Friday, November 14, 2025

 वृत्त क्रमांक 1210

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ

नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे १४ नोव्हेंबर, २०२५ पत्रान्वये पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तारीख वाढवून दिली असून सुधारित कार्यक्रम जाहिर केला आहे.
हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई दिनांक २८ नोव्हेंबर, २०२५, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक ०३ डिसेंबर, २०२५, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनांक ०३ ते १८ डिसेंबर, २०२५, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दिनांक ०५ जानेवारी, २०२६, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दिनांक १२ जानेवारी, २०२६ असा केला असल्याचे मतदार नोंदणी अधिकारी 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ जितेंद्र पापळकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
***

 वृत्त क्रमांक 1209

दहावी परीक्षेचे अर्ज सादर करावयाच्या

विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ  

नांदेड दि. 14 नोव्हेंबर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शुल्क प्रकारात विलंब शुल्क (मुदतवाढ) साठी आवेदनपत्र भरावयाची मुदत 11 ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत, विलंब शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आरटीजीएस-एनईएफटीद्वारे भरणा करावयाचा कालावधी 11 ते 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत, माध्यमिक शाळांनी आरटीजीएस-एनईएफटीची पावती-चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची मुदत 19 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 'Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाईल School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट SUBMIT केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (School Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केल्याबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी UDISE + मधील PEN-ID मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोट असणे आवश्यक आहे. सदर UDISE + मधील PEN-ID वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.

पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीने निश्चित केलेल्या तारखांना अनिलाईन पध्दतीने भगवयाची आहेत.

ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी. सर्व माध्यमिक शाळांनी Website द्वारे प्राप्त ऑनलाईन चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून RTGS / NEFT द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये "Draft" to "Send to Board" Payment status मध्ये "Not Paid to Paid" असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा "Send to Board" "Paid" Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. 

माध्यमिक शाळांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांचे Status Update होईल. 

आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून चलनावरील virtual account = RTGS/NEFT द्वारे भरावयाचे आहे. माध्यमिक शाळांनी RTGS/NEFT द्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच account number IFSC code चूकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्या खात्यात जमा झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची जवाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. 

माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना पुनःश्च मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1208

मुलींना जन्म घेऊ द्या, मुलींना शिकू द्या, मुलींना खेळू द्या घोषणांनी नांदेड शहर दुमदुमले

बाल दिनानिमित्त बाल हक्क व महिला सन्मान रॅली संपन्न
नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी प्रकल्प) नांदेड शहर तर्फे 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त व भारतीय महिलांनी प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकल्याच्या निमित्ताने बाल हक्क व महिला सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली आयटीआय महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय यादरम्यान आयोजित करण्यात आली होती. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते महिला खेळाडूंना विश्वचषकाची प्रतिकृती देण्यात आली, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्त्री सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.
रॅलीचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविकांनी भारतीय महिला खेळाडूंची वेशभूषा धारण केली होती. अंगणवाडी प्रकल्पातील लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा धारण केली होती. नांदेड शहरातून निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
रॅलीमध्ये एक सेल्फी पॉइंटही तयार करण्यात आला होता. रॅलीमध्ये नांदेड शहरातील जवळपास 550 अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. संबंधित रॅलीला संबोधित करताना बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी संबंधित रॅलीचे प्रयोजन सांगितले, त्यांनी याद्वारे पालकांना आवाहन केले की त्यांनी त्यांच्या मुलीला जन्माला येऊ द्यावे, तिला शिकू द्यावे व खेळू द्यावे.
भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकून आणल्याबद्दल संबंधित संघाचेही अभिनंदन करण्यात आले. सदरील रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात. ही रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व मदतनीस, सेविका व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000







 वृत्त क्रमांक 1207

जवाहर नवोदय विद्यालयातील विविध

विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :  जवाहर नवोदय विद्यालयाच्या  प्रबंधन समितीची अर्धवार्षिक बैठक शंकरनगर येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली 13 नोव्हेंबर रोजी पार पडली. बैठकीत विद्यालयातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीस बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांदळे, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

नवीन इमारत, पायाभूत सुविधा व क्रीडासाधनांसाठी मान्यता

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विद्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून पुढील प्रक्रियेअंतर्गत विद्यालयाला नवीन इमारत उपलब्ध होऊ शकेल. विद्यालयाचा एक्सप्रेस फिडर कनेक्शन विद्यालयापासून दूर असल्यामुळे ते तातडीने दुरुस्त करून पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सोलार वॉटर हिटर, खेळाच्या मैदानाचे सपाटीकरण, कबड्डी मॅट, बास्केटबॉल कोर्ट, ओपन जीम, योगा मॅट व सिन्थेटिक रनिंग ट्रॅकची निर्मिती या बाबीना मान्यता दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन कॉम्प्यूटर, फॅन व टेबल्स जिल्हास्तरीय बजेटमधून घेण्यात यावेत याबाबत सूचना केल्या. 

वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन साफसफाई, आरोग्य, निवास व इतर सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना नवोदय विद्यालयाच्या प्राचार्याना दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांशी संवाद साधत त्यांनी मांडलेल्या अडचणींचे त्वरित निराकरण केले.

00000








 वृत्त क्रमांक 1206

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे

नामनिर्देशपत्र शनिवार 15 नोव्हेंबरला स्विकारली जाणार                                                                                                                                                                                                                                                              नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र सादर करावयाच्या कालावधीतील शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत.                                                                                                                                                                                                                                                                                                        याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत. या निवडणूक कार्यक्रमात रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे शनिवार 15 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात यावेत का यासंदर्भात विचारणा होत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून वरीलप्रमाणे हे निर्देश प्राप्त झाले आहेत. 

0000

 वृत्त क्रमांक 1205

जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा

नांदेड दि. 14 नोव्हेंबर:-  नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके व  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदू पाटील यांनी मधुमेहाची लक्षणे, मधुमेहामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच मधुमेह आजारासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थी, उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 

अध्यक्षीय समारोपाच्या अनुषंगाने बोलतांना एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील म्हणाले की,  दिवसेंदिवस व्यक्तीचे शारीरिक (कष्टाची कामे) कमी होत आहेत, त्यामुळे त्यांना मधुमेहासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम तसेच कष्टाची कामे केले पाहिजे. तसेच आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे, संतुलित आहार घ्यावा जेणेकरून व्यक्तींना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. यावेळी तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० जनजागृती करण्यात आली.  

या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकरी डॉ. एच.के. साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी माने, डॉ.सुमित लोमटे, डॉ. शाहू शिराढोणकर, डॉ.सुजाता राठोड, डेंटल सर्जन डॉ. दीप्ती सूर्यवंशी, एनसीडी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मेट्रन सुनिता राठोड, प्राचार्या सुनिता बोथीकर, इंचार्ज श्रीमती नारवाड, श्रीमती बंडेवार तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान यांनी तर सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश आहेर, सदाशिव सुवर्णकार, सुनिल तोटेवाड व चंद्रभान कंधारे यांनी परिश्रम घेतले.

00000





 वृत्त क्रमांक 1204

उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

 

नांदेड दि. 14 नोव्हेंबर :- जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME ) हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्यामध्ये त्यांचे महत्व विशेष आहे. नांदेड जिल्हयात सध्या १ लाख १२९ सुक्ष्म, ७२० लघु व ४१ मध्यम असे नोंदणीकृत उद्योग आहेत.

 

महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्स पर्यंत पोहंचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. शासनाच्या या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापनेकरिता उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजूरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागातंर्गत मैत्री (MAITRI - Maharashtra, Trade and Investment Facilitation Cell) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे पुढील सुविधा विविध 14 विभागांच्या 124 सेवा मैत्री 2.0 पोर्टलवर एकात्मिक करुन उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

 

·  एक खिडकी अर्ज प्रणाली https://maitri.maharashtra.gov.in

· तक्रार/समस्या निवारण

·  हेल्पलाइन मदत कक्ष क्रमांक 18002332033

· गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक

· प्रोत्साहन गणना

 

नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी या सेवांचा लाभ घ्यावा जेणेकरून जिल्ह्यात उद्योगांची वाढ होईल व जिल्हयाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जिल्हयातील उद्योग व गुंतवणूकदारांनी मैत्री या सहाय्य प्रणालीचा लाभ घेवून पोर्टलवर सक्रीय सहभाग नोंदवावा.

000000

वृत्त 

श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई दि. १४ : 'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ राज्यस्तरीय समितीने दिली आहे.
श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत २१ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याउपस्थितीत, जानेवारीमध्ये नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथील कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. तहसील, शहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.
या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ

वृत्त क्रमांक 1203

जिल्हाधिकाऱ्यांनी राहाटी गावाला भेट देवून #पशुसंवर्धन विभागाच्या विविध कामांची केली पाहणी

शेतकरी व पशुपालकांशी साधला संवाद
#नांदेड दि. 14 नोव्हेंबर:- नांदेड तालुक्यातील नाळेश्वर पशुवैद्यकीय दवाखानाच्या कार्यक्षेत्रातील राहाटी (बु.) या गावाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करुन शेतकरी व पशुपालकांशी #संवाद साधला.
जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय दुध विकास मंडळ, दिल्ली (एनडीडीबी) मार्फत पुरविल्या जाणाऱ्या कृत्रिम रेतन सुविधांची तपासणी केली. कृत्रिम रेतनाद्वारे जन्मलेल्या कालवडीची पाहणी करून पशुपालकांनी या अत्याधुनिक सेवांचा अधिकाधिक लाभ घेवून आपल्या घरीच उच्च वंशावळीच्या कालवडी तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत सुरू असलेल्या दिगंबर के. बोकारे यांच्या पनीर निर्मिती उद्योगाची पाहणी करत त्यांनी उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता आणि बाजारपेठेची माहिती घेतली. सदर शेतकरी दररोज गावातच उत्पादन झालेल्या 400 लिटर दुधापासून दररोज 180 किलो स्वच्छ, ताजे व भेसळमुक्त पनीर तयार करून नांदेड शहरास पुरवठा करतात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नांदेड जिल्ह्यात सुरू होणाऱ्या विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन प्रकल्पातील योजनांचा व महिलांच्या मराठवरहाड दूध उत्पादक कंपनीचा व राष्ट्रीय दुध विकास मंडळ दिल्ली यांचेमार्फत बायोगॅस प्रकल्प उभारणीच्या उपक्रमाचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पशुसंवर्धन विभागामार्फत नांदेड जिल्ह्यात कृत्रिम रेतनाचे प्रमाण दुप्पट करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. या अनुषंगाने “एक गाव एक फार्म गृहीत धरुन हा प्रकल्प राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
भेटीदरम्यान श्री. कर्डीले यांनी मराठवऱ्हाड दूध उत्पादक कंपनीचे सहायक ज्ञानोबा बोकारे, माधव मारोती बोकारे आणि दिगंबर केशवराव बोकारे यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या कार्यक्रमास जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पाडिले, पशुधन विकास अधिकारी नाळेश्वर डॉ. दीप्ती एम. चव्हाण तसेच कृत्रिम रेतन तंत्रज्ञ परसराम जमदाडे उपस्थित होते.
00000







वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...