Thursday, July 24, 2025

वृत्त क्र. 765 

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी


कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड वसूल


नांदेड दि. 24 जुलै :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 18 ते 30 जुन 2025 कालावधी वायुवेग पथक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या स्कुल बसची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमे स्कुल बसची सर्व वैध कागदपत्रे व बसची तपासणी करण्यात येते. या कारवाई 89 बसेवर कारवाई करण्यात आली असून 7 लाख 4 हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.

 

या तपासणी दरम्यान वैध कागदपत्रे सादर न करणाऱ्या, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटीचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनात बेकायदेशीर फेरबदल करणे, सीसीटीव्ही व ट्रकींग प्रणालीचा वापर न करणे, शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या, वैध स्कुलबस परवाना नसलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या स्कुलबसेसवर दंडात्मक तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व संघटना, स्कुलबस चालक-मालक यांनी स्कुलबस तपासणी दरम्यान दंडात्मक व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही टाळावी. यासाठी शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करू नये. वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत ठेवावीत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनूसार तपासणी दरम्यान मागणी केल्यास वैध कागदपत्रे सादर करावीत. शालेय विद्यार्थ्याची वाहतूक नियमानुसार करावी. वाहन अटकाव व दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 764 

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षाची तपासणी


कारवाईत चालकांकडून 2 लाख 20 हजार रुपयाचा दंड वसूल


नांदेड दि. 24 जुलै :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायुवेग पथकामार्फत 1 ते 22 जुलै 2025 कालावधीत नियमितपणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांची मोटार वाहन कायद्यातील तरतूदी व प्रचलित शासन नियमानुसार तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत आसन क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या एकूण 37 ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 20 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे.


या तपासणी मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या ऑटोरिक्षाची वैध कागदपत्रे व ऑटोरिक्षाची तपासणी करण्यात येते. तपासणी दरम्यान वैध कागदपत्रे सादर न करणाऱ्या, शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करणाऱ्या, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्याची वाहतुक करणाऱ्या, वैधपरवाना नसलेल्या तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या, शालेय विद्यार्थ्याची रिक्षातून अवैध वाहतुक करणाऱ्या ऑटोरिक्षावर दंडात्मक तसेच मोटार वाहन कायदयातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.


तपासणी दरम्यान दंडात्मक व मोटार वाहन कायद्योतील तरतुदीनुसार कार्यवाही टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांनी शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतुक करू नये. वाहनाची सर्व वैध कागदपत्रे सोबत बाळगावित व मोटार वाहन कायदयातील तरतुदीनूसार तपासणी दरम्यान मागणी केल्यास सादर करावीत. ऑटोरिक्षातून नियमानुसार शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करावी. ऑटोरिक्षामधून आसन क्षमतेच्या दिडपट शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करण्याबाबत परवानगी असल्याने त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करताना आढळून आल्यास त्यांचे विरुध्द मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या ऑटोरिक्षा संघटना, चालक, मालक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 763

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 24 जुलै 2025 रोजी दुपारी 12:19 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 24 व 25 जुलै 2025 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 24 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच दि. 25 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन मध्ये 'दामिनी', 'सचेत' हे दोन ॲप डाउनलोड करा 'दामिनी' ॲप तुमच्या आजूबाजूला वीज विषयक संभाव्य धोके दर्शविते तर 'सचेत' ॲप मुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या हवामानाविषयी अचूक इशारे व माहिती मिळते. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

000000

 वृत्त क्र. 762

मच्छीमारांना व मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 24 जुलै :- शासनाने मत्स्य शेतकऱ्यांना, मस्त्यसंवर्धकांना त्यांच्या तलाव प्रकल्पास मत्स्यबीज, मत्स्यखाद्य, होडी मत्स्य जाळे इ. अनुषंगिक बाबी खरेदी करण्यास खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी किसान क्रेडीट कार्ड ही योजना सुरु केली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मच्छिमारांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त विक्रम कच्छवे यांनी केले आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेत मच्छिमारांना अल्प व्याजदरात रोख रकमेच्या स्वरुपात खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी व या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड यांचे कार्यालय नवीन प्रशासन भवन, शासकीय निवासस्थान, बिल्डिंग क्रमांक-२ , तळमजला, गट क्रमांक 120 असर्जन, पद्यमजा सिटी रोड, नवीन कौठा परिसर, नांदेड पीन कोड- 431606 येथे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयास भेट द्यावी.

000000

वृत्त क्र. 761

26 व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड दि. 24 जुलै :- जिल्हा सैनिक कार्यालयात 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक तसेच शहीद जवानांचे नातेवाईक व समाजातील देशभक्त यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे. 

शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी राज्यात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. समाजातील नागरिकांमध्ये तसेच 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांमध्ये कर्तव्य भावना व सैनिकांबद्दल अभिमान दिर्घकाळ जिवंत राहावा व आपल्या कर्तव्याची जाणीव समाजातील नागरिकांमध्ये सतत निर्माण व्हावी. देशभक्तीची ज्वलंत उर्जा कायम राहावी म्हणून संपूर्ण देशात दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस कारगिल युध्दामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दाजंली अर्पण करुन साजरा करण्यात येतो. 

00000

 वृत्त क्र. 760

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान 

नांदेड दि. 24 जुलै :- जिल्ह्यात शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी मातंग बांधवांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. येत्या 1 ऑगस्ट रोजी तसेच त्यानंतर 2 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण भागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येते. त्याअनुषंगाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे. 

30 जुलै 2025 चे 00:00 वाजता पासून ते 31 ऑगस्ट 2025 चे 24 वाजेपर्यत नांदेड जिल्हयात सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम "अ" ते "ई" प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपले हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.   

रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्यारितीने चालावे कोणत्यारितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्याप्रसंगी व पुजेअर्चेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजाअर्चनाच्यावेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबंध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत. 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्यापुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शनपर आदेश देण्याबाबत. सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबधी अधिकार प्रदान केले आहे. 

कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्हयात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत. 

हा आदेश लग्नाच्यावरातीस, प्रेतयात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. सदरचा आदेश 30 जुलै 2025 चे 00:01 वाजेपासून ते 31 ऑगस्ट  2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत लागू राहील, असेही आदेशात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 वृत्त क्र. 759

रोजगार मेळाव्यात 190 उमेदवारांची प्राथमिक तर 39 उमेदवारांची अंतिम निवड

 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

नांदेड दि. 24 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतीना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत यशवंत महाविद्यालयात 22 जुलै रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील 190 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 39 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. 

या रोजगार मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण तर प्रमुख पाहुण्या गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजर्षीताई पाटील या होत्या. जीवन एक शर्यत असून, या शर्यतीतून अनेक गोष्टीत बदल होत असतात. इथं जी संधी उपलब्ध करुन दिली आहे, त्या संधीचा लाभ सर्व युवक-युवतीनी घ्यावा, असे आवाहन आमदार श्रीजया चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना  केले.

शिक्षण घेत असताना गुरुजणांचा विचार करा, समाजात वागताना आईवडीलांच्या विचार करा, आयुष्यात मिळालेल्या संधीच सोन करा असा संदेश गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजर्षीताई पाटील दिला. सध्या या जगात कौशल्यांला मागणी आहे. प्रत्येकाने आपल्यातले कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. आधुनिक जगात कौशल्याशिवाय प्रगती अशक्य असल्याचे मत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले. 

या रोजगार मेळाव्यात एकूण 16 कंपन्यानी 711 रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला. तर एकूण 397 उमेदवार उपस्थित होते. यापैकी 361 उमेवारांनी मुलाखती दिल्या तर त्यापैकी 190 उमेदवारांची प्राथमि‍क निवड करण्यात आली. तर 39 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. 

00000




वृत्त क्र. 765   शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेसची तपासणी कारवाईत चालकांकडून 7 लाख 4 हजार रुपया चा दंड वसूल नांदेड दि. ...