Wednesday, July 6, 2022

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी

31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना घेता येईल सहभाग   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- यावर्षीच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाली असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रविवार 31 जुलै 2022 पर्यंत यात सहभाग घेता येईल. हा सहभाग ऐच्छिक स्वरुपात आहे. या योजनेमुळे हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, अपुरा पाऊस, पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान यापासून नियम व अटी शर्ती नुसार शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. ही पीक विमा योजना युनायटेड इंडिया इंन्शुरस कंपनी मार्फत राबविली जात आहे. 

पीक निहाय विमा संरक्षित प्रती हेक्टरी रक्कम व शेतकरी हप्ता पुढील प्रमाणे आहे. ज्वारी पिकासाठी प्रती हेक्टरी 30 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी विमा हप्ता 600 रुपये निश्चित करण्यात आला आहे. सोयाबिन पिकासाठी प्रती हेक्टरी 54 हजार 500 रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी विमा हप्ता 1 हजार 90 रुपये निश्चित करण्यात आला आहे. मुग, उडीद पिकासाठी प्रती हेक्टरी 22 हजार 500 रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी विमा हप्ता 450 रुपये निश्चित करण्यात आला आहे. तूर पिकासाठी प्रती हेक्टरी 36 हजार 802 रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी विमा हप्ता 736.4 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कापूस पिकासाठी प्रती हेक्टरी 57 हजार 500 रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी विमा हप्ता 2 हजार 875 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा अथवा न होण्याचा पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे. सहभाग नोंदविण्यास इच्छूक नसाल तर तसे घोषणा पत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर देणे आवश्यक आहे. जे शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करून घेण्याबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल. 

विमा योजनेअंतर्गत विविध जोखीम अंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून निश्तिच केली जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी भरपाई निश्चित करण्यात येते. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरा स्वयंघोषणापत्र, सात/बारा होर्डिंग या कागदपत्रांची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी दिली. अधिकाअधिक शेतकऱ्यांनी पीक योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...