Thursday, October 9, 2025

 वृत्त क्रमांक  1073

अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  येथे उत्साहात आयोजन

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : देशाच्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, अजीत पवार आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री  मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

राज्यातील ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमधून या अभ्यासक्रमांची एकाच वेळी सुरुवात करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विश्वकर्मा श्री मारोती पांचाळ आणि श्री सिताराम जहांगीड यांच्या हस्ते आठ अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आयएमसी सदस्य  हर्षद शहा, रामनाथ तप्तेवार, धीरज बिडवे, प्रेमानंद शिंदे,  सहायक आयुक्त  राजपाल कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  आर. बी. गणविर, तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  गणविर यांनी अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे प्राचार्य  सचिन सुर्यवंशी यांनी  राज्यसभा सदस्य व माजी मुख्यमंत्री  अशोक चव्हाण यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. आपल्या संदेशात श्री चव्हाण यांनी म्हटले  की, “या अभ्यासक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला बळ मिळेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डी. ए. पोतदार यांनी केले, तर आभार गटनिदेशक विकास भोसीकर यांनी मानले. कार्यक्रमात संस्था कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांसह सुमारे १५०० जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



 वृत्त क्रमांक  1072

प्रत्येकाला आपल्या मराठी बोली भाषेचा अभिमान वाटला पाहिजे - डॉ. पृथ्वीराज तौर

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : “प्रत्येकाला आपल्या मराठी बोली भाषेचा अभिमान वाटला पाहिजे,” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे भाषा विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने  विविध उपक्रम व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. पुढे बोलताना डॉ. पृथ्वीराज तौर यांनी  विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “स्पर्धा परीक्षांसाठी शब्दांची निवड आणि भाषेचा अचूक वापर केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ होते.”

कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील उपयोग आणि तिची अभिव्यक्ती यावर आपले विचार व्यक्त केले. 

मराठी भाषा व तिच्या साहित्यसंपदेचे प्रदर्शन नांदेड जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीत आयोजित करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सहाय्यक प्राध्यापिका श्रीमती प्रतीक्षा तालंगकर यांनी “मराठी भाषा अभिजात कशी ठरली” यावर सविस्तर विवेचन केले.

ज्येष्ठ साहित्यिक बापू दासरी यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर आणि लेखनशैलीतील भूमिका यावर विचार मांडले. त्यांनी रोजनिशी लेखनाचे महत्त्व अधोरेखित करत, भाषा प्रगल्भतेकडे नेणारा मार्ग म्हणून त्याचे उदाहरण दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी आभार मानले. या प्रसंगी  विकास बिरादरी, विधिज्ञ पिंपरखेडे, ज्येष्ठ लेखक लक्ष्मण संगेवार, श्रीमती प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, बाळू पावडे, उत्तम घोरपडे, राजीव पाटील, रघु श्रीरामवार यांच्यासह वाचक, अभ्यासक, विद्यार्थी व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

---





 वृत्त क्रमांक  1071

पेन्शन अदालत मंगळवारी 

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : शासनाच्या सूचनेनुसार माहे ऑक्टोबर २०२५ मधील दुसऱ्या मंगळवारी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालात आयोजित करण्यात आली आहे.

सदर अदालातासाठी अधिकारी व कर्मचारी  यांनी सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत हजर राहावे. नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त  अधिकारी व कर्मचार्‍यांनी पेन्शन संबंधित अडचणी, तक्रारी व मागण्या सदर दिवशी हजर राहून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

वृत्त 

स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी हे महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९  : राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत “स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णयप्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी” हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित "ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025"  च्या कार्यक्रमामध्ये क्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारखे अनेक प्रकल्प दशके प्रलंबित होते, परंतु ‘इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूम’च्या माध्यमातून निर्णयप्रक्रिया गतिमान करण्यात आली. पूर्वी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केवळ नियोजनासाठी सहा वर्षे लागली होती. मात्र आम्ही ३७२ किमी मेट्रो नेटवर्कसाठी केवळ ११ महिन्यांत निविदा टप्प्यापर्यंत पोहोचलो, असे त्यांनी सांगितले.

सन २०३० पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी ‘एमएमआर ग्रोथ हब इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई परिसरात ‘तिसरी मुंबई’ची उभारणी करण्यात येणार असून त्यात ‘एड्यु सिटी’, ‘इनोव्हेशन सिटी’, ‘स्पोर्ट्स सिटी’ आणि ‘जीसीसी सिटी’ उभारण्यात येणार आहे. ‘एड्यु सिटी’त १० ते १२ परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस येणार असून सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. या विद्यापीठांमध्ये न्यूयॉर्क, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था असणार आहेत. यामुळे नव्या शहराचा आणि नव्या अर्थव्यवस्थेचा विकास होणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, इनोव्हेशन सिटीमध्ये जागतिक स्तरावरील संशोधन व तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी स्वयंसेवेने पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईच्या उत्तरेकडील भागात वाढवण येथे भारतातील सर्वात मोठा बंदर प्रकल्प उभारला जात आहे. २० मीटर खोल ड्राफ्ट असलेले हे बंदर जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये गणले जाणार आहे. याशिवाय, मुंबईचा तिसरा ऑफशोर विमानतळ आणि बुलेट ट्रेन स्टेशनही प्रस्तावित आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई नवीन आर्थिक केंद्र म्हणून उदयास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बोलताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले  की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान राज्यातील सर्व क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवत आहे. राज्य सरकारने शेती क्षेत्रासाठी ५०० कोटी रुपयांचा ‘AI मिशन’ हाती घेतला असून, शेतकऱ्यांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध एआय चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे. हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाश्वत शेतीचा नवा मार्ग शोधला जात आहे.

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नवउद्योग, संशोधक आणि स्टार्टअप कंपन्यांना महाराष्ट्र शासनासोबत सहकार्य आणि सहभागी  होण्याचे आवाहन केले. 

000






























  वृत्त क्रमांक  1070

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : नांदेड जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या १६ पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी या सोडत जाहिर करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रांनुक्रम नियम, २०२५ नुसार ही सोडत घेण्यात येत आहे.

या नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने विशेष सभा आयोजित केली आहे. 

जिल्हा परिषदेचे  नाव/पंचायत समितीचे नाव सभेचे ठिकाण सभेची वेळ व तारीख

नांदेड जिल्हा परिषद, नांदेड सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, किनवट सभागृह, तहसिल कार्यालय, किनवट सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, माहुर कै. वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती, माहुर दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, हदगांव पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, हदगांव सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, हिमायतनगर सभागृह, तहसिल कार्यालय, हिमायतनगर दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, नांदेड उपविभागीय अधिकारी, नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, नांदेड सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, अर्धापूर सभागृह, तहसिल कार्यालय, अर्धापूर दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, भोकर उपविभागीय अधिकारी, भोकर यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, भोकर सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, मुदखेड सभागृह, तहसिल कार्यालय, मुदखेड दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, धर्माबाद बैठक कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, धर्माबाद सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, उमरी तहसिल सभागृह (नवीन), तहसिल कार्यालय, उमरी दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, बिलोली पंचायत समिती सभागृह, बिलोली ता. बिलोली सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, नायगांव खै. तहसिल कार्यालय, नायगाव खै. दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, कंधार सभागृह, तळमजला, तहसिल कार्यालय, कंधार सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, लोहा तहसिल कार्यालय, लोहा दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, देगलूर पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, देगलूर सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

पंचायत समिती, मुखेड बैठक कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड दुपारी-03.00 वा. दिनांक 13/10/2025

याकरिता सोडत पद्धतीने कारवाई करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, संबंधित अधिकारी, प्रतिनिधी आणि जनतेने या सोडतीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

00000



    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...