बुधवार 17 सप्टेंबर 2025 पासून होत आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे अर्धापूर तालुक्यात मौ. पिंपळगाव (म.) येथे ग्रामसभेत उपस्थितीत राहून मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करुन या अभियानाची सुरूवात करणार आहेत.
जिल्हयातील प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन 17 सप्टेंबर रोजी करण्यात आले असून एका गावात स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरूवात करणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश गावागावात सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे, व विकासाची स्पर्धात्मक भावना रुजवणे हा आहे. हे अभियान केवळ प्रशासकीय यंत्रणेपुरती मर्यादित नसून ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष सहभागावर आधारलेली आहे.
या अभियानाची सुरूवात 17 सप्टेंबर पासुन करण्यात येत असुन अभियानाच्या प्रचार प्रसिद्धी व सर्वांकष मार्गदर्शनाकरीता जिल्हा व सर्व तालुकास्तरावर आमदार यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेस गावस्तरावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा
कालावधी शंभर दिवसाचा असून या कालावधीत गावस्तरावर अभियानाचे मुख्य 7 घटक (सुशासन,आर्थिक स्वावलंबन, जलसमृद्धी, योजनांचे
अभिसरण, संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका
विकास आणि लोकसहभाग) यावर काम करण्यात येणार आहे, अशी माहिती
प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
यांनी दिली आहे.
00000

No comments:
Post a Comment