Wednesday, November 12, 2025

वृत्त क्रमांक 1196

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 12 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 13 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक 1195

दिव्यांग कर्मचाऱ्यांची वैश्विक ओळखपत्रासह माहिती तात्काळ सादर करा - जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आढावा 

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : प्रत्येक कार्यालयात दिव्यांग आरक्षणाअंतर्गत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आतापर्यत कार्यालयास दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे किंवा नाही याबाबतची सर्व माहिती विभाग प्रमुखांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमान्वये दिव्यांग वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी)अनिवार्य काढणेबाबत बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधुत गंजेवार, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वैश्विक ओळखपत्र कार्यालयास सादर केले आहे किंवा नाही याची तपासणी करुन त्यांच्या दिव्यांगत्वाची पडताळणी करण्यात येणार आहे. जे अधिकारी-कर्मचारी यांनी वैश्विक ओळखपत्र सादर केले नाही, पडताळणीअंती ज्यांचे दिव्यांगत्वाची टक्केवारी 40 टक्के पेक्षा कमी आहे, ज्यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र बोगस आढळून आले अशा सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 91 नुसार कारवाई करावी किंवा त्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली करण्याबाबत निर्देश आहेत. 

त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी तात्काळ गुरुवार 13 नोव्हेंबर 2025 पर्यत कार्यालयात, विभागात किती दिव्यांग आहेत, त्यापैकी किती जणांकडे युडीआयडी कार्ड आहेत. किती जणांनी सादर केले आहेत. अद्याप सादर न करणाऱ्यांची संख्या किती आहे याबाबतची सर्व माहिती तात्काळ उपजिल्हाधिकारी सामान्य, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिले. सर्व विभागांनी माहिती सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने हे ओळखपत्र पडताळणीसाठी विशेष कॅम्पचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी, कर्मचारी  यांनी कार्यालयास सादर केलेल्या दिव्यांगत्वाचे वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची कार्यवाही सुरु असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यावेळी दिली. 

या बैठकीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधुत गंजेवार यांनी दिव्यांगांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने  सादरीकरणाद्वारे माहिती दिली. 

यावेळी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कलम 39 अन्वये दिव्यांगाप्रती तसेच जेष्ठ नागरिक कायदा 2007 अन्वये जेष्ठ नागरिकाप्रती संवेदनशिलता जागृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  शरद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.

00000












वृत्त क्रमांक 1194

जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी

लोहा येथील एसएसटी पथकाला दिली भेट

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रांवरील मूलभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, अपंग मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधांची पाहणी केली.

लोहा येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय, टिंगरी गल्ली येथील मतदान केंद्र व इंदिरानगर येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय येथे असलेल्या 5/1 मतदान केंद्र व कै. विश्वनाथ नळगे माध्यमिक महाविद्यालय जुनी इंदिरानगर येथील खोली क्रमांक 2 व 3 येथील मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. यावेळी मतदान केंद्रावर मतदारांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. 

मतमोजणी कक्षातील पाहणी करुन निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान यंत्राच्या एफएलसी प्रक्रीयेची पाहणी करुन निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दक्ष व पारदर्शक राहून योग्य ती कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी दिल्या.  मतदान केंद्रांवरील सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, मतदारांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व लोहा तहसिलदार श्री. परळीकर, निवडणूक शाखेचे अधिकारी, पोलिस अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा नांदेड रोडवरील एसएसटी पथकास भेट देऊन पाहणी केली. निवडणूक काळात अनधिकृत वाहतूक, रोख रक्कम, दारू, भेटवस्तू आदींची देवाणघेवाण रोखण्यासाठी सतत गस्त आणि तपासणी सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकांना दिले.

00000





वृत्त क्रमांक 1193

उद्दिष्टपूर्ततेसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे- जिल्हाधिकारी

क्षयरोग मंचाची आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : ग्रामीण व शहरी क्षयरोग मंच (टीबी फोरम) ची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात काल संपन्न झाली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातच्या अनुषंगाने दिलेल्या उद्दिष्टपूर्ततेसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. तसेच काही अडचणी निर्माण झाल्यास प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शहर आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिठे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मोहम्मद बदीउद्दीन, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपत मिरदुडे आदीची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची सविस्तर माहिती करण्यात आली.

जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी, उपाययोजना आणि पुढील नियोजन या विषयांवर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी समाधान व्यक्त करत जिल्ह्यात दोन नवीन जीन एक्सपर्ट मशीन (CBNAAT) वाढविण्याबाबत सूचना दिल्या. टीबी मुक्त भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील रणनीती आणि उपाययोजनांवरही या बैठकीत चर्चा झाली. बैठकीचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

00000



वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...