Friday, September 26, 2025

इसापूर प्रकल्पातून रात्री 9 वाजता पुन्हा विसर्ग वाढ 

हवामान विभागाकडून आजपासून पुढील 5 दिवसांच्या कालावधीत यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तो लक्षात घेऊन इसापूर धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने व पाणी पातळीमध्ये घट करण्याच्या दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता चालू असलेल्या विसर्गात आणखी दोन गेट उघडून वाढ करण्यात येणार आहे. तरी पैनगंगा नदीच्या दोन्ही तिरावरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष इसापूर प्रकल्प यांनी केले आहे. 

इसापूर धरणातून विसर्ग वाढ ; उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण 

ROS नुसार धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 26 सप्टेंबर 2025 रोजी 8 वाजता आणखी 4 गेट  0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे 9 गेट 0.50 मीटर ने चालू असून  एकूण 9 गेटद्वारे पैनगंगा नदीपात्रात 15273 क्युसेक्स (432.491 क्युमेक्स) इतका विसर्ग  सुरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - इसापूर धरण पूरनियंत्रण कक्ष

00000

वृत्त क्रमांक 1018 

शेतकऱ्यांनो महाविस्तार एआय ॲपचा वापर करा

आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळवा : कृषि विभाग 

नांदेड दि. 26 सप्टेंबर : शेतकऱ्यांना हवामान बदल बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय AI हे अँप लाँच केले आहे. हे कृषी विभागाने विकसित केलेले एक अत्याधुनिक ॲप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या सहाय्याने हे अँप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अँप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन करते. 

महाविस्तार एआय AI अँपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल-टाइम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पिकांची पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी, आणि जैविक शेती  याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अँपमधील AI तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करुन उपाय मिळवू शकतात. 

महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे . चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.तसेच महाविस्तार AI ॲपचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना देखील आहे.महाविस्तार AI ॲपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या,प्रत्येक तालुक्यातील पहिल्या 3 शेतकऱ्यांना ॲप मधील लीडरबोर्डवर स्थान देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त ॲप वापरणाऱ्या 3 शेतकऱ्यांना मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशंसा पत्र देण्यात येणार आहे तसेच राज्यस्तरावर सर्वाधिक ॲप वापरणाऱ्या 10 शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रशंसा पत्र/प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

 

 वृत्त क्रमांक 1017 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा  

28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबर रोजी होणार   

नांदेड दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पाऊस होत आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परिक्षा-2025 ही 28 सप्टेंबर ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजे रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. सर्व परिक्षार्थी उमेदवारांनी या परीक्षेच्या तारखेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2025 रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वा. पर्यंत दोन सत्रात घेण्यात येणार होती. परंतू महाराष्ट्र राज्यात तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे काही परिक्षार्थी यांना या परिक्षेस बसता आले नसते व परिक्षेस मुकावे लागले असते. 

याबाबत नांदेड जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरुन नांदेडला ही परीक्षा देण्यासाठी येत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याबाबत शुध्दीपत्रक 26 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1016 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश   

नांदेड दि. 26 सप्टेंबर: नांदेड जिल्ह्यात 29 सप्टेंबर सकाळी 6 वाजेपासून ते 13 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हा शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक 1015 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना शनिवार 27 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर   

नांदेड, दि. 26 सप्टेंबर :- जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानि शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आज निर्गमीत केला आहे. 

मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यास शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरलेले असून सर्व नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी इशारा पातळी गाठलेली असल्याने नांदेड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

नांदेड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय) मधील विद्यार्थ्यांना शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1014

२७ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट 

नांदेड दि. २६ सप्टेंबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २६ सप्टेंबर २०२५ या दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. तर  २७ सप्टेंबर २०२५ या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 

दि.२६ सप्टेंबर २०२५ या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

 0000

वृत्त क्रमांक 1013

दिव्यांग लाभार्थ्यांनी ‘५ टक्के सेस’ योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हा समाज कल्याण अधिकारी

नांदेड, दि. 26 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या जि.प. ५ टक्के सेस दिव्यांग व मागासवर्गीय कल्याण निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सन 2025-26 या वर्षात दिव्यांग कल्याण व पुनर्वसन (जि.प. ५ टक्के सेस) तसेच मागासवर्गीय कल्याण निधी योजना राबविल्या जात आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असून, यासाठी mhdivyang.com (नांदेड दिव्यांग मित्र व 20 टक्के मागासवर्गीय अनुदान योजना) ही संकेतस्थळ विकसित करण्यात आली आहे.

पंचायत समित्यांअंतर्गत असलेल्या दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून, सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित कार्यालयास फॉरवर्ड करावेत.

या योजनेअंतर्गत दिव्यांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार प्राधान्याने (100 टक्के ते 40 टक्के अशा उतरत्या क्रमाने) लाभ देण्यात येणार आहे, अशी माहितीही समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 1012

1 ऑक्टोंबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

नांदेड दि. 26  सप्टेंबर :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा. जागतिक ज्येष्ठ नागरीक दिन कार्यक्रम नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)चे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी केले आहे.   

00000

 वृत्त क्रमांक 1011 

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा    

नांदेड दि. 26 सप्टेंबर :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 27 सप्टेंबर, 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सायं.5.30. वा. परभणी येथून नांदेडकडे प्रयाण. रात्री 7.30 वा.नवयुवक दुर्गा मंडळ शिवाजीनगर येथे भेट.  रात्री. 8.15 वा. बियाणी डेव्हलपर्स नवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. ठिकाण आशीर्वाद नगर, छत्रपती चौकाजवळ नांदेङ रात्री 9 वा. आशीर्वाद नगर, छत्रपती चौकाजवळ नांदेड येथून परभणी कडे प्रयाण करतील.  

0000

 वृत्त क्रमांक 1010 

श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंत्योदय दिन साजरा

नांदेड, दि. २६ सप्टेंबर : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारी, अधिकार व कर्तव्यांविषयी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून दर महिन्याला सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुशंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती “अंत्योदय दिन” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण साले होते. त्यांनी एकात्म मानवदर्शन या संकल्पनेविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांचे संयम, समर्पण आणि कर्तव्यभावना यांसह समष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी यांचे अखंड अवधान ठेवून चालणारे जीवन म्हणजेच एकात्म मानवदर्शन होय.

संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी आपल्या भाषणात समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या महापुरुषांची जयंती साजरी करणे ही त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याची संधी असल्याचे नमूद केले.

जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक सतीश चव्हाण यांनी उद्योगासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रा.से. योजनेमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्साहाने रक्तदान केले.

या कार्यक्रमासाठी पत्रकार कृष्णा उमरीकर, हर्षद शहा, प्रेमानंदजी शिंदे, धीरज बिडवे (व्यवस्थापन समिती सदस्य), मनोज जाधव (सामाजिक कार्यकर्ते), सुधीर एकलारे (सामाजिक कार्यकर्ते, देगलूर) तसेच सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पोतदार (रा.से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. आभार व्ही. पी. भोसीकर (गटनिदेशक) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

०००००



    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...