Saturday, September 27, 2025

  वृत्त क्रमांक 1020

नागरीकांनी #पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा #इशारा


#नांदेड दि. 27 सप्टेंबर: मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात #अतिवृष्टी झालेली असून जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या #प्रमाणावर पाण्याचा #विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व #नद्या दुथडी भरून #वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २,१९,२२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची #पाणीपातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक #हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आज संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकांनी खालीलप्रमाणे उपाययोजना व खबरदारी घेण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

काय करावे:
गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.

पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास क्र.(0२४६२) २३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षितस्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत प्राण्यांना बांधून ठेवू नये त्यांना खुले सोडावे. प्राणी खुले सोडल्याने ते स्वतःचा बचाव स्वतः करू शकतील. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ. संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

काय करू नये
पूर असलेल्या भागात, नंदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका, तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. दूषित / उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर, नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव किरण अंबेकर यांनी केले आहे.
0000

 वृत्त क्रमांक 1019 

नांदेड जिल्ह्यातील 25 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद   

 

नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना, जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना

 

नांदेड दि. 27 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यात शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड तालुक्यातील ५, बिलोली तालुक्यातील ३, मुखेड तालुक्यातील ५, कंधार तालुक्यातील ४, लोहा तालुक्यातील ५, मुदखेड तालुक्यातील २, नायगाव तालुक्यातील १ अशा एकूण २५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदीकाठच्या सखोल भागातील लोकांना व जनावरांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरितकरण्याच्या सूचना मनपा नांदेड तसेच सर्व संबंधित तहसिलदार यांना दिलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पामध्ये सध्या १६०००० लक्ष क्युसेक्सची आवक सुरू असून पुढील ६-७ तासात आवक ३ लक्ष पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या विष्णुपुरी धरणातून १६०००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे व येत्या ५-६ तासात विसर्ग वाढवून २.५ लक्ष ते ३.० लक्ष क्युसेक्स करण्याची शक्यता असल्याने नांदेड शहरालगत नदीची पातळी इशारा पातळी ३५९.०० मी च्या वर जाण्याची शक्यता आहे.

 

धर्माबाद तालुक्यातील बेल्लूरपुलावरून अजून पाणी चालू आहे. अर्धापूर तालुक्यातील मौजे रोडगी येथील संतोष धोंडीबा काकडे यांच्या मालकीची एक म्हैस वीज पडून मृत पावली आहे. शेलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे.

 

मुखेड तालुक्यातील मौजे शिकारा येथे राहत्या घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे. जीवित हानी झालेली नाही. मौजे देगाव येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मार्ग बंद आहे. बाऱ्हाळी- मुक्रामाबाद-निवळी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे.बेरळी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

 

लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा ते रूपसिंग तांडा परसराम तांडाकडे जाणारा पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. उमरा गावापासून पुराचा प्रवाह अंदाजे २०० मीटर लांब आहे. आतापर्यंत घरात पाणी शिरलेले नाही, जीवित हानी झाली नाही. देऊळगाव व चितळी येथे ओढ्यास पूर आल्यामुळे रस्ता बंद आहे. धनज खुर्द येथील पुलावरून पाणी जात असल्याने धनज खु. गावचा संपर्क तुटला आहे. सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावचा संपर्क तुटलेला आहे. लोंढेसांगवी आणि उस्माननगर पोस्ट हद्दीतील जोशी सांगवी यांच्यामधील पुलावरून पाणी जात आहे. डोंगरगाव येथील घोटका जाणारा पुल पाण्याखाली असून दोन मंदिरात पाणी घुसले असून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पाणी आले आहे. मंदिराजवळील एका घरातील कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. तसेच चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

दोन्ही ठिकाणांहून वाहतूक बंद आहे. धानोरा-खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. देगलूर तालुक्यामध्ये सध्या पाऊस थांबला आहे. जवळपास आठ गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने तात्पुरत्या स्वरूपात संपर्क तुटलेला आहे.

 

नांदेड तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळेपुलावरून पाणी जात असल्यामुळे राहेगाव गावाचा संपर्क तुटलेला आहे. वनेगाव ते वरखेड अंतर्गत पुलावरून पाणी जात असल्याने हा रस्ता बंद आहे. पर्यायी मार्ग चालू आहे. कासारखेडा मार्गे एकदरा जाणारा नाला भरल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे एकदरा गावचा संपर्क तुटला आहे. तसेच निळा एकदरा पुलाच्या बाजूच्या रस्त्याने पाणी वाहत असल्याने तोही मार्ग बंद झाला आहे. तळणी ते रेगाव रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. मौजे पिंपळगाव कोरका येथे कॅनॉल फूटल्यामुळे १ ते २ घरात पाणी आले आहे. नांदेड शहरातील मोमीनपुरा, कालापूल, बाळगीर महाराज मठ, शनी मंदिर हमालपुरा, दत्तनगर, गोकुळनगर येथे रस्त्यावर भरपूर पाणी आहे. हदगाव तालुक्यातील शेंबाळपिंपरी ते तळणी रोड बंद आहे. नायगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी आणि मन्याड नदीकाठाच्या गावांमध्ये सर्व यंत्रणा सतर्क आहे. पाणी पातळी वाढली आहे परंतु अजून कुठेही गावात पाणी शिरल्याची अथवा गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती नाही.

 

विष्णुपुरी पुर सद्यस्थितीत 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा.

जायकवाडी विसर्ग - 38000 क्युसेक.

माजलगाव विसर्ग - 80000 क्युसेक्स.

दिग्रस बंधारा - 200000 क्युसेक्स.

पूर्णा नदी (सिध्देश्वर + खडकपूर्णा + निम्न दुधना)- 45000 क्युसेक्स.

विष्णुपुरी - 156000 क्युसेक.

नांदेड ओल्ड ब्रिज पातळी - 348.34 मी (117000 क्युसेक).

बाळेगांव- 200000 क्युसेक.

 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील जायकवाडी प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, सिद्धेध्वर प्रकल्प, निम्न दुधना व खडकपूर्णाप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सर्व धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे.

00000

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...