Saturday, April 30, 2022

अक्षय्य तृतीया व अशा काही विशीष्ट मुहुर्तावर होणारे

बालविवाह थांबण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात व राज्यात अक्षय तृतीया, तुळशी विवाह अशा काही मोजक्या मुहूर्तावर शहरासह ग्रामीण भागात बालविवाह लावण्याची पद्धत असते. परंतु कायद्याने हा गुन्हा असल्याने असे बालविवाह जिल्ह्यात होऊ नये यासाठी नेमून दिलेल्या यंत्रणेकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवल्यास बालविवाह रोखता येतो. असे बालविवाह आढळून आल्यास त्या पालकांचे समुपदेशन करून बालविवाहाचे दुष्परिणाम समजून सांगावे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आपल्या अधिनस्त यंत्रणेला तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला बाल कल्याण समिती आणि चाईल्ड लाईन सतर्क झाले आहेत. 

‌महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अन्वये करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 मधील कलम 10 (1) (जे) नुसार स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी होणे व सल्ला देणे हा आयोगाच्या स्थापने मागचा उद्देश आहे. 

महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना असे निदर्शनास आले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात आजही अक्षय्य तृतीया व तुळशी विवाह अशा विशेष दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात विवाह व बालविवाह होत असतात. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असू नये, अशी तरतूद आहे. मुलींना लहान वयात विवाह झाल्यास तिची मानसिक व शारीरिक परिपक्वता न झाल्याने तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच मुलीच्या शरीराची पूर्ण वाढ न झाल्याने तिला मातृत्व आल्यास होणारे अपत्य ही कुपोषित होण्याची शक्यता अधिक असते. यास्तव बालविवाह सारख्या अनिष्ठ प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. बालहक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील बालविवाहांची जिल्हानिहाय प्रसिध्द केलेली आकडेवारी पाहता राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी महाराष्ट्रातील बालविवाहांची सद्य:स्थिती पाहता सदरचे बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. दिनांक तीन मे रोजी अक्षय्य तृतीया असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह व बालविवाह होण्याची शक्यता असते. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. यातील कलम 9,10,11 नुसार बाल विवाह करणाऱ्या आई - वडील, नातेवाईक, लग्न विधी लावणारे, मंडप, बँड वाले या सकट सर्व वऱ्हाडी यांवर 1 लाख रुपये दंड व 2 वर्षांपर्यंतचा करावासाची शिक्षा आहे. ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी व बालविवाह प्रतिबंधक प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका, ग्राम बाल संरक्षण समित्या यांचेमार्फत बालविवाह रोखण्यासंबंधी कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ़ आणि एस बी सी 3 यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 588 अग्रभागी कर्मचारी- ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेविका यांना बाल विवाहाची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी ग्रामपातळीवर यंत्रणांना हे प्रशिक्षण द्यावे तसेच जनजागृतीचे कार्यक्रम रबवावे व बाल विवाह रोखल्याचा अहवाल जिल्हा महिला ब बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेश कृपा शास्त्रीनगर- भाग्यनगर कार्यालय फोन 02462-261242 ह्या वर सादर करावा अशा सूचना देखील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्थानिक यंत्रणा यांना दिल्या आहेत.

0000

 जिल्हा परिषद स्थापनेला साठ वर्षे पूर्ण

आज हिरक महोत्सव कार्यक्रम ;

 

·       पालकमंत्री अशोक चव्हाण करणार मार्गदर्शन 

·       विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्यात  1 मे 1962 रोजी त्रिसदस्यीय कार्यपद्धती अस्तित्वात येऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्थापनेस 1 मे  रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्यातील जिल्हा परिषदअंतर्गत हिरक महोत्सव समारंभ साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार उद्या रविवार दिनांक 1 मे रोजी नांदेड जिल्हा परिषदेत  सकाळी 8.30 वाजता हिरक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. 

 

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले असून उपस्थितींना ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. 

 

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी-कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच उद्या 1 मे रोजी सकाळी 11.30 वाजता पुणे जिल्हा परिषदअंतर्गत हीरक महोत्सवानिमित्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा मागील 60 वर्षाचा मागोवा आणि भविष्यातील आव्हाने याविषयी राज्यसभेचे सदस्य शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री पुणे तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब व फेसबुकद्वारे करण्यात येणार आहे. हे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था नांदेड जिल्हा परिषदेत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिरक महोत्सव कार्यक्रमात उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

0000000

Friday, April 29, 2022

 आपल्या मराठवाड्याचा माणूस

कोविडसाठी देशाचे नेतृत्व करतो याचा अभिमान

-        पालकमंत्री अशोक चव्हाण

 समाजातील असमानता आणि आरोग्याच्या प्रश्नावर

नेटाने काम करण्यासाठी पुरस्कारातून प्रेरणा

-        पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर  

 

·        डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात सारेच भावूक     

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मराठवाड्यातला आपला भूमिपुत्र कोरोना सारख्या आजाराच्या संशोधनासाठी, या आजारातून सर्व देशवासियांना वाचविण्यासाठी संशोधनात स्वत:ला मग्न करून घेतो, या आजाराशी लढायचे कसे, या आजारापासून सुरक्षित राहायचे कसे याचे शास्त्रोक्त व सुत्रबद्ध पद्धतीने लोकांना बळ देतो, कोरोनासह आजवर असंख्य जीव घेण्या आजारातून नव्या लसीचे संशोधन देतो, असे आपले ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री सन्मानित डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याप्रती प्रत्येकाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या जीवन गौरव पुरस्काराची त्यांच्या माध्यमातून जी भव्य सुरूवात झाली आहे, विशेषत: या निवडीने पुरस्काराचाही गौरव झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या रौप्य महोत्स सोहळ्याचे उद्घाटन व श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कुसूम सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास पुरस्काराचे मानकरी पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, अपर्णा नेरळकर, पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. 

महानगरपालिका 25 वर्षांचा एक टप्पा पार पाडत असतांना मला एका आठवणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती आठवण आजही तेवढीच ताजी आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी तेंव्हा मनोहर जोशी होते. नांदेड वाघाळा महानगरपालिकेची घोषणा त्यांनी करून या महानगराच्या विकासाला नवे पर्व सुरू करून दिले. या विकासाच्या टप्प्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूत्ता गद्दी सोहळ्या निमित्त विविध सेवा-सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता पालकमंत्री म्हणून, राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून निधीसाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला. त्यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी जी पाठराखण केली त्यामुळेच आपण पुन्हा या महानगराच्या विकासासाठी सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांची कामे करू शकत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नांदेडकरांच्यावतीने मी आभार मानतो या शब्दात त्यांनी नांदेडच्या विकासाला अधोरेखीत केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पहिले नगराध्यक्ष म्हणून कारकिर्दपासून ते आजवर जो मैलाचा टप्पा आपण गाठू शकलो त्यात सर्वसामान्य लोकांचेही योगदान अधिक आहे, या  शब्दात त्यांनी नांदेडकरांचे आभार मानले.

 कोरोनाचा काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. पहिल्या लाटेतच मी बाधित झालो. उपचारासाठी मुंबईला जातांना लोकांच्या मनात एक धास्ती होती. अनेकांना ही भेट शेवटीचीच आहे की काय इथपर्यंत भीतीने गाठले होते. अशा काळात नांदेडचा भूमिपुत्र संपूर्ण देशाला कोरोनातून बचावासाठी दिलासा देतो, या आजाराची माहिती सांगून लोकांना धीर देतो, ही बाब अशाकाळात औषधापेक्षाही अधिक परिणामकारक होती, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगून पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांच्या कार्याला अधोरेखित केले. या काळात सगळ्यांना खूप काही सोसावे लागले. जिल्हा अधिक सुरक्षित रहावा यावर आम्ही नंतर अधिक दक्ष राहिलो. संपूर्ण जिल्हाभर कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी केंद्र उभारण्यावर आम्ही भर दिला. नांदेड महानगर हे वैद्यकीय क्षेत्रात प्रगतशील असल्याने स्वाभाविकच अप्रत्यक्षरित्या त्याचा ताण नांदेड वर आला. शेजारच्या जिल्ह्यातून रुग्ण येथे आले. अशा स्थितीत संपूर्ण जिल्हा प्रशासनची टीम, वैद्यकिय महाविद्यालय, महानगरपालिका, आरोग्य विभाग यांनी जे काम केले त्याला तोड नाही. एक जबाबदारीचे पर्व कोरेाना काळात आपण देऊ शकलो, याचा आवर्जून उल्लेख पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

 

नांदेड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन हे वाढत्या महानगराच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहे. यात अनेक पातळीवरचे प्रश्न आहेत. नागरीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेत ज्या समतेचा आग्रह डॉ. रमण गंगाखेडकर यांनी घेतला आहे त्या जेंडर समानता, तृतीयपंथीयांना अधिकार आदी नाजूक प्रश्न जिल्हा प्रशासनातर्फे संयमाने हाताळल्या जात असल्याचे सांगून लोकाभिमूख प्रशासनाची त्यांनी व्याप्ती व जबाबदारी स्पष्ट केली. डॉ. रमण गंगाखेडकर हे नव्या पिढीचे प्रेरणास्थान आहेत. मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान जरूर आहे. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचले जावेत, त्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळावे यासाठी वेळोवेळी निमंत्रीत केले जाईल, असे ते म्हणाले.    

शब्द निट सापडत नाहीत. कोणी सन्मान केला की जबाबदारीमध्ये आणखी वाढ होईल याची एक नकळत धास्तीही राहते. प्रत्येकांच्या मनाशी जवळकिता साधणाऱ्या या साध्या शब्दातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आपल्या साध्या जीवन शैलीसह कर्तव्य तत्पर विचारसरणीला प्रवाहित केले. डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. मनाच्या भावूक अवस्थेला सावरत त्यांनी उपस्थितांशी साधलेला संवाद हा प्रत्येकजण टिपून घेत होता. जिल्हा परिषद शाळा, बिलोली, धर्माबाद येथील विज्ञान महाविद्यालय, अंबेजोगाई येथील वैद्यकिय महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील वैद्यकिय महाविद्यालयातील सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत हा पुरस्कार अप्रत्यक्षरित्या त्यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण भागालाच अर्पण केला.    

डॉ. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तीमत्व उत्तुंग होते. त्यांची बरोबरी कोणाला करता येणार नाही. माझे वडील याच जिल्ह्यात तहसिलदार असल्याने त्यांच्या बोलण्यातून शंकररावांप्रती सदैव नम्रतापूर्वक उल्लेख असायचा. ते नेहमी म्हणायचे शंकररावांसारखी सचोटी कोणाजवळ मिळणार नाही जिल्हा परिषदेच्या शाळेतून मी चांगल्या गुणांनी एसएससी उत्तीर्ण झालो. वडील म्हणाले चल शंकररावांना भेटायला जावू” मी घाबरलो. तसाच घाबरत त्यांच्याकडे गेलो. त्यांच्यातला साधेपणा पाहून माझ्या मनातली भिती गळून पडली ते लक्षातही आले नाही. या भेटीची आठवण डॉ. रमण गंगाखेडकर यांनी आवर्जून सांगत शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

लहानपणी शिकत असतांना आपण फार काही पुढे मोठे होऊ असे काही निश्चित नव्हते. प्रामाणिकपणे शिकत राहिलो. विशेषत: शिक्षक जे काही सांगतील ते सर्व नम्रतेने ऐकत राहिलो. माझ्या जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांपासून ते पुढे वैद्यकिय महाविद्यालयापर्यंत व जिथे कुठे शिक्षणाचा संबंध येत राहिला तिथे मी गुरूजींच्या सांगण्याला प्राधान्य दिले. आज माझ्यात जे काही चांगले असेल ते गुरुजनांचे आहे. माझी सर्व मूल्य जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे घडली असे निसंकोचपणे सांगत त्यांनी गुरू जर चांगले भेटले नसते तर केवळ पैशाच्या मागे लागणारा डॉक्टर झालो असतो, असेही स्पष्ट सांगायला त्यांनी कमी केले नाही.

 

वैद्यकिय क्षेत्रात कार्य करीत असतांना विविध पातळ्यांवर काम करण्याची संधी मला मिळाली. यात एड्स संदर्भात कार्य करीत असतांना सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांपासून तृतीयपंथीयापर्यंत, विविध सेक्स वर्कर्स व तळागाळातील लोकांकडून पुस्तकांच्यापलीकडे शिकायला मिळाले. एड्सला नियंत्रण हे गोळ्या औषधांसमवेत वर्तणाशी निगडीत अधिक आहे. यासाठी लोकांना अगोदर समजून घेणे महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन त्यांचेही प्रतिनिधी एड्स कंट्रोल सोसायटीवर, संस्थांवर असले पाहिजेत यासाठी धरलेल्या आग्रहाचा त्यांनी उल्लेख केला. आयुष्यात मला प्रत्येक ठिकाणी मन मोकळे करणारी माणसे मिळाली. सेवाभावी संस्थांमुळे, समाजातील या जागृत लोकांमुळे मला पद्मश्रीचा सन्मान मिळू शकला अशी वस्तुस्थिती प्रांजळपणे त्यांनी सांगितली. पुरस्कारासाठी कुठेही अर्ज करणे मला भावले नाही. एक मात्र खरे की डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराने मला माझ्या पुढच्या आरोग्य क्षेत्रातील कामासाठी व समाजात जी असमानता आहे त्यावर काम करण्यास बळ मिळाले आहे, प्रेरणा मिळाली आहे असे पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. 

नांदेडच्या नगरपरिषदेपासून ते महानगरपालिकेच्या प्रवासातील विविध संदर्भांना उजाळा देणारा हा महोत्सव आहे. या महानगराच्या विकासातील कटिबद्धतेला, योगदानाला अधोरेखीत करणारा हा उत्सव आहे. डॉ. शंकरराव चव्हाण हे या नगराचे पहिले नगराध्यक्ष राहिले असून विकासाचा त्यांनी घातलेला पाया हा तेवढाच भक्कम असल्याने या शहराच्या विकासातील काळानारूप निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आपल्या महानगरपालिकेत, पालकमंत्री अशोक चव्हाणा यांच्या नेतृत्वात असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डी. पी.  सावंत यांनी केले. 

यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौर पद भूषवून योगदान देणाऱ्या सर्व महानुभवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर जयश्रीताई पावडे यांनी केले तर आभार मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी मानले.

0000000











 महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन

 

·         वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त रविवार 1 मे 2022 रोजी येथील वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय, पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टने कृपया बँग सोबत आणू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000

 एक रक्कमी थकीत कर्ज भरणाऱ्या

लाभार्थ्यांना व्याज रक्कमेत सवलत

नांदेड (जिमाका) दि. 29 :- महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनेच्या थकीत कर्ज रक्कमेची एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबाबत सुधारित एक रक्कमी परतावा (ओटीएस) योजना प्रथम टप्यात 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यास मान्यता दिली आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे केले आहे. 

एक रक्कमी परतावा (ओटीएस) योजनेंतर्गत महामंडळाच्या लाभार्थीना थकीत कर्जाच्या व्याज दरात 2 टक्के सुट देऊन कर्जखाते बंद करण्याची  एक रक्कमी  परतावा (ओटीएस) योजना पुढील आदेशापर्यंत राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. महामंडळाच्या बहुतेक सर्व जिल्ह्यात कर्ज परतफेडीची मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून त्यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. राज्यात मागील दोन वर्षापासून कोविड-19 ची गंभीर परिस्थिती उद्भवली असून त्यातून काही लाभार्थींचे व्यवसाय बंद झाले आहेत. थकीत कर्ज प्रकरणात वसुली व्हावी यासाठी संपुर्ण थकीत कर्ज देण्याबाबत संचालक मंडळास सादर करण्यात आले होते. महामंडळाच्या थकीत लाभार्थीसाठी संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेची एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याची सुधारित एक रक्कमी परतावा ओटीएस योजना राबविण्यास मान्यता दिली आहे, असेही महामंडळाने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

 अवैध सावकारी लूट  खपवून घेतली जाणार नाही

-        सहकार मंत्री बाळासाहेब पाटील 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- अवैध सावकारी लूट थांबविण्यासाठी कायदेविषयक जेवढे प्रावधान आहेत त्याचा काटेकोर वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून याला आळा घातला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारांनी कब्जा करून ठेवल्या आहेत, हडप केलेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याबाबत कायदाचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले. 

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावळ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, मार्केटिंग फेडरेशनचे उपसरव्यवस्थापक वीर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बाजार समितीचे सचिव व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. हे गाळप 25 मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रादेशिक सहसंचालक सचीन राव यांना दिल्या. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात एकुण लक्षांकाच्या 75 टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने लक्षांकाच्या 87 टक्के कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्हा बँकेतर्फे दोन एटीएम व्हॅन व नवीन एटीएम कार्ड वाटप तसेच एटीएम उभारणीसाठी पुढाकार घेतला. प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा बँकेने 12 कोटी रुपयांचा नफा कमावला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजे. याचबरोबर बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नांदेड येथे सहकार खात्यातील सर्व संबंधित कार्यालयांसाठी एक प्रशस्त इमारत, सहकार संकुल उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी उपनिबंधक नांदेड यांना सांगितले.

00000  

Thursday, April 28, 2022

 पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शुक्रवार, 29 एप्रिल 2022 रोजी नांदेड विमानतळ येथे दुपारी 2.30 वा. आगमन. सायं.4 वा. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- कुसूम सभागृह नांदेड. सायं. 6 वा. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चला हवा येवू द्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- मार्केट कमिटी मैदान, नवा मोंढा नांदेड.

00000

 सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचा दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

शुक्रवार 29 एप्रिल 2022 रोजी मुंबई येथून राज्यराणी एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानक येथे सकाळी 7.20 वा. आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. नांदेड जिल्ह्यातील सहकार व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून रा.कॉ.पा. (नांदेड ग्रामीण) जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. स्थळ- शाहुनगर आनंदनगर रोड विद्युतनगर बसस्टँड समोर नांदेड. सकाळी 10.30 वा. जिल्हाध्यक्ष (नांदेड ग्रामीण) हरिहर भोसीकर यांच्या निवासस्थान येथून देगलूरकडे प्रयाण. दुपारी 12 वा. देगलुर येथे आगमन व डॉ. कपील पाटील खुतमापुरकर यांचे सह्याद्री हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- भारत फॅन्सी समोर जुने कद्रेकर हॉस्पिटल देगलूर. दुपारी 2.30 वा. राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यास उपस्थिती. स्थळ- रा.कॉ.पार्टी कार्यालय उदगीर रोड देगलूर. सायं. 4 वा. देगलूर येथुन नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 6.20 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं. 6.50 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश नांदेड जिल्ह्यात 3 मे 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत लागू राहणार आहेत, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 19 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 3 मे 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

000000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदी पात्र परिसरात कलम 144

नांदेड (जिमाका) दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून गुरूवार 19 मे 2022 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

 

·       ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

 स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्र

नुतनीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 4 मे 2022 पासून स्कूल बस संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी विशेष ऑनलाईन अपॉइंटमेंट कोटा सुरु करण्यात येणार आहे. ज्या स्कूल बस चालक-मालकांना ऑनलाईन अपॉईंमेंट मिळाले नसल्यास त्यांनी पाच दिवस अगोदर कार्यालयात अर्ज करावा. त्यांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाबाबतची तपासणी करण्यात येईल. स्कूल बस चालक-मालकांनी वाहनाच्या वैध कागदपत्रांसह अपॉईंटमेंट घेतलेल्या दिनांकास योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीस उपस्थिती रहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

0000

Wednesday, April 27, 2022

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 87 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 802 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.

आज उपचार घेत असलेल्या बाधितामध्ये नांदेड मनपा अंतर्गत  गृह विलगीकरणात 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 670

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 80 हजार 652

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 802

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-02

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...