Wednesday, April 30, 2025

वृत्त क्रमांक 459

सामान्यांसह शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना

राबविण्यावर शासनाचा भर :  पालकमंत्री अतुल सावे

 

·         महाराष्ट्र स्थापनेचा 66 वा स्थापना दिन  उत्साहात साजरा

·         जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना वेग द्यावा

·         टॅक्टर अपघातातील मृतकांच्या परिजनांना सानुग्रह निधीचे वाटप

·         उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार 

नांदेड दि. 1 मे :- राज्य शासन नेहमी सामान्य नागरिकशेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. येणाऱ्या काळामध्ये शेतीमातीकृषी सोबतच अन्य सर्व क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासावर राज्य शासनाचा भर राहील ,असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणदुग्‍धविकासअपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

नव्या सरकारच्या गठनानंतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्राधान्याने भर असून जिल्ह्यात आतापर्यत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 812 कोटींची मदत करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना प्राधान्याने राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याची ग्वाही आज त्यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिनानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील जनतेला त्यांनी संबोधित केले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेपोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीमनपाचे महेशकुमार डोईफोडेअपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकरनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर अन्य वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ सन्माननीय नागरिक तसेच स्वातंत्र सैनिक व त्यांचे कुटुंबियाची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात मूल्य शेती अभियान सुरू असून केळी निर्यात संदर्भात कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्र कार्यरत आहे. रेशीम शेतीफुल शेतीबाबतही शासनातर्फे जिल्ह्यामध्ये लक्ष घातले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम शिल्लक राहणार नाही यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी महसूल विभागाला दिले. तसेच अग्रिस्टॅक योजनेमध्ये सर्व शेतकरी यांनी नोंदणी करावी. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 जिल्हयात राबविण्यात येत आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने सबसिडी जाहीर केली आहे. प्रत्येक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

जलसंधारणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून पाऊस पडेपर्यंत कामे पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार टप्पा-2  मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू असुन त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती या अभियानालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्याचे हे दिवस असून संपूर्ण एक महिना आपल्या हातात आहे. जलसंधारणाच्या सर्व कामांना या काळात पूर्ण करावेअशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

अनेक वर्षापासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्गाचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. याशिवाय नांदेड-वर्धा रेल्वे मार्गाचे भूसंपादन झाले आहे. शक्तिपीठ मार्गाच्या संदर्भातही स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागण्यांना समजून घेऊन हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. 

समृद्धी मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या अर्थकारणाला कलाटणी मिळणार असून त्यामुळे अशा मोठ्या प्रकल्पाला सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात ट्रॅक्टरची ट्रॉली विहिरीत पडल्यामुळे 7 शेतमजूर महिलांचा मृत्यू तर 3 शेतमजूर जखमी झाले होते.या दुर्घटनेचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. 

शंभर दिवसांच्या शासकीय कामकाज सुधारणा कृती आराखड्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने मराठवाडा विभागात पहिला क्रमांक व पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड कार्यालयाने पहिल्या तीनमध्ये क्रमांक मिळविल्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय नांदेड यांचे कार्यालय ई-ऑफिस करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालयात ई-फाईल्सचा वापर हळूहळु अनिवार्य केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.  

जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह राज्यगीत सादर केले.  यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीता नंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. परेड कमांडर डॉ. आश्विनी जगतापसेंकड इन कमांडर विजय कुमार धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीस दलजलद प्रतिसाद दलदंगा नियंत्रण पथकसशस्त्र पोलीस पथकसशस्त्र महिला पोलीस पथक,  गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथकराष्ट्रीय छात्रसेना,  अग्नीशमन दलाचे पथकपोलीस बॅन्ड पथकडॉग स्काड,  मार्क्स मॅन वाहनबॉम्ब शोधक व नाशक पथकदंगा नियंत्रक वाहनवज्र वाहन,  अग्निशामक वाहन देवदूत यांचा पथसंचलनात सहभाग होता. 

यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते क्षेत्रीय शासकीय/निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विभागस्तरावर पोलीस विभागात प्रथम क्रमांक विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप तर विभागस्तरावर महसूल विभागात प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल राहुल कर्डिले यांना त्याचबरोबर राजीव गांधी गतीमानता (प्रगती) अभियान स्पर्धा पारितोषक 2024-25 साठी दुसरा क्रमांक कर्मचारी बदल्या ऑनलाईन पोर्टल मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सन 2024 साठी पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह प्राप्त सोनखेड पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि.पांडुरंग मानेनांदेड स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि.साईनाथ पुयडदेगलूर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. किरण कुलकर्णीउस्माननगर पोलीस स्टेशनचे सुशील कुबडेवजिराबाद पोलीस स्टेशनचे गजानन कदमनागरी हक्क संरक्षण विभागातील व्यंकट शिंदेकुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पो.उप.नि.गजेंद्र मांजरमकरगुन्हे अन्वेषन विभागाचे पो.हे.कॉ. विनायक किरतनेलाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे चंद्रकांत पाटीलसद्या पिंपरी चिंचवड पो. आयुक्तालयातील सुधीर खोडवे यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवड झालेला आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील तलाठी गोविंद काळे यांचा 5 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागामार्फत श्री शिवछत्रपती पुरस्कार सन 2022-24 प्राप्त आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू अजय पेंदोरपॅरा ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू म्हणून लताताई उमरेकर यांचा सत्कार तर युवा पुरस्कार सन 2024-25 संदीप कळासरे यांना पर्यावरण संरक्षणवृक्षारोपणनदी स्वच्छतापथनाट्य सादरीकरणबालविवाह प्रतिबंध पशुपक्षी संरक्षण आदी कार्याबद्दल 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व श्रीमती अंजली नातु यांनी केले. 

तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0000























महाराष्ट्र स्थापनेचा 66 वा स्थापना दिनानिमित्त आज राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल यांच्या हस्ते नांदेड येथील पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले.

 

 

 


वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज्)
संस्कृतीपासून सिनेमापर्यंत... गेमिंगपासून ॲनिमेशनपर्यंत... अनुभवा मनोरंजनाच्या अगणित लाटा!
🗓️ दि. १ ते ४ मे, २०२५
📍 जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी, मुंबई


वृत्त क्रमांक 458

क्रीडा व युवक कल्याण मंत्री 

दत्तात्रय भरणे यांचा दौरा 

नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे 1 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार 1 मे 2025 रोजी वाशिम येथून सकाळी 9 वा. मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

  वृत्त क्रमांक 457

अन्न व औषध प्रशासन मंत्री 

नरहरी झिरवाळ यांचा दौरा 

नांदेड दि. 30 एप्रिल :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे 1 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरुवार 1 मे 2025 रोजी हिंगोली येथून सकाळी 11 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण व दुपारी 12 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 456

जिल्हा युवा पुरस्कारासाठी संदिप कळासरे यांची निवड  

1 मे रोजी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त खेळाडुंचा होणार गौरव 

नांदेड दि. 30 एप्रिल :- जिल्हास्तर युवा पुरस्कार निवड समितीमार्फत सन 2024-25 (युवक) करीता संदिप हरीभाऊ कळासरे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरुप 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असुन सदरचा पुरस्कार महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 चा  मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 चा अजय माधव पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडू) रा. किनवट व सन 2023-24 चा लताताई परमेश्वर उमरेकर (पॅरा ऑलम्पिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू) रा. नांदेड यांना महाराष्ट्राचे मा. राज्यपाल महोदय व इतर मान्यवर यांच्या हस्ते बालेवाडी पुणे येथे गौरविण्यात आले असल्याने ते नांदेड जिल्हयाचे रहिवाशी असल्याने अजय माधव पेंदोर व लताताई परमेश्वर उमरेकर यांचा सुध्दा महाराष्ट्र दिन रोजी मान्यवरांच्य हस्ते यथोचीत सत्कार करण्यात येणार आहे.

राज्याचे युवा धोरण सन 2012 अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय 12 नोव्हेंबर 2013 अन्वये जिल्हयात कार्यरत असलेल्या  युवक, युवतीं व नोंदणीकृत संस्थानी केलेल्या समाजहिताच्या उल्लेखीत कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी जिल्हयातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाकडून जिल्हा युवा पुरस्कार सन 2024-25 या वर्षाच्या युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुषंगाने प्राप्त प्रस्तावाची जिल्हास्तर युवा निवड समितीच्यावतीने छाणणी करुन अंतिम पुरस्कारार्थीची नावे निवडण्यात आली आहेत. 

जिल्हयातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, विविध एकविध खेळ संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी दिनांक  1 मे, 2025 रोजी वेळ सकाळी 8 वा. पोलीस परेड मैदान वजिराबाद नांदेड येथे मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्रमांक 455

नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत 

वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष

* ईलेक्ट्रोनिक, ब्लुटूथ वापरबंदीसाठी परीक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

नांदेड दि. 30 एप्रिल :- राष्ट्रीय परीक्षा एजेंसी नवी दिल्ली मार्फत आयोजीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयोजीत करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकुण 56 केंद्र नियोजीत असून त्यापैकी नांदेड शहरात 46 केंद्र, मुदखेड तालुक्यात 4 केंद्र, नायगाव तालुक्यात 4 केंद्र व बिलोली तालुक्यात 2 केंद्रावर ही परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी नियोजीत आहे. नीट (UG) प्रवेश परीक्षाकरीता पात्र उमेदवारांनी रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यत पोहचण्याचे प्रयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले नांदेड यांनी केले आहे.  

परिक्षार्थी मार्फत कुठल्याही गैर मार्गांचा अवलंब परीक्षा काळात होऊ नये. जसे ईलेक्ट्रोनीक उपकरणांचा, ब्लुटूथचा वापर आळा बसणे अनुषंगाने परिक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कान, नाक, घसा संबंधाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये पुढील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे. उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नसेल. मजकूर साहित्य (मुद्रित किंवा लिखित), कागदाचे तुकडे, भूमिती/पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाउच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखनपॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉगटेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तु उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नयेत.

नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेसकोड संदर्भाने दिलेले निर्देशांचे तंतोतंत पालन करणे परिक्षार्थी यांना क्रमप्राप्त आहे. जसे वजनाने भारी असलेला पोषाख, फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधीत असून सांस्कृतिक व पारंपारीक पोषाखासंदर्भाने तपासणी (फ्रिसकींग) संदर्भाने, परिक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वाजेच्या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करुन घ्यावी. मोबाईल फोन, ब्लूटूथ, इअरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड इ. सारखे कोणतेही संप्रेषण साधन परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच इतर वस्तू जसे वॉलेट, गॉगल, हँडबॅग, बेल्ट, कॅप इत्यादी कोणतेही घड्याळ, मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणताही खाण्यायोग्य पदार्थ उघडलेला किंवा पॅक केलेला इत्यादी, तसेच कोणत्याही लपवून आणण्या जोग्या मायक्रोचिप, कॅमेरा, ब्लूटूथ उपकरण इत्यादी संप्रेषण साधने, इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकतात, त्या सर्व प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही उमेदवाराकडे, परीक्षा केंद्रात नमुद प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल आणि कायद्यान्वये संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल, याची सर्व परिक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

000

 



वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज्) तुम्हालाही तुमचा आवाज जगापर्यंत पोहोचवायचा आहे. तुमचा आवाज… तुमचं व्यासपीठ 📷 दि. १ ते ४ मे, २०२५ 📷 जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी, मुंबई #CreateInIndiaChallenge #WAVES #WAVES2025 #WAVESIndia #WAVESummit

Tuesday, April 29, 2025

 वृत्त क्रमांक 454 

पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

पोलीस मैदानावर महाराष्ट्र दिनाचा 1 मे रोजी सकाळी शासकीय समारंभ

 

नांदेड दि. 29 एप्रिल :- महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस समारंभ गुरूवार 1 मे 2025 रोजी वजिराबाद पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ होणार आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावेअसे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालयसंस्थाआदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया बँग सोबत आणू नयेअसेही आवाहन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमसमारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाहीयाची दक्षता संबंधितानी घ्यावीअसेही आवाहनही केले आहे.

 

महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस समारंभ गुरूवार 1 मे 2025 रोजी साजरा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे 28 एप्रिल 2025 रोजी परिपत्रक निर्गमित झाले आहे. या परिपत्रकात नमूद केल्यानुसार सर्व विभाग प्रमुखांनी कार्यक्रमाचे आयोजन करावेअसे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविले आहे.

00000



 मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

वेव्हज २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

००००



 वृत्त क्रमांक 454

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम

नांदेड, दि. २९ एप्रिल :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रुपाली रंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, गजानन जिदंमवार, बी.पी. बडवने, युनिसेफच्या मोनाली धुर्वे तसेच जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक अरुण कांबळे, निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून देत, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था व युनिसेफ यांच्या संयुक्त पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात नागरिकांनी बालविवाहास थारा देऊ नये आणि समाजात बालविवाहविरोधी संदेश पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००






 वृत्त क्रमांक 453 

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 29 एप्रिल :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्‍धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 30 एप्रिल व 1 मे रोजी दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील 

बुधवार 30 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे रात्री 9.30 वा. आगमन व राखीव. 

गुरूवार 1 मे 2025 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 8 वा. पोलीस कवायत मैदान नांदेड येथे आगमन व महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजिराबाद नांदेड. सकाळी 9 ते 9.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे अभ्यांगतांच्या भेटीसाठी राखीव. सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यंत नमस्ते नांदेड उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- दैनिक सत्यप्रभा कार्यालय नांदेड. सकाळी 11 वा. जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2025 पूर्व आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12.45 वा. अमरनाथ राजुरकर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 1.15 ते 2.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील व शहरातील नवनियुक्त मंडळ अध्यक्षांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कुसुम सभागृह नांदेड. दुपारी 2.30 वा. कुसुम सभागृह नांदेड येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

0000

 

  वृत्त क्रमांक   497 डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेश्वर माचेवार यांचे आवाहन नांदेड दि...