वृत्त क्र. 709
खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा जाहीर; शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा - कृषी विभागाचे आवाहन
नवनवीन प्रयोगातून विक्रमी उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे प्रोत्साहन
नांदेड दि. 10 जुलै :- शेतीत नवनवीन प्रयोग करून विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने खरीप हंगाम 2025 साठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर लाखो रुपयांची बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
या पीकस्पर्धेत शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगांना आणि वाढलेल्या उत्पादकतेला प्रोत्साहन देणे, त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त करणे आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे.
सहभागासाठी पात्रता :
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. भात पिकासाठी किमान 20 आर (0.5 एकर) आणि इतर पिकांसाठी किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड आवश्यक आहे.
कोणत्या पिकांसाठी स्पर्धा ?
खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीन, मुग, उडीद, तुर,ज्वारी, बाजरी, मका, भात,भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण आणि आदिवासी असे दोन गट असतील.
महत्त्वाच्या तारखा आणि शुल्क
मूग आणि उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 अशी आहे.
स्पर्धेत सहभागासाठी प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आकारले जाईल. सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये तर आदिवासी गटासाठी 150 रुपये शुल्क असेल.
बक्षिसांचे स्वरूप
ही पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित केली जाईल. तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे 2 हजार रुपये असेल. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार आणि तिसरे 5 हजार रुपये, तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार आणि तिसरे 30 हजार रुपये असेल.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment