Monday, December 27, 2021

  

ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर नांदेड जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर    

नांदेड (जिमाका) 27 :- कोविड-19 विषाणू महामारीमुळे जगभरातील विविध देशामध्ये आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण, जनसामान्यांच्या आरोग्यावर झालेला परिणाम सर्वांनी अनुभवला आहे. कोविड-19 या विषाणूचा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांमध्ये जगभर वेगाने पसरत आहे. राज्यात याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातही हिमायतनगर येथील दोन व्यक्ती या नवीन ओमिक्रॉन विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्‍ह्यातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन आदेशान्वये दिलेल्या निर्बंधांच्‍या अनुषंगाने व निर्देशील्‍याप्रमाणे नांदेड जिल्‍ह्यात निर्बंध लादणे अत्यावश्यक आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा, 2005 नुसार सक्षम प्राधिकारी म्‍हणून राज्‍य व्‍यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्‍ह्यात पुढील निर्बंध लागू केले आहेत.  

 

लग्‍न समारंभाच्या बाबतीत, बंदिस्‍त सभागृहांमध्‍ये एकावेळी उपस्थितांची संख्‍या शंभरच्‍यावर नसावी (जसे,मेजवानी / मॅरेज हॉल इ.) आणि खुल्‍या-मोकळ्या जागेवरील ही संख्‍या एकावेळी 250 च्‍या वर नसावी किंवा त्‍या जागेच्‍या क्षमतेपेक्षा 25 टक्के यापैकी जी संख्‍या कमी असेल तेवढी असावी.

 

इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती सामान्यतः संपूर्ण कार्यक्रमात सतत असते, तेथे उपस्थितांची एकूण संख्या देखील बंदीस्‍त जागेसाठी 100 आणि खुल्या जागेसाठी 250 च्‍या वर नसावी किंवा जागेच्‍या क्षमतेपेक्षा 25 टक्के यापैकी जी संख्‍या कमी असेल तेवढी असावी.

 

वर नमूद केलेल्‍या कार्यक्रमांव्‍यतिरिक्‍त इतर कार्यक्रमांसाठी, बंदीस्‍त जागांसाठी जेथे आसन क्षमता परवाना/परवानगी प्राधिकरणाने घोषित केलेली आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के पेक्षा जास्त नसावी आणि ज्‍याठिकाणी आसन क्षमता परवाना/परवानगी प्राधिकरणाने निश्‍चित केलेली नसेल त्‍या जागेवर एकूण क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त नसावी व ते जर खुल्‍या ठिकाणी परवाना/परवानगी देणाऱ्या प्राधिकरणाने घोषित केलेल्या क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त नसावी. क्रीडा, स्पर्धा, खेळाचे समारंभ याठीकाणी, प्रेक्षक संख्येच्या 25 टक्के पेक्षा जास्त नसलेल्या ठिकाणी आयोजित केल्‍या जाऊ शकतील.

 

वर नमुद केलेल्‍या कोणत्याही श्रेणीमध्ये येत नसलेल्‍या इतर कोणत्याही प्रकारच्या मेळाव्याच्या बाबतीत, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्‍या किती असावी हे निश्चित करतील,असे करतांना संदर्भीय 4 वरील आदेश 27 नोव्हेंबर 2021 मधील सूचनांनुसार व्‍यक्‍तींची संख्‍या निश्‍चित करण्‍यात येईल.

 

वरील दिशानिर्देशांच्या व्यापकतेचा पूर्वग्रह न ठेवता, हे स्पष्ट केले आहे रेस्टॉरंट्स, जिम्नॅशियम, स्पा, सिनेमा हॉल आणि थिएटर्स हे परवाना/परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी घोषित केल्यानुसार त्‍यांच्‍या क्षमतेच्या 50% संख्‍येऐवढ्या क्षमतेने सुरु राहतील व या आस्थापनांनी त्‍यांना  देण्‍यात आलेल्‍या परवाना/परवानगी दिल्‍यानुसार क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेची संख्‍या ठळकपणे घोषित करावी.

 

नांदेड जिल्‍ह्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी असेल. या निर्देशांतर्गत स्पष्टपणे अंतर्भूत नसलेल्या कोणत्याही क्रियाकलापाच्या बाबतीत, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी हे सामान्यत: या तत्त्वांचे पालन करून किंवा स्थानिक परिस्थितीच्या आधारावर, योग्य वाटल्यास, योग्य निर्बंध ठरवू शकतील. अशा परिस्थितीत, असे निर्बंध लागू करण्यापूर्वी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाव्‍दारे पूर्व सूचना देण्‍यात येईल.

 

या आदेशामध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्रियाकलापाच्या बाबतीत, विशिष्ट स्थानिक परिस्थितीमुळे कठोर निर्बंध आवश्यक आहेत असे जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे मत असल्यास, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन येथे समाविष्ट असलेल्या आणि त्यावरील निर्बंधांवर अधिक कठोर निर्बंध लागू करू शकतील. अशा परिस्थितीत, असे कठोर निर्बंध लागू करण्यापूर्वी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाव्‍दारे सार्वजनिकरित्‍या पूर्व सूचना देण्‍याची कारवाई करतील. विशेषत: नमूद केलेल्या बाबीं व्यतिरिक्त इतर सर्व विद्यमान निर्बंध संदर्भीय 4 वरील आदेश दिनांक 27 नोव्हेंबर 2021 नुसार लागू राहतील. 

 

हे आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी 25 डिसेंबर 2021 रोजी पासून लागू केला आहे. या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील व संदर्भ 1 व 2 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका/नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्‍ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुख यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी (Incident Commander) उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...