Monday, March 26, 2018


नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचा शुभारंभ
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीसह
कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 26 :- हवामानात बदल होत असून शेतकऱ्यांनी पीक परिस्थितीत बदल करुन सेंद्रीय शेती व कृषिपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उत्पादन वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
नांदेड जिल्हा कृषि महोत्सवाचे 26 ते 30 मार्च 2018 या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथील मैदानावर आयोजित केला आहे. या कृषि महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बी. आर. कदम, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ भुजबळ, मनोहर शिंदे, किशोर भवरे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा मार्केटींग अधिकारी रामप्रसाद दांड, नाबर्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रविण घुले यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे पुढे म्हणाले की, जिल्हा कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना शेतीपूरक विविध विषयांवर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व नागरीकांनी या कृषि महोत्सवात शासनाच्या विविध योजना व तंत्रज्ञानाची माहिती घेऊन उत्पादनात वाढ करावी. कृषिपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक व आर्थिक मदत केली जाईल. सध्या जिल्ह्यात रेशीम शेती सातशे एकरवर केली जात असून ती पाच हजार एकर पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी एक पाऊल पुढे यावे, असेही आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि महोत्सवात शेतीविषयक माहिती घेऊन कृषि उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांनी केले. यावेळी बी. आर. कदम, किशोर भवरे यांची समयोचित भाषणे झाली.
या महोत्सवात जिल्ह्यातील कृषि, पुशसंवर्धन, कृषि विज्ञान केंद्र, कृषि पणन मंडळ, जिल्हा मार्केटींग, बियाणे महामंडळ, कृषि उद्योग विकास महामंडळ, जिल्हा रेशीम, पुरवठा, वन, कापुस संशोधन केंद्र, उद्योग, फळरोप वाटिका, जैवीक किड नियंत्रण प्रयोगशाळा, मृद सर्वेक्षण व मृद चाचणी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, स्वच्छता, मतदान नोंदणी, आधार नोंदणी, महिला व बालविकास, कापूस संशोधन केंद्र, खादी व ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आदि विभागांची दालने असून येथे माहिती दिली जात आहे. तसेच शेतकऱ्यांची कृषि उत्पादने, कृषि साहित्य, महिला उद्योग मंडळ, फुल शेती, ठिंबक आदी 120 दालनांचा यात सहभाग आहे. अनेक दालनावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. सेंद्रीय धान्य तसेच सुक्ष्म सिंचनाच्या स्टॉलसह शेतकरी माहिती घेतांना आढळून आले.  
जिल्हा कृषि महोत्सवाची सुरुवात दिपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले. सुत्रसंचालन कृषि सहाय्यक वसंत जारीकोटे व संदिप पावडे यांनी केले तर आभार जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी मानले. या कृषि महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचतगटाचे सदस्य, नागरिक, कृषिसह विविध विभागाचे अधिकारी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...