Thursday, November 6, 2025

वृत्त क्रमांक 1167 

कृषी अधिकारी बदलले तरी भ्रमणध्वनी क्रमांक तोच 

शेतकऱ्यांना संपर्कासाठी कायमस्वरूपी सुविधा; नांदेड जिल्ह्यात ४३९ नवीन सिमकार्डचे वाटप 

नांदेड, दि. 6 नोव्हेंबर : कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कायमस्वरुपी मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी बदलले तरी त्यांचा मोबाईल क्रमांक नव्या अधिकाऱ्याकडे कार्यरत राहणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील कृषी अधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे सोपे होणार असून विभाग आणि शेतकरी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल. 

महावितरणच्या धर्तीवर, राज्यातील कृषी यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १ नोव्हेंबरपासून हे कायमस्वरुपी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेत दर महिन्याला ६० जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. 

ही सुविधा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या सर्व पदांसाठी लागू आहे. 

नांदेड जिल्ह्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकूण ४३९ नवीन सिमकार्ड मिळाले असून त्यांचे वाटप तालुका स्तरावर करण्यात आले आहे. या सिमकार्डची सेवा लवकरच वरिष्ठ स्तरावरून सुरु करण्यात येणार आहे. 

कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे एकच कायमस्वरूपी क्रमांक असल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान, कीडरोग व्यवस्थापन आणि विविध योजनांबाबत सल्ला तत्काळ मिळण्यास मदत होईल. तसेच विभागातील अंतर्गत संपर्क व्यवस्था अधिक सुकर होईल व क्षेत्रीय कामकाजात डिजिटल संवाद सशक्त होणार आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांशी थेट संवाद वाढवून कृषी सेवा अधिक परिणामकारक करणे हा आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1166 

कुष्ठरोग शोध अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक संपन्न 

नांदेड, दि. 6 नोव्हेंबर : जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहिम 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक घरोघरी भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कुष्ठरोग शोध अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह समितीचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

या अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन संसर्गित रुग्ण ओळखणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे, तसेच कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले. 

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या-जिल्हा व तालुका समन्वय समित्या-स्थापन करून त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप निश्चित करण्यात आले. तसेच मोहिमेच्या पूर्वनियोजनातील क्रियाकलापांचा (प्रशिक्षण, प्रसिद्धी, सूक्ष्मकृती आराखडा इ.) आढावा घेण्यात आला. 

घरोघर सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि औषधोपचार पुरवठा यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला. मोहिमेचे संनियंत्रण व पर्यवेक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी दिले. 

प्रत्येक स्तरावर वेळेत अहवाल सादर करण्यावरही भर देण्यात आला. या वेळी डॉ. संगीता देशमुख यांनी अभियानाची सविस्तर माहिती सादर केली व आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन साध्य करण्यासाठी हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केला.

0000




वृत्त क्रमांक 1165 

आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित

जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी 

नांदेड दि. 6 नोव्हेंबर :- भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण दिल्ली यांच्याकडील कार्यालयीन ज्ञापन 19 सप्टेंबर 2025 नुसार आधार नोंदणी व आधार अपडेट तसेच अनिवार्य आधार अपडेट सेवांसाठी सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढीलप्रमाणे सुधारित दर निश्चित केले आहेत. या निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त जास्तीचे दर आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डीआयटी कक्षात अथवा संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.                                                                                                                                                

 अद्यावतीकरणाचा प्रकार व शुल्क

·         नवीन आधार नोंदणी- निशुल्क

·         बालआधार 5 वर्षानंतर अद्यावत करणे अनिवार्य (बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ, हाताचे ठसे करणे)- निशुल्क

·         नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 5 ते 715 ते 17 वयोगटासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी)- निशुल्क

·         नागरीकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 15 ते 17 वयोगटासाठी (अनिवार्य) बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी) 7 ते 15 वयोगटासाठी  1 जानेवारी 2025 ते पुढील एक वर्षाकरीता- निशुल्क

·         नागरिकांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे 17 वर्षावरील बायोमेट्रिक अद्यावतीकरण (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे इत्यादी)- रुपये 125 (जीएसटीसह).

·         सर्व सामान्य नागरीकांचे आधार बायोमेट्रिक अद्यावतीकरण करणे (डोळ्याचे बुबुळ हाताचे ठसे, डेमोग्राफिक अद्यावतीकरणासह)- रुपये 125 (जीएसटीसह).

·         सर्वसामान्य नागरिकांचे आधारमध्ये एकापेक्षा जास्त डेमोग्राफिक अद्यावतीकरण (नाव, पत्ता, मोबाईल, लिंग, इत्यादी अद्यावतीकरण करणे)- रुपये 75 (जीएसटीसह).

·         सर्वसामान्य नागरिकांचे Proof of Address (POA) / Proof of Identity (Pol) दस्तेवज अद्यावतीकरण करणे)- रुपये 75 (जीएसटीसह).

·         SSUP (my Aadhaar) पोर्टलद्वारे Proof of Address (POA)/Proof of Identity (Pol) द्वारे अद्यावतीकरण करणे- रुपये 75 (जीएसटीसह).

·         ई-आधार डाऊनलोड करून कलर प्रिंट देणे- रुपये 40 (जीएसटीसह).

·         आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्याकामी Home Enrolment करणे- रुपये 700 (जीएसटीसह) असे शुल्क आकारले जातील.

या दराप्रमाणे आधार केंद्रचालकांनी नागरिकांकडून आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्यासाठी सेवा शुल्काची आकारणी करावी. नागरिकांनी निश्चित केलेल्या या दराव्यतिरिक्त जास्तीची आकारणी करणाऱ्या आधार केंद्र चालकाविरुद्ध नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय डी.आय.टी.कक्ष दुसरा माळा तसेच संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी. तसेच भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण यांचा टोल फ्री क्रमांक 1947 या क्रमांकावर सुद्धा नागरीक तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांनी Physical Aadhaar चा वापर न करता Mask Aadhaar चा वापर करावा जेणेकरून आधार नंबरचा गैरवापर टाळता येऊ शकेल, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतु समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000



वृत्त क्रमांक 1164

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि. 6 नोव्हेंबर :- नांदेड जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. 

जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नगरपरिषद/नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.                                                                                                                                                                                                                                                                                                                राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र् राज्य यांचे आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील 12 नगरपरिषद/ एका नगरपंचायतीच्या् संपूर्ण क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात सबंधित नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढून टाकण्याचे, भींतीवरील राजकीय मजकुर पुसून टाकण्याचे व राजकीय पक्षाचे बोर्ड काढून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्याधिकारी यांना दिले. तसेच मतदार यादीतील दुबार-तिबार मतदाराबाबत आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कटाक्षाने कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. 

कायदा व सुव्यवस्था पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत संबंधित शहरासह संपूर्ण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सूचित केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत आदर्श आचासंहितेचे उल्लंघन होणार नाही आणि आदर्श आचारसंहितेची प्रभावी अमंलबजावणी होईल याचीही दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी या कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या नगरपरिषद / नगरंपचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आयोगाचे वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज विहित वेळेत पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व संबंधिताना दिल्या. ही निवडणूक लोकशाहीचे मूल्य जोपासून निष्पक्ष, निर्भय व शांत वातावरणात पार पडेल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

00000




वृत्त क्रमांक 1163

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त

कार्यक्रमास अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश  

नांदेड दि. 6 नोव्हेंबर :- वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी वंदे मातरम गीताचे गान होणार आहे. या कार्यक्रमास सर्व विभागातील शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तसेच याप्रसंगी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत.    

वंदे मातरम गीताने जनमानसात देशभक्तीपर देशभावना जागृत होण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. त्याअनुंषगाने हा कार्यक्रम संबंधित तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे तालुकानिहाय ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत.  

नांदेड येथे श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन, अर्धापूर येथे मिनाक्षी हायस्कुल, उमरी येथे यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, हदगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड येथे जिल्हा परिषद मुलींची शाळा, मुदखेड येथे तालुका क्रिडा संकुल, नायगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बिलोली येथे पोलीस कॉर्टर ग्रांउड, देगलूर येथे मानव्य विकास विद्यालय, कंधार येथे शिवाजी हायस्कुल, माहूर येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, किनवट येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथे छत्रपती शाहू विद्यालय, हिमायतनगर येथे हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, धर्माबाद येथे तालुका क्रीडा संकुल, लोहा येथे कै. विश्वनाथ नळगे विद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास संबंधित तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

00000



वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...