Tuesday, November 18, 2025

 वृत्त क्रमांक 1220

नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर :-  नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय तसेच कार्यालयाच्या अधिनस्त शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आज कार्यक्रमाचे आयोजन करुन नशामुक्तीची शपथ घेतली.

नशामुक्त भारत अभियानाला ऑगस्ट २०२५ मध्ये ५ वर्ष पूर्ण झाली असून पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना नशामुक्तीची शपथ घेऊन कर्मचाऱ्यांनी सदर वेबसाईटवर त्यांची नोंदणी करून सदरील प्रमाणपत्र डाऊनलोड केली आहेत. या कार्यक्रमात हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर (१२१), गोविंदराव पऊळ नर्सिंग स्कूल हदगाव (३४), दगडोजीराव पाटील नर्सिंग स्कूल हदगाव (४५), वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरूनगर कंधार (१७८), उषाताई धोंडगे पत्रकारिता महाविद्यालय नांदेड (२१), ग्रामीण टेक्नीकल इन्स्टिट्यूट नांदेड (१८२), सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पांगरी (४२) तसेच जनाई नर्सिंग स्कूल किनवट (२०) या सर्व महाविद्यालयातील एकूण ६४३ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन नशामुक्तीची शपथ घेतली.  सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी नशामुक्तीची शपथ घेऊन प्रमाणपत्र नोंदणी केली आहे.

00000







 वृत्त क्रमांक 1219

थारा येथे जलतारा, वनराई बंधारा उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ 

श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग 

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील जलसंधारण बळकटीसाठी राबविण्यात येणाऱ्या जलतारा आणि वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते किनवट तालुक्यातील थारा येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आला. जिल्ह्यासाठी निर्धारित एक लाख जलतारा निर्मितीच्या उद्दिष्टाला वेग देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनितचंद्र दोन्तुल्ला, सहायक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, नोडल अधिकारी चेतनकुमार जाधव, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, विविध विभागांचे अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलतारा उपक्रम

‘Catch the Rain-Where it Falls, When it Falls’ या संकल्पनेनुसार पावसाचे वाहून जाणारे पाणी शेतातच मुरवून भूजलपातळी वाढविणे, जमीन चिभडण्याचे प्रमाण कमी करणे आणि जलसंधारण मजबूत करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. 

मनरेगा विभाग व भारत रूरल लाइव्हलीहुड फाऊंडेशन (BRLF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सहा तालुक्यांत हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प (HIMWP) सुरू आहे. किनवट तालुक्यात हा प्रकल्प मनरेगासह राष्ट्रविकास ॲग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर शाखा यांच्या माध्यमातून राबविला जात आहे. प्रकल्पातील ४३ गावांचे सविस्तर आराखडे पाणलोट क्षेत्राच्या माथा–पायथा तत्त्वानुसार तयार करण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान व मार्गदर्शन

थारा येथील शेतकरी सदानंद साबळे यांच्या शेतात जिल्हाधिकाऱ्यांनी जलतारा खड्डा खोदण्याचे काम प्रत्यक्ष केले. तसेच गावातील नाल्यावर ग्रामस्थांसह वनराई बंधाऱ्याचे कामही श्रमदानातून पूर्ण करण्यात आले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी जलताराच्या तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले. पाच फूट रुंद व 5 फूट लांब, 6 फूट खोल आकाराच्या खड्ड्यात मोठे व मध्यम दगड भरून संरचना तयार करून खड्डा केला जातो. एका जलतारामधून अंदाजे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरते. यामुळे शेतातील विहिरी व बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. मनरेगा अंतर्गत अशा नैसर्गिक संसाधन संवर्धनाच्या कामांमुळे कुशल-अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध होतो असे त्यांनी सांगितले. 

विविध शेती उपक्रमांना भेट

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी एचआयएमडब्लुपी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेती विषयक उपक्रमांची पाहणी केली. पिंपरफोडी येथील शेतकरी अभिजित जमादार यांच्या एकात्मिक शेवगा शेती प्रकल्पाला भेट दिली. बोधडी खुर्द येथील शेतकरी लक्ष्मीकांत मुंडे, नारायण मुंडे, तिरुपती फड यांच्या नैसर्गिक सेंद्रिय भाजीपाला, खजूर व चिकू फळबागांचे निरीक्षण केले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सेंद्रिय शेतीचा अवलंब करून पिकांवरील खर्च कमी करावा आणि निसर्ग संवर्धनाला हातभार लावावा, असे मार्गदर्शनही केले.

00000

 





 वृत्त क्रमांक 1218

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 

युवक-युवतींना प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2025-26 चे आयोजन करण्याचे निश्चित झाले आहे. पुढे नमूद केलेल्या कला प्रकारामध्ये इच्छुक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींनी आपली नावे, प्रवेशिका 21 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय स्टेडीयम परीसर नांदेड येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) संपर्क क्र. 9850522141, 7517536227 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.  

युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांचे पत्रान्वये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD मध्ये करण्यात आले असून तो विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाशी जोडण्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर NYK-VBYLD-2026 चे आयोजन युवा कार्यक्रम व खेळमंत्रालयाकडुन केले जाणार आहे. त्यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी निवडलेल्या पथकांमध्ये स्पर्धा खालील 4 मार्ग (Track) मध्ये  NYF-VBYLD-2026 मध्ये दिल्ली येथे होणार आहेत. Cultural and Innovation Track, Viksit Bharat Challenge Track, Design for Bharat, Hack for Social cause त्यास अनुसरून जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्‍सव- सांस्कृतिक व नवोपक्रम (Cultural and Innovation Track) आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विकसित भारत जिल्हास्तर युवा महोत्सव सांस्कृतीक व नवोपक्रम मार्ग यामध्ये पुढीलप्रमाणे कला प्रकार संख्या अंतर्भुत आहेत.  

सांस्कृतिक कला प्रकार

समुह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), लोकगीत (सहभाग संख्या 10) कौशल्य विकास:- कथालेखन (सहभाग संख्या 3), चित्रकला (सहभाग संख्या 2, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) (सहभाग संख्या 2), कविता (500 शब्द मर्यादा सहभाग संख्या 3) असे एकुण 30 सहभाग संख्या राहील. या स्पर्धेमध्ये सहभागासाठी 15 ते 29 वयोगट राहील (12 जानेवारी 2026 या दिनांक रोजी वयाची परिगणना 15 ते 29 असावी) जन्म दिनांक बाबत सबळ पुरावे द्यावे लागेल. 

युवा महोत्सव म्हणजे युवकाना आपले कलागुण दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ आहे. यामध्ये युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढिस लावणे, युवकांना विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना “Innovation in Sciecnce and Technology” चे महत्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाया सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करून देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व युवकाना पटवुन देणे इत्यादी बाबीवर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.   

या युवा महोत्सवामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. त्यांचे वय दिनांक 12 जानेवारी, 2026 रोजीची परिगणना करण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी जिल्हातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय, अभियांत्रीकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कलाप्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, ट्राफीज देवुन गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवकांना विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याचा मान मिळणार आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 1217

जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा  

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर :- जिल्हा रुग्णालय नांदेड येथे “जागतिक मधुमेह दिन” जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज साजरा करण्यात आला. त्याचबरोबर तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० जनजागृती करण्यात आली. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदू पाटील यांनी मधुमेहाची लक्षणे मधुमेहामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच मधुमेह आजारासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय समारोपाच्या अनुषंगाने बोलतांना एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील म्हणाले,  दिवसेंदिवस व्यक्तीचे शारीरिक (कष्टाची कामे) कमी होत आहेत. त्यामुळे त्यांना मधुमेहासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम तसेच कष्टाची कामे केले पाहिजे. आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. संतुलित आहार घ्यावा. जेणेकरून व्यक्तींना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. 

या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकरी डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी माने, डॉ.सुमित लोमटे, डॉ. शाहू शिराढोणकर, डॉ.सुजाता राठोड, डेंटल सर्जन डॉ. दीप्ती सूर्यवंशी, एनसीडी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मेट्रन सुनिता राठोड, प्राचार्या सुनिता बोथीकर, इंचार्ज श्रीमती नारवाड, श्रीमती बंडेवार, जिल्हा रुग्णालय येथील सर्व अधिकारी-कर्मचारी, नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच रुग्ण, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान यांनी तर सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश आहेर, सदाशिव सुवर्णकार, सुनिल तोटेवाड व चंद्रभान कंधारे यांनी परिश्रम घेतले.

00000



वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...