Thursday, November 13, 2025

वृत्त क्रमांक  1202

बदली पोर्टलवर नोंद असलेल्या युडीआयडीधारक दिव्यांग शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार बदलीसाठी प्राधान्य 

नांदेड दि. 13 नोव्हेंबर :-  प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 मधील तरतूद क्रमांक 1.8 मध्ये 1.8.1 ते 1.8.20 चे निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांना बदलीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या प्राधान्यानुसार बदलीमध्ये सर्वात आगोदर युडीआयडीधारक दिव्यांग शिक्षकजोडीदारपाल्य गंभीर आजारविधवापरित्यक्त्याघटस्फोटीत व अशा एकूण 20 उपसंवर्गातील निकष पूर्ण करत असलेल्या आणि बदली पोर्टलवर नोंद केलेल्या शिक्षकांना निकषाच्या प्राधान्यातील उतरत्याक्रमाने सेवाजेष्ठतेनुसार शासन निर्णयात बदलीचे प्राधान्य देण्यात आले आहे.

 

प्राथमिक शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 चे निकष पूर्ण करत होते अशा शिक्षकांना बदलीमध्ये सूट घेण्याकरिता अथवा बदलीचा लाभ घेण्याकरीता प्रथमत: बदली पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते. सन 2025 च्या बदलीमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये सहभाग घेण्याकरिता बदली पोर्टलवर नोंद करण्यासाठी 6 ते 9 जून 2025 या चार दिवसाच्या कालावधीमध्ये संधी देण्यात आली होती.

 

प्राथमिक शिक्षकांनी संवर्ग 1 चा लाभ घेण्यासाठी नोंद केल्यानंतर ज्या शिक्षकांनी बदलीसाठी होकार अथवा नकार दिलेला आहे अशा शिक्षकांची यादी बदली पोर्टलवर एकमेकांना पाहण्याची सुविधा उपलब्ध होती. तरी सर्व यादी गटस्तरावर प्रसिद्ध करून आक्षेप देण्याबाबत सूचित करण्यात आले. त्यासाठी Appeal To EO आणि त्यानंतर Appeal To CEO ची सुविधा बदली पोर्टवर देण्यात आली होती. त्याप्रमाणे शिक्षकांनी एकमेकावर आक्षेप घेण्यात आलेल्या सुविधेमध्ये दोन शिक्षकांचे अपील आले होते. त्या शिक्षकांचे दोन्ही स्तरावरून अपील निकाली काढण्यात आले.

 

ऑनलाईन बदली सन 2025 मध्ये एकूण 3 हजार 660 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यापैकी शासन निर्णय सुधारीत 16 जून 2025 च्या निर्णयातील संवर्ग 1 मधील पात्र असलेल्या युडीआयडी UDID धारक 519गंभीर आजार 170परित्यक्त्या/घटस्फोटीत 31 अशा एकूण 720 शिक्षकांपैकी गटशिक्षणाधिकारी स्तरावरून जे शिक्षक संवर्ग 1 साठी अपात्र होते अशा 9 शिक्षकांचे नाव समाविष्ट होते. जे बदलीमध्ये सहभागी नसल्याने एकूण 9 शिक्षकांना पडताळणी मधून वगळून एकूण 711 शिक्षकांच्या पडताळणीचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.

 

या बदली प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षकांनीसंघटनांनी व बहिस्थ नागरिकांनी या कार्यालयाकडे संवर्ग 1 मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकाविरुद्ध अनेक तक्रारी केलेल्या होत्या. त्यासोबतच   दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव यांचे 18 सप्टेंबर 2025 रोजी युडीआयडीधारक दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात यावी असे निर्देश  या कार्यालयास प्राप्त झाले.

 

नांदेड जिल्ह्यातील युडीआयडी UDID धारक व गंभीर आजार असलेल्या शिक्षकांची संख्या खूप मोठी असल्याने सदरील शिक्षक व त्यांच्या पाल्यांना तपासणीसाठी मानसिक व शारीरिक त्रास होवू नये उद्देशाने बदलीचा लाभ घेतलेल्या 711 शिक्षकांची प्राथमिक तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. यामध्ये प्रथम दर्शनी दिव्यांगगंभीर आजार असलेल्या शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून सकृतदर्शनी दिव्यांगत्वाबाबत खात्री पटलेल्या शिक्षकांना वगळून इतर दिव्यांगत्वाबाबतटक्केवारीबाबत साशंकता असलेल्या एकूण 343 शिक्षकपाल्यजोडीदार यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी द्वितीय तपासणीसाठी जिल्हा अधिष्ठाताजिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे संदर्भित केले.

 

द्वितीय तपासणीसाठी संदर्भित केलेल्या शिक्षकांची संख्याजोडीदारांची देखील संख्या मोठी असल्याने व जिल्हा रुग्णालयाकडे तपासणी कामी संबंधित शिक्षकांना त्रास होवू नये म्हणून अधिष्ठाताजिल्हा शल्य चिकित्सक यांचे तज्ज्ञ वैद्यकीय पथक जिल्हा परिषदेकडे पाचारण करून तपासणी करण्यासाठी द्वितीय तपासणीचा कँप आयोजित करण्यात आला. या तपासणीमध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकांनी द्वितीय तपासणीतील एकूण 343 शिक्षकापैकी संवर्ग 1 चा लाभ घेतलेल्या 197 शिक्षकाना उच्च वैद्यकीय तपासणी केंद्राकडे संदर्भित करण्यात आले. तसेच अँजिओप्लास्टी झालेली असताना हृदय शस्त्रक्रिया असे दर्शवून 1.8.3 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. युडीआयडी प्रमाणपत्र नसताना संवर्ग 1 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांना युडीआयडी UDID प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम नोटीस देण्यात आली. पडताळणीसाठी अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

 

त्यानंतर संदर्भित केलेल्या सर्व शिक्षकांचे युडीआयडी UDID प्रमाणपत्रसदर प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या सक्षम यंत्रणेकडे फेरपडताळणीसाठी पाठविण्यात आले. द्वितीय तपासणीमध्ये संदर्भित केलेल्या सर्व 197 शिक्षकांना पाल्यजोडीदार यांच्या दिव्यांगत्वाची ऑनलाईन बदलीबाबत शासन निर्णयातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर 2018 नुसार दिव्यांगत्वाचा लाभ घेतलेल्या व द्वितीय पडताळणीमध्ये साशंकता आढळून आलेल्या एकूण 197 शिक्षकांना अंतिम तपासणीसाठी जेजे हॉस्पिटल मुंबई व अली यावर जंग नॅशनल इंस्टीटयूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डीसॅबिलीज बांद्रा मुंबई यांच्याकडे पडताळणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्याबाबत पत्र देवून विनंती करण्यात आलीअसल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे यांनी कळविले आहे.

000000

वृत्त क्रमांक  1201

सहस्‍त्रकुंड धबधब्‍याच्‍या पाण्‍यात अडकलेल्या 7 जणांचे शोध व बचाव कार्य यशस्‍वी
नांदेड दि. 13 नोव्हेंबर :- किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड धबधबा येथे आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील 4 महिला व 3 मुले असे एकुण 7 जण अडकले होते.

नांदेड जिल्हा प्रशासनाने तात्काळ शोध व बचाव कार्य करुन त्या सर्वांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्ड‍िले, न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किनवट जेनिथ दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी किशोर कु-हे यांच्‍या समन्‍वयातुन ही कार्यवाही करण्यात आली.
किनवट तालुक्यातील मौजे वाळकी इस्‍लापुर पोलीस स्‍टेशन हद्दीत सहस्‍त्रकुंड धबधबा येथे दुपारी 3.15 वाजेच्‍या सुमारास 4 महिला व 3 मुले असे एकुण 7 जण सहस्‍त्रकुंड धबधबा पाण्‍याचा प्रवाह कमी असल्‍याचे समजुन मुरळीतांडाकडे जात होते. त्‍यावेळी त्‍यांना मंदीराजवळील काही लोकांनी पाण्‍यात जाऊ नका असे सांगीतले पण त्‍यांनी आम्‍ही येथीलच असून नेहमी जात असतो असे सांगुन त्‍या महिला पाण्‍यात गेल्‍या परंतु पुढे जात असतांना पाण्‍याचा मोठा प्रवाह असल्‍याने त्‍या पाण्‍यात अडकल्‍या व मदत मागण्‍यासाठी आरडा-ओरड करत होत्‍या. तेथील सुरज भर्दे व इतर युवक-नागरीकांनी लगेच या प्रसंगाबद्दल माहिती ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दुरध्‍वनीद्वारे दिली. ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालयातुन ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने तात्‍काळ वायरलेसवर पोल‍िसांना व तहस‍िलदार किनवट यांनाही कळव‍िण्‍यात आले. तात्काळ शोध व बचाव कार्यास सुरुवात करण्‍यात आली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्डीले, न‍िवासी उपजिल्हाध‍िकारी किरण अंबेकर व ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण यांनी जलस‍िंचन व‍िभागाला सोडत असलेले पाणी बंद करण्‍यास सांगीतले तसेच शासनाकडे हेलीकॉफ्टरची मागणी बचाव कार्यासाठी केली.
स्‍थानीक शोध व बचाव पथकाद्वारे तेथील भोई समाजातील तडफदार युवकांनी तहस‍िलदार शारदा चौंडेकर व सपोन‍ि उदय भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य सुरु करून सात जणांची सुखरुप बचाव केला. दुपारी 3.15 वाजता घटनेची माहिती व तात्काळ 2 तासात शोध व बचाव कार्य सायं. 5.15 वा. यशस्‍वीर‍ित्‍या पुर्ण केले.

यात अनुसयाबाई दिगंबर ताळमवार 45 वर्ष, गजराबाई शिवाजी काठेवाड 45 वर्ष, सुवर्णा ज्योतीराम गांधरवाड 32 वर्ष, पूजा दिगंबर ताळमवार 19 वर्ष, कोमल शिवाजी काठेवाड 17 वर्ष, कामिनी ज्योतीराम गांधरवाड 4 वर्ष, विघ्नेश ज्योतीराम गांधरवाड 1 वर्ष हे सर्व राहणारे आहेत. यांना वाहत्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहातुन धबधब्‍यातुन सुखरुप बाहेर काढण्‍यात आले.
तहसीलदार किनवट शारदा चोंडेकर, स.पोल‍िस न‍िरीक्षक इसलापुर उमेश भोसले यांच्‍या प्रत्‍यक्ष सहभागातून मंडळ अधिकारी इस्लापूर सचिन भालेराव, गाडे जे.पी.दाऊद खान, पुष्पलवार, ग्राममहसुल अध‍िकारी अक्षय महाले, पोलिस पाटील वाळकी रवी खोकले, कोतवाल अमोल राठोड यांच्‍यासह स्‍थानिक शोध व बचाव कार्य पथक-भोई समाजातील रेस्‍क्‍यू करण्‍यात पांडुरंग जळबाजी नागीलवाड, दत्‍ता माधव चोपलवाड, अनिल शंकर भट्टेवार, रामराव सायबु घट्टलवार, दत्‍ता विठ्ठल विठ्ठलवार, सुनिल शंकर भट्टेवार यांनी सहभाग घेतला. तसेच सहस्‍त्रकुंड बानगंगा महादेव मंदीर ट्रस्‍टचे सच‍िव सत‍िश वाळकीकर यांनी मदत केली.
या शोध व बचाव कार्यबाबत ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणातील महसूल सहायक बारकुजी मोरे व आयटी आस‍ि. कोमल नागरगोजे हे संपर्क व समन्‍वय ठेवुन स्‍थानिक शोध, बचाव पथक व त्‍याबाबत अद्यावत माहिती सादर करत होते. हे शोध व बचाव कार्य स्‍थानिक प्रशासन, शोध व बचाव पथक, नागरीक, महसूल, पोलीस, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड व राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रभाग यांच्‍या समन्‍वयातुन यशस्‍वी झाले.
000000











वृत्त क्रमांक  1200

आयसीडीएस आठवडा 14 ते 19 नोव्हेंबर कालावधी

नांदेड दि. 13 नोव्हेंबर :- महिला व बालविकास विभागाचे शासन परिपत्रक 7 नोव्हेंबर 2009 अन्वये 14 ते 19 नोव्हेंबर हा कालावधी आयसीडीएस आठवडा म्हणून पाळण्याबाबतच्या सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
या प्रकरणी परिपत्रकात दिलेल्या सुचनानूसार तसेच नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या अधिन राहून कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे संबंधित विभाग व कार्यालय प्रमुखांना निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
00000

 वृत्त क्रमांक 1199

सरदार 150 युनिटी मार्च पदयात्रा उत्साहात संपन्न

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर : मेरा युवा भारत केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता द्वितीय पदयात्रा आणि विकसित भारत पदयात्रा 11 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे उत्साहात संपन्न झाली.

सकाळी 8 वाजता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. मारोती गायकवाड, आयटीआयच्या उपप्राचार्या श्रीमती कविता दासवाड, सायन्स कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. अरुणा शुक्ला, सिडको इंदिरा कॉलेजच्या डॉ. भागवत पास्तापुरे, मोहन कलबरकर आणि गोडबोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला प्रारंभ झाला.

पदयात्रेत सहभागी युवक-युवतींनी हातात तिरंगा घेऊन “एक भारत, आत्मनिर्भर भारत”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. अण्णा भाऊ साठे चौक मार्गे या पदयात्रेचा श्री गुरु गोबिंदसिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे समारोप झाला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा माय भारत तर्फे सत्कार करण्यात आला. युनिटी मार्चच्या माध्यमातून तरुणांमध्ये सामाजिक जाणीव, एकात्मता आणि स्वावलंबनाची भावना अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन चंदा रावलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.

यानंतर एकात्मा सांस्कृतिक कला मंडळ, बळीरामपूर यांनी देशभक्तीपर गीतांनी गायले. लय स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्ये सादर केली तसेच महाराष्ट्राची पारंपरिक लोककला व गोंधळाचे सादरीकरण केले. अखेरीस सर्व युवकांनी “आत्मनिर्भर भारत” होण्याची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन कलबरकर (गटनिदेशक) यांनी केले. या कार्यक्रमासाठी आयटीआयचे सर्व गटनिदेशक, विविध सेवाभावी संस्था, युवक मंडळे आदीची उपस्थिती होती. 

00000








वृत्त क्रमांक 1198

नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

चार इंजिन नष्ट, वीस तराफे जाळले 

24 लाखांचा मुद्देमाल जागेवर नष्ट

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर : नांदेड तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत केली आहे. यामध्ये 4 इंजिन जिलेटीनने स्फोट करून नष्ट केली. तसेच 20 तराफे जाळून नष्ट केले. या कारवाईत सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार संजय नागमवाड, सुनील माचेवाड, मंडळ अधिकारी मोहसीन सय्यद, कुणाल जगताप, अनिरुद्ध जोंधळे, ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव तसेच महसूल कर्मचारी बरोडा, श्रीरामे, जमदाडे, मनोज सरपे, महेश जोशी, गिरी, मुंगल, सकवान महसूल सेवक बालाजी सोनटक्के आदी पथकातील अधिकारी उपस्थित होते.

वाहेगाव परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असलेले महसूल पथकसला अवैध वाळू उत्खनन करणारे 4 इंजिन आढळून आले. पथकाने मजुरांच्या साहाय्याने ही इंजिन जिलेटीनने उडवून नष्ट केले. त्याचबरोबर वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे 20 तराफे जाळण्यात आले. असे एकूण 24 लाख किंमतीचा मुद्देमाल जागेवर नष्ट करण्यात आला. 

बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच आवश्यक असल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे. 

00000







वृत्त क्रमांक 1197

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक

नांदेड, दि. 13 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, जनजागृती करणे आणि संबंधित समित्यांना सक्रिय ठेवणे यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. बालविवाहमुक्त नांदेड जिल्हा हा उद्देश साध्य करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने आणि समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एस.बी.सी. मुंबई आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्पा’बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कैलास तिडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रेमीला निलावार, प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, मोनाली धुर्वे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी पंचायत विभाग, शिक्षण, एकात्मिक बालविकास, आरोग्य, महिला व बालविकास आणि उमेद या सर्व विभागांनी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर सतर्क राहून सर्व शक्य उपाययोजना अंमलात आणाव्यात.

बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून त्याला सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या आळा बसावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, भटजी, मौलवी, वांजत्री, सोनार, मंडप डेकोरेशन व फोटोग्राफर यांची यादी तयार करून त्यांच्यामार्फतही बालविवाह रोखण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश दिले. “या सर्व घटकांना त्यांच्या उपस्थितीत बालविवाह होणार नाहीत याबाबतची जनजागृती करावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाल संरक्षण समित्या प्रभावीपणे कार्यरत राहाव्यात, संशयास्पद विवाह समजताच शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील यांनी तातडीने कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात बालविवाह थांबवण्यासाठी जे जे करता येईल त्या सर्व उपाययोजना करा आणि जनजागृतीवर अधिक भर द्या,” असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत बाल संरक्षण कक्ष, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, सखी वन स्टॉप सेंटर तसेच आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षाचा कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.

०००००









वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...