Monday, December 8, 2025

 ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ

लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी

जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी

- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, दि.08 (विमाका) :- भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी दिनांक ०३.१२.२०२५ रोजी प्रसिध्दी झालेली आहे. सदर यादीवर दिनांक ०३.१२.२०२५ ते १८.१२.२०२५ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत व त्यासाठी मतदान केंद्रनिहाय पदनिर्देशीत अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. नियुक्त अधिकारी यांना दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत कार्यालयीन वेळेत सदर मतदान केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहून अर्ज स्विकारण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिनांक ०६.११.२०२५ ते ०२.१२.२०२५ या कालावधीत ऑनलाईन व ऑफलाईन जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ते सर्व अर्ज आता दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत डाटाएन्ट्री करुन निकाली काढण्यात येणार आहेत. 

महिला मतदारांकडे नावातील बदलाच्या संदर्भात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व आवश्यकतेनुसार गृहचौकशी करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीच्या तपासणी मध्ये आढळून आलेल्या त्रुटी तपासून या त्रुटींची नियमानुसार तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. 

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु असते. अर्ज दाखल करण्याकरीता ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दती चालु रहाणार असून मतदार नोंदणीचा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास कोणीही नकार देवू नये, असे निर्देश क्षेत्रीय स्तरावरील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. 

लोकशाही प्रक्रीयेत सहभाग नोंदवून जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त  जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 

*****

  वृत्त  

साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 

नांदेड, दि. ८ डिसेंबर :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात साफसफाई व आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांसाठी भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचा संबंधित पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.  

हाताने मेहतर काम करणाऱ्या/ मानवी विष्ठाचे व्यक्तीचे वहन करणाऱ्या व्यक्ती. बंदिस्त व उघड्या गटाराची साफसफाई करणाऱ्या व्यक्ती. मेलेल्या जनावरांची कातडी कमावणारे आणि कातडी सोलणारे. कचरा गोळा करणारे, उचलणारे. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ऍक्ट 2013 मधील सेक्शन 2(1)(d) नुसार धोकादायक सफाई व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.        

या योजनेअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनिवासी, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये 3 हजार 500 तसेच इयत्ता 3 री ते 10 वीमध्ये शिकणाऱ्या निवासी (शिक्षणासाठी बाहेरगावी राहात असलेले) विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये 8 हजार रुपये  शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्यात येते.  

या योजनेसाठी पालक हे उपरोक्त नमूद अस्वच्छ, साफसफाई क्षेत्रात व्यवसाय करीत असल्याबाबत पुढील प्रमाणे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत क्षेत्र:- ग्रामसेवक व सरपंच. नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्र:- मुख्याधिकारी. महानगरपालिका क्षेत्र:- आयुक्त / उपायुक्त. सदरील प्रमाणपत्राचा विहित नमुना सर्व नगरपालिका व गटशिक्षणाधिकारी,गट साधन केंद्र यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची पद्धत

सदरील योजनेसाठी अर्ज करण्याकरिता विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी महाडीबीटी पोर्टल प्रणालीच्या www.prematric.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावयाचे आहे. सदर ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुख्याध्यापक यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र व पालकाचे हमीपत्र पोर्टलवर अपलोड करावयाचे आहे. सदर योजना स्वयं अर्थसहाय्यित शाळेसाठी  लागू नाही. तसेच विद्यार्थ्याला फक्त एकाच मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. 

सदरील योजना सर्व जाती धर्माच्या व्यक्तींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही उत्पन्नाची अट नाही. विद्यार्थ्यांची शालेय उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती च्या लाभची रक्कम  पालकांच्या आधार संलग्नीत बँक खात्यावर दोन हप्त्यामध्ये जमा करण्यात येते. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना राबविण्यात येते, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली. 

00000

 वृत्त क्रमांक 1281

बुधवारी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ 

नांदेड दि. 8 डिसेंबर :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2025-26 संकलन शुभारंभ कार्यक्रम बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 मध्ये उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुख, कर्मचारी, सहसंस्था यांना प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार व माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांचे अवलंबितांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 1280

श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड दि. 8 डिसेंबर :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 18 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून ते 23 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत. 

श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणे कामी योग्य आदेश देण्याबाबत. 

कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी जगताप व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीर सभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. परवानगी दिलेल्या जाहिर सभा/मिरवणूका/पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जारी केले आहेत.

00000

7.12.2025.

वृत्त 

स्वधर्म रक्षणाच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मानवता, सत्य आणि धर्मरक्षा यासाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर होणाऱ्या आक्रमणाला थोपविले -  संत ज्ञानी हरनाम सिंग जी

नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन शिस्तीचे घडविले दर्शन

नागपूर, दि. ७ : भारतीय संस्कृतीवर, धर्मावर, विचारांवर आणि भाषेवर मुघलांनी अत्याचारांची परिसीमा गाठली. भारतीय संस्कृतीच संपविण्याचा मुघलांचा अट्टाहास होता. अशा कठीण प्रसंगी हिंद की चादर गुरु तेगबहादूर सिंग साहीबजी हे ढाल बनून पुढे आले. काश्मिरी पंडितांच्या संस्कृतीसह हिंदू धर्माचा पोत त्यांनी आपल्या बलिदानातून कायम राखला. स्वधर्माचे रक्षण व सहिष्णुता याचे प्रतीक असलेल्या श्री. गुरु तेग बहादूर सिंग साहीब यांच्या बलिदानाचा हा गौरवशाली इतिहास शालेय विद्यार्थ्यांसह प्रत्येकापर्यंत पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समारोहानिमित्त नागपुरात नारा येथील सुरेशचंद्र सुरी पटांगणावर आयोजित भव्य समारोहात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, श्री संत ज्ञानी हरनामसिंघ जी, पोहरादेवी येथील धर्मगुरु डॉ. बाबूसिंग महाराज, संत बाबा बलविंदरसिंग जी, बाबा सुखिंदरसिंग जी मान, रामसिंग जी महाराज, सुनील जी महाराज, क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष गुरमितसिंग खोकर, विजय सतबीरसिंग,  अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव जी ढोले, महेंद्र रायचुरा, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, या समारोहाचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

शीख समाजात विविधता आहे. सिकलीगर समाजाने शीख समाजाला हत्यारे तयार करून दिली. बंजारा समाजाने शीख समाजांच्या गुरुंप्रती व विचारांप्रती आपली कर्तव्यतत्परता जागृत ठेवली. एक ओमकार सतनाम यातील तत्वाप्रमाणे विविधतेतील एकात्मभाव लंगरच्या माध्यमातून सर्व समाजाने समाजमनावर बिंबवला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धर्मासाठी एवढे मोठे बलिदान जगाच्या पाठीवर कुठे आढळणार नाही. बलिदान देऊनही गुरुवाणीमध्ये मानवतेचे शब्द व मानवतेची प्रार्थना ही प्रत्येकाला भावनारी आहे. विशेषतः संत नामदेव महाराजांच्या असंख्य ओळी गुरुवाणीमध्ये समाविष्ट करून तेवढ्याच नम्रतेने त्यांना पुजले जाते, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

शीख समाजातील हा गौरवशाली इतिहास समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या दृष्टीने आम्ही नांदेड व नवी मुंबईत-खारगर येथे भव्य स्वरुपात कार्यक्रम घेऊन अभिवादन करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मानवता, सत्य आणि धर्मरक्षा यासाठी गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे -  नितीन गडकरी

मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान सर्वांना ज्ञात आहे. भगवद्गगीतेमध्ये उधृत असलेले वचन गुरु तेगबहादूर साहिब यांनी धर्मसंरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला पुन्हा प्रत्ययास आणून दिले आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्म हावी होईल-आक्रमण होईल, तेव्हा मी धावून येईल असे अभिवचन भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये दिले होते, याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात करून दिली. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी मुघलांनी केलेले आक्रमण हे धर्म आणि संस्कृतीवरच होते. हे आक्रमण गुरु तेगबहादूर सिंग यांनी आपल्या बलिदानातून परतावून लावले. महाराष्ट्र शासनाने या भव्य आयोजनातून इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना व इतिहास या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पीढीपर्यंत पोहोचता केला. गुरु तेग बहादूर सिंग साहीब यांची प्रेरणा, कार्य आणि कर्तृत्व भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या राज्यभरातील भाविकांना एकत्र आणण्याचे कौतुकास्पद काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.

महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर होणाऱ्या आक्रमणाला थोपविले

-  संत ज्ञानी हरनाम सिंग जी

ज्या देशाने सर्व विचारप्रवाहांचा, विविधतेचा, धर्म, जात, पंथांचा सन्मान केला, त्या आपल्या भारतावर मुघलांनी आक्रमण केले, प्रचंड अत्याचार केले. हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गुरु तेगबहादूर साहिब यांना धर्मरक्षणासाठी जे बलिदान द्यावे लागले, त्या शौर्याचे अभिवादन करताना मुघलांच्या क्रौयाला कदापि विसरता येणार नाही, असे प्रतिपादन संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी यावेळी बोलताना केले.

आपल्या धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धन, प्रलोभन व जबरदस्ती करून आपले अनुयायी निर्माण करणे, हे कोणत्याही धर्मात नाही. धर्मात बळजबरीला थारा नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतीय संस्कृतीवर, येथील धर्मावर मुघलांनी जे आक्रमण केले, ते महाराष्ट्र आणि पंजाबने परतावून लावल्याने आजचा भारत आपण पहात आहोत, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्राची भूमी ही वीरांची आहे, संतांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या शौर्यालाही अभिवादन केले. 

शीख समाजात अरदासची परंपरा आहे. अरदासच्या माध्यमातून भक्ती करणारे अनेक पंथ आहेत. यात बंजारा, शिकलकरी, सिंधी, लबाना, मोहयाल ही सारी एक आहेत. या समाजांना एकसंघ करून त्यांना न्याय देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे गौरवोद्गार आपल्या मनोगतात काढले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी, सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांना व सर्व गुरुंना वंदन केले. यावेळी विविध मान्यवर संत उपस्थित होते. 

नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन शिस्तीचे घडविले दर्शन

हिंद की चादर समागमच्या निमित्ताने आज नारा येथील आयोजित कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद देऊन नागपूरकरांनी शिस्तीचे अपूर्व दर्शन घडविले. कार्यक्रमस्थळी विविध ठिकाणी आयोजित केलेले पार्किंगचे स्लॉट सकाळीच भरल्या गेले. पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन सूत्रबद्ध नियोजन, सुरक्षितता आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी मोबाईल व्हॅनद्वारे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर कुणालाही न दुखावता नियंत्रण मिळवले. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आदरशील वर्तनातून गर्दीला एक दिशा दिली. 

कार्यक्रमासाठी दाखल होणाऱ्या भाविकांसाठी चहा, पिण्याचे पाणी, बिस्कीट, जुताघर, ई-रिक्षासेवा, वैद्यकीय सेवा आदी सुविधा लोकसहभागातून पुरविण्यात आल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत एक स्वतंत्र भव्य कक्ष उभारण्यात आला होता. लंगर व्यवस्थाही भक्कम असल्याने सुमारे दीड लाख लोक अवघ्या काही तासांत प्रसाद घेऊन शिस्तीने बाहेर पडले. जुताघर येथील सेवेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

00000








  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...