Sunday, November 2, 2025

 दि.1 नोव्हेंबर 2025

 वृत्त क्रमांक  1150

राष्ट्रीय एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

हजारो युवकांना दिली राष्ट्रीय एकतेची शपथ

नांदेड, दि. 1 नोव्हेंबर : मेरा युवा भारत केंद्र (मायभारत), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता पदयात्रा – सरदार @150 युनिटी कॅम्पेन” चे आयोजन करण्यात आले. ही पदयात्रा 31 ऑक्टोबर रोजी जुन्या मोंढा येथील सरदार पटेल पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनापर्यंत काढण्यात आली. युवक-विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी हिरवा ध्वज दाखवून पदयात्रेला सुरुवात केली. शेकडो युवकांनी पांढरे टी-शर्ट व हाती तिरंगा धरण्यासह देशभक्तिपर गीतांच्या तालावर पथसंचलन केले. 

गुरुद्वारा चौक, महावीर चौक मार्गे पदयात्रा नियोजन भवन येथे पोहोचली. संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारलेले होते.

कार्यक्रमादरम्यान केंद्रीय संचार ब्युरो, नांदेड यांच्या टीमने सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. समारोप महाराष्ट्र गीताने झाला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित युवकांना नशा मुक्त भारत आणि आत्मनिर्भर भारत बांधणीची शपथ दिली व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले. मायभारत नांदेडचे जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पदयात्रेतील सहभागींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासन, सेवाभावी संस्था व विविध युवक मंडळांचे सहकार्य लाभले.

00000





दि.1 नोव्हेंबर 2025

 वृत्त क्रमांक  1149





दि.1 नोव्हेंबर 2025

 वृत्त क्रमांक  1148

प्रत्येक शेतात पाणी उपलब्धतेसाठी “जलतारा” जनचळवळ राबविणार– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

31 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय बैठक व कार्यशाळा संपन्न

नांदेड, दि. 1 नोव्हेंबर : सतत बदलणारे हवामान, अनियमित पावसाचे चक्र आणि बदललेली भौगोलिक परिस्थिती यामुळे शेतीला गंभीर फटका बसत असताना नांदेड जिल्हा प्रशासनाने पाणी संवर्धनाचा भक्कम निर्धार केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतासाठी पाणी उपलब्ध व्हावे, पावसाचे पाणी शेतातच मुरावे यासाठी “जलतारा” जनचळवळ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठक व कार्यशाळेत सर्व अधिकाऱ्यांना दिली.

याबाबत नियोजन भवन येथे 31 ऑक्टोबर रोजी कार्यशाळाही संपन्न झाली. या कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेश वडदकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी जलताराचे फायदे, निधी व तांत्रिक तपशील याचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मनरेगा अधिकारी-अभियंते उपस्थित होते.

पावसाचे पाणी शेतात -जलतारा म्हणजे काय ?

शेतातील उताराच्या स्थळी 5 फूट लांबी, 5 फुट रंदी, 6 फुट खोलीचा खड्डा करून, त्यात दगडांनी भर घालून पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची ही सोपी, वैज्ञानिक पद्धत आहे. यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरते, भूजल पातळी वाढते, शिवारातील विहिरी-बोअरवेलना पाणी मिळते, पिकांच्या वाढीस मदत होते, शेताची जागा वाया जात नाही. एक जलतारा पावसाळ्यात सुमारे 3.60 लाख लीटर पाणी जमिनीत मुरवतो.

मोठा संकल्प 1 लाख जलतारे

जिल्ह्यातील ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या समन्वयातून एक लाख जलतारे तयार करण्यात येणार असून हे काम मार्च 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यातून साधारण 3600 कोटी लीटर पाणी संरक्षित होणार आहे.

मनरेगा मार्फत आर्थिक सहाय्य 

जलतारा तयार करण्यासाठी मनरेगा योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति एकर 6 हजार रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे. यामुळे पाणी उपलब्धतेबरोबरच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसही चालना मिळेल. ग्रामीण भागात रोजगार व मनरेगाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या अभियानाबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांनी तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन तातडीने कामे मंजूर करून मार्चअखेर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

00000





दि.1 नोव्हेंबर 2025

 वृत्त क्रमांक  1147

रेशीम शेतीतून ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न व रोजगार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

जिल्हाधिकारी यांनी धनज व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना दिली भेट

नांदेड, दि.1 नोव्हेंबर : जिल्ह्यात रेशीमशेतीचा विस्तार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक व जोंमेगाव येथील रेशीमशेती प्रकल्पांना काल ३१ ऑक्टोबर रोजी भेट देऊन पाहणी केली.

धनज बुद्रुक येथील शेतकरी प्रकल्पाची पाहणी

लोहा तालुक्यातील धनज बुद्रुक येथील शेतकरी संदीप दिगंबर माळेगावे यांच्या शेताला भेट देऊन त्यांनी रेशीम शेतीतील प्रगतीची माहिती घेतली. माळेगावे यांनी मागील दोन वर्षापासून रेशीमशेती सुरू केली असून, मागील दोन वर्षांत सुमारे 3 लाख रुपयांचा नफा झाल्याचे तसेच मनरेगा मार्फत 2 लाख 50 हजार रुपयांचा निधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यशस्वीपणे रेशीम शेती शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन इतर शेतकरीही या क्षेत्राकडे वळत आहेत का, तसेच रेशीमशेतीतून मिळणारे आर्थिक फायदे याबाबत सविस्तर चर्चा केली. याशिवाय त्यांनी रोप उपलब्धतेबद्दल विचारणा केली असता, शेतकरी स्वतः तुती कलमापासून रोपे तयार करतात, असेही निदर्शनास आले.

जोमेगाव येथील प्रकल्पाची पाहणी

लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील शेतकरी देविदास दिगंबर शिंदे यांच्या शेतातील सध्या सुरू असलेल्या कीटक संगोपन प्रक्रियेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. संगोपन कालावधी, कामाची पद्धत, अळ्यांचे विविध टप्पे व अळीपासून कोश निर्मिती प्रक्रिया याबद्दल त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.

शेतकऱ्यांसोबत संवाद

भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनुदानाबाबत अडचणी आहेत का?, चॉकी (silkworm rearing) वेळेत मिळते का?याबाबत विचारणा केली. सर्व शेतकऱ्यांनी योग्य वेळेत व चांगल्या गुणवत्तेची चॉकी उपलब्ध होते तसेच रेशीम विभागाचे मार्गदर्शन समाधानकारक असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले, “रेशीमशेती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि महिला गटांसाठी स्थिर व वाढत्या उत्पन्नाचा उत्तम पर्याय आहे. रेशीम शेतीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जाईल.” 

यावेळी रेशीम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते

00000




 वृत्त क्रमांक  1146

एम-सॅंड (कृत्रिम वाळू) उत्पादित व्यक्ती व संस्थानी सवलतीसाठी 2 डिसेंबरपर्यत अर्ज करावेत

-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि. 1 नोव्हेंबर:- नैसर्गिक वाळूवरील दबाव कमी करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने राज्य शासनाच्यावतीने कृत्रिम वाळू (एम-सॅंड) उत्पादन प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योजक, सहकारी संस्था, महिला बचत गट, युवक व कृषी-आधारित उद्योगांनी एम-सॅंड प्रकल्प स्थापन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्हाधिकारी यांनी काल ३१ ऑक्टोबर रोजी लोहा येथील एम-सॅंड प्रकल्पाची भेट घेऊन प्रकल्पाची सविस्तर पाहणी केली. प्रकल्पाची प्रक्रिया, उत्पादन यंत्रणा, गुणवत्ता परीक्षण, पर्यावरणीय मानदंड व बाजारपेठेची मागणी याबाबत त्यांनी  माहिती घेतली.

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, “शासनाच्या विविध औद्योगिक, पर्यावरण व उद्योजकता प्रोत्साहन योजनांतर्गत एम-सॅंड प्रकल्पांना प्राधान्याने वित्तीय सहाय्य, मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी एम-सॅंड हे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे.”

नैसर्गिक वाळूचे संरक्षण, बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ता व उपलब्धता वाढविणे, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, आणि युवक-उद्योजकांसाठी नवीन व्यवसाय संधी उपलब्ध करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. 

एम-सॅण्ड (कृत्रिम वाळू) युनिटसाठी मंजूर खाणपट्टा असलेले, तात्पुरता परवाना असलेले, कोणत्याही प्रकारचा खाणपट्टा नसलेले ईच्छूक व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रे जोडून 2 डिसेंबर 2025 पर्यत अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्र, पर्यावरण विभाग आणि पंचायत राज संस्था यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

000000




वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...