Wednesday, January 11, 2017

रोकडरहित साक्षरतेसाठी गो कॅशलेससह
आपलं नांदेड 1.1 नव्या स्वरुपात उपलब्ध
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते अवतरण संपन्न

नांदेड दि. 11 :- रोकडरहित (कॅशलेस) आर्थिक व्यवहार करण्यासाठी शासनस्तरावर सोप्यात सोप्या पद्धती विकसीत करण्यात येत आहेत. विविधस्तरावरून नागरीकांना नव्या स्वरूपात आर्थिक  व्यवहार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने रोडकरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या साक्षरतेसाठी अनेकविध उपक्रम राबविले जात असून, त्यामध्ये आणखी एका महत्त्वपुर्ण प्रयत्नांची जोड देण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्याच्या मोबाईल अ‍ॅप आपलं नांदेड वर रोकडरहित (कॅशलेस) दालन समाविष्ट करून, अद्ययावत ॲप खुले करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते हे अद्ययावत ॲप अवतरण (लाँच ) करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी, कृषि अधिकारी, तहसिलदार, वन विभाग, लघु जलसिंचन अशा विविध विभागांच्या अधिकारी आदींची उपस्थिती होती.
सध्या आपलं नांदेड या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबाईल अ‍ॅपचे चार हजाराच्या वर वापरकर्ते आहेत. विविध क्षेत्रातील नागरीकांनी हे अ‍ॅप उपयुक्त असल्याचे कळविले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराबाबत साक्षरता वाढविण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या संकल्पनेतून एक नवीन पर्याय उपलब्ध करुन देण्याचा विचार झाला. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयसीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. पोटेकर आणि त्यांच्या टीमने आपलं नांदेड या ॲपवर मोबाईल गो कॅशलेस GO Cashaless  या नावाने स्वतंत्र दालन सुरु केले. या नव्या पर्यायासह आपलं नांदेडची नवी अद्ययावत आवृत्ती 1.1 तयार करण्यात आली. या नविन आवृत्तीचे अवतरण आज करण्यात आले.  याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जास्तीत जास्त नागरीकांनी या ॲपवरील माहितीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. तसेच रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारासाठी शीघ्रतेने ॲपसारख्या अद्ययावत प्रणालीवर नागरिकांना पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल एनआयसीचे श्री. पोटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदनही केले. 
गो कॅशलेस ची वैशिष्ट्ये आणि विविध पर्याय
1.     कार्ड, पीओएस (पॉइंट ऑफ सेल)  हा पर्याय निवडल्यास यात विविध प्रकारच्या कार्डव्‍दारा  करावयाच्या कॅशलेस पध्‍दतींची माहिती देण्यात आलेली आहे. यात पॉईट ऑफ सेल मशिनवर कार्ड कसे वापरावे, कार्डव्‍दारे पेमेंट करणे कशी करावी तसेच एटीम मधून पैसे काढण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
2.     इंटरनेट बँकिंग - इंटरनेट बँकिंगव्‍दारे बँकांच्या ऑनलाइन संगणक प्रणालीव्‍दारे बँकेचे व्यवहार करण्‍यासाठी मोबाइल बँकिंग, विविध बँकाव्‍दारे प्रसिद्ध केलेले त्या बँकेचे अधिकृत मोबाईल अॅपव्‍दारे बँकेचे सर्व व्यवहार, मोबाईल बँकिंग वापरावयाचे फायदे व  मोबाइल बँकिंग नोंदणी / वापर प्रक्रिया ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
3. अविस्तृत पुरक सेवा माहिती (USSD) - या प्रणालीव्‍दारे कोणत्याही मोबाईल फोनच्या इंटरफेसमधून तुम्ही पैसे पाठवण्‍याबाबत विनाइंटरनेट नोंदणी प्रक्रिया व वापर प्रक्रिया ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
4. आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) -  केवळ आधार क्रमांकाव्‍दारे AEPS आज्ञावलीव्‍दारे कशा प्रकारे एका बॅंकेतुन दुस-या बॅंकेत पैसे पाठविणे याबाबत पूर्ण वापर प्रक्रिया दिलेली आहे.
5. युनिफाईड पेमेंट सिस्टम - (UPI) म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणाली हा पर्याय मोबाइलमधून मेसेज पाठवीण्याइतकाच सोपा आहे. यात प्रत्येक बँकेचे स्वत:चे मोबाइल अॅप असते  आहेच. स्मार्ट फोनवरील वापर प्रक्रिया यात समाविष्‍ट करण्‍यात आलेली आहे.
6. ई-पाकिट (E-Wallet) ई - पाकिटमध्‍ये रक्‍कम जमा करणे, ई- पाकिटव्‍दारे पैश्‍याचे व्‍यवहार करणे, संगणकावर किंवा मोबाईलवर ऑनलाईन खरेदी, विज बील, मोबईल बील, टेलीफोन बील भरणे. मोबाईल फोनव्‍दारे दुकानावरून साहित्‍य खरेदी करणे या सर्व व्‍यवहार करण्‍यास्‍तव बॅंकेचे खाते या ई- पाकिट ची जोडणे, आपल्‍या खात्‍यामधुन ई- पाकिटमध्‍ये पैसा टाकणे याबाबत ग्राहक वापर प्रक्रिया व व्यापारी वापर प्रक्रिया ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
7. भीम (BHIM) - कॅशलेस इंडिया - रोकडविरहित भारतासाठी भारत सरकारने 30 डिसेंबर 2016 रोजी नवीन "भीम" अ‍ॅप सुरू केलं आहे. यूपिआय अ‍ॅपचीच ही सुधारित आवृत्ती असून वापरायला अधिक सोपं आहे. पेटीएम प्रमाणे मोबईल नंबर वापरून पैसे पाठवणे,क्यूआर कोड वापरून समोरच्याचा नंबर घेणे अशा सुविधा यात दिल्या आहेत.पूर्वी प्रत्येक बँकेचं स्वतःचं यूपिआय अ‍ॅप होतं. आता सगळे जण एकच अ‍ॅप वापरू लागले आहेत. त्‍याअनुषंगाने भीम अ‍ॅप इन्स्टॉल आणि सेटिंग करणे ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
रोकडविरहीत (कॅशलेस) व्यवहाराबाबत घ्यावयाची दक्षता

अ.   तुमच्या बँक खात्यातील प्रत्येक व्यवहाराची सूचना एस.एम.एस. व्‍दारे नियमितपणे मिळवण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक बँकेकडे नोंदवा.
ब. तुमच्या विविध कार्डाचे “ पिन ” क्रमांक कोणासही सांगू नका, किंवा अन्य कोणत्याही पध्‍दतीने उघड करू नका.
क. केवळ विश्वासार्ह व खात्रीच्या व्यापा-यांकडेच खरेदी, किंवा अन्य आर्थिक व्यवहार करा.
ड. तुम्ही ए.टी.एम. मध्ये कोणताही व्यवहार करत असताना कोणी त्रयस्थ व्यक्ती तुमच्यावर लक्ष ठेउन तर नाही ना, किंवा तुमच्यावर पाळत ठेवून तर नाही ना, याकडे लक्ष दया आणि तशी खात्री करूनच व्यवहार करा.
ई. कोणत्याही मदतीसाठी व तक्रारीसाठी खात्रीशीर साधनांची मदत घ्या जसे की बँकचे निशुल्क दुरध्वनी क्र. ( TOLL FREE)   क्रमांक / बँक प्रतिनिधी.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...