Friday, July 18, 2025

वृत्त क्र. 742 

प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

 

·         शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या 21 दिवसाच्या अथक प्रयत्नांना यश

 

नांदेड, दि. 18 जुलै :- एका 27 वर्षीय तरुणास उंदीर मारण्याचे विष अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे गंभीर स्थितीत ग्रामीण भागातून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील आपत्कालीन विभागात 24 जून 2025 रोजी आणण्यात आले. रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्याला काविळ झाला होता, यकृत निकामी होण्यास सुरुवात झाली होती व रक्तदाब अत्यल्प झाला होता. या रुग्णावर तात्काळ प्राथमिक उपचार करून रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यकृत जवळपास निकामी झाल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडून रक्तस्राव सुरू झाला होता. अशा स्थितीत जीवनावश्यक उपचार सुरुवातीपासूनच अतितातडीने सुरू करण्यात आले होते.

 

रुग्णाने विष अतिप्रमाणात सेवन केल्याने यकृत जवळपास पुर्णत: निकामी (Acute Fulminant Hepatic Failure) झाल्यामुळे यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) हा एकमेव उपाय होता. मात्र, प्रत्यारोपणाची उपलब्धता नांदेडमध्ये नसल्याने आणि रुग्णाची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने, डॉक्टरांच्या तज्ञ पथकाने यकृत पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने Plasmapheresis ही विशेष उपचार पद्धती वापरण्याचा निर्णय घेतला.

 

रुग्णावर चार वेळा प्लाइमा फेरेसीस उपचारप्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा दिसून आली व यकृताने काम करणे पुन्हा सुरू केले. 21 दिवसांच्या सातत्यपूर्ण आणि कठोर उपचारांनंतर 14 जुलै 2025रोजी रुग्णास सुस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

 

या यशस्वी उपचार प्रक्रियेमध्ये डॉ. शितल राठोड - प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. कपिल मोरे, डॉ. फारुकी अब्दुल राफे सहयोगी प्राध्यापक, डॉ. मनिषा बोलके, डॉ. अमितकुमार पोतुलवार सहाय्यक प्राध्यापक, डॉ. फैजल अहमद अतिक अहमद, डॉ. राहुल देशमुख (यकृत व पोटविकार तज्ञ), डॉ. अभिषेक पाटील, डॉ. आयुषी, डॉ. विजय कनिष्ठ निवासी डॉक्टर्स हे वैद्यकीय तज्ज्ञ तसेच आयसीयू विभागातील नर्सिंग स्टाफ सीमा भोसले, मर्सी खंडारे, सुमन शेळके कर्मचारी सहभागी होते.

 

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोफत उपचार व औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे तसेच उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांच्या भावनांनी उपस्थितांचे मन हेलावून टाकले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे व श्रीमती अल्का जाघव, अधिसेविका हे उपस्थित होते. अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांनी यकृत निकामी झालेल्या रुग्णावर नाविन्यपूर्ण उपचारपद्धती यशस्वीरीत्या राबवून रुग्णास जीवनदान दिल्याबद्दल सर्व वैद्यकीय पथकाचे विशेष कौतुक केले.

0000




No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...