कळी उमलताना या नाविण्यपुर्ण मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे निवारण करण्यासाठी “कळी उमलताना” ही नाविण्यपूर्ण योजना आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव महादेव येथे किशोरवयीन मुलींमधील ॲनिमियाचे निवारणासाठी कळी उमलताना या नाविण्यपुर्ण मोहिमेचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाविण्यपूर्ण मोहिम जिल्ह्यात 8 मार्च 2023 ते 8 मार्च 2024 या कालावधीत वर्षभर राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. निना बोराडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश देशमुख, सुभाष खाकरे आदीची उपस्थिती होती.
किशोरवयीन मुली एकुण लोकसंख्येच्या 10 ते 11 टक्के असतात. प्रौढत्वाच्या वाढीचा हा टप्पा सर्वात भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप महत्वाचा असतो. विचारांची परिपक्वता, अनेक शारीरिक बदल, मनोसामाजिक बदल याच वयात घडतात. याच वयात मुलींना आहार विषयक गैरसमजुती, त्यामुळे आहारातील महत्वाच्या घटकांची कमतरता, ॲनेमिया-लोहाची कमतरता, वजन कमी असणे, लैगिंक आजार, मानसिक आजार इतर सवयी, लठ्ठपणा होणे आदी आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. या वयोगटातील मुलींच्या आरोग्यावरच पुढच्या पिढीचे आरोग्य व उपयुक्तता अवलंबुन आहे. बरेच आजार जसे लोहाची कमतरता, कुपोषण, ॲनेमिया आजारांनी ग्रस्त किशोरवयीन मुलीपासून ते तिच्या होणाऱ्या बाळालासुध्दा हा आजार संक्रमित होतो. ही साखळी तोडण्यासाठी या उपक्रमाची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.
0000
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment