Friday, July 1, 2022

 शेतकऱ्यांबद्दल प्रत्ये‍क विद्यार्थ्यांच्या मनात

स्वाभिमान निर्माण करू 

-   मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत शेतीचा जागर

विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रातिनिधीक शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- शेती-शेतकरी आणि खेड्यांशी असलेली बांधिलकी जिल्हा परिषदेच्या शाळांनी अधिक जबाबदारीने जपली. शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी आणि जागरूक पालक समित्यांनी याला एक वेगळा आयाम दिला आहे. एकेकाळी जिल्हा परिषदांच्या शाळांकडे केवळ गुणात्मक पातळीवर पाहिले जायचे. हा गुणात्मक दृष्टिकोण जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक सजग व डोळस करून दाखविल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काढली.

 

नांदेड जवळील विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती व कृषि दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रेरक डॉ. कल्पना मेहता, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशमुख, सचिव साहेबराव हंबर्डे, काळेश्वर ट्रस्टचे शंकरराव हंबर्डे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, मुख्याध्यापक एन. एन. दिग्रसकर व मान्यवर उपस्थित होते.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास 8 हजार 599 शिक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या एकुण शाळा 2 हजार 195 शाळा आहेत. जवळपास 2 लाख 10 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खाजगी शाळांसह शिक्षकांची संख्या 3 हजार 739 तर या विद्यार्थ्यांसह एकुण 6 लाख 35 हजार एवढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी आवड निर्माण केली तर त्यांच्या नजरेत शेतकरी घेत असलेले कष्ट सहज उजळून निघतील. शेतीच्या श्रमाला त्यांच्या मनातही प्रतिष्ठा निर्माण होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

 

शालेय विद्यार्थ्यांच्या मनात शेतीविषयी एक उदासिनता निर्माण झालेली आहे, हे सत्य नाकारता येत नाही. फार कमी मुले शेतकरी व्हावायचे आहे, अशी मनिषा व्यक्त करताना दिसतात. याबद्दल मुलांनाही दोष देता येणार नाही. परंतू त्यांचे कसब व त्यांच्या मनात उच्च तंत्रज्ञानाप्रती असलेली ओड लक्षात घेऊन कृषि क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानाची जोड दिली तर ही नवी पिढीही तेवढ्याच कौशल्याने शेतीशी जुळल्या जाईल. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासमवेत म्हणूनच कृषि शिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. एकप्रकारची ही पेरणीच असून मुलांकडे बियाणांच्या रूपात पाहून तसे संस्कार त्यांच्यावर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आजच्या कृषि दिनानिमित्त जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये शेती व शेतकऱ्यांविषयी आवश्यक ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी माझी शेती माझा अभिमान ही मोहिम एक सुरूवात असून वर्षेभर आम्ही हा उपक्रम सुरू राहिल. प्रत्येक शाळांच्या पालक समित्या, शिक्षक हा वसा पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या.        

 

वर्षा ठाकूर-घुगे यांनी विद्यार्थ्यांचा शेतीवर घेतला तास

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहावी क मधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत कृषि विषयाबाबत एक तास घेतला. तुम्ही केवळ विद्यार्थी नाहीत तर देशाची प्रेरणा आहात. आपले आई-वडील ग्रामीण भागातले आहेत. त्यांना शेतीच्या कामामध्ये आपण मदत करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. यातूनच कामाप्रती आपल्या मनात प्रतिष्ठा निर्माण होते. सातत्य, परिश्रम, आणि अभ्यास याची योग्य जोड आपल्या लावता आली पाहिजे. आपला सभोवताल प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. यातूनच प्रत्येकाला आपले ध्येय गाठता येईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्राबाबत प्रातिनिधीक प्रश्न उपस्थित केले.

00000 




No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...