Wednesday, September 24, 2025

वृत्त क्रमांक 1008 

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत

'भूमी अदालतीचे' 30 सप्टेंबर रोजी आयोजन 

नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने 'भूमी अदालतीचे' आयोजन मंगळवार 30 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत होणार आहे. अदालतीचे ठिकाण जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे राहील. संबंधित नागरिक आणि अपीलकर्त्यांनी सुनावणीच्या दिवशी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे. जेणेकरून प्रकरणांचा योग्य आणि अंतिम निपटारा करणे सोपे होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती सिमा देशमुख यांनी केले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधी"सेवा पंधरवडा" साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने प्रलंबित भूमी अभिलेख प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याच्या उद्देशाने विशेष 'भूमी अदालतीचे' आयोजन केले आहे. या भूमी अदालतीमध्ये जिल्ह्यातील प्रलंबित अपील प्रकरणांवर सुनावणी घेऊन त्यांचा जलदगतीने निकाल लावण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी संबंधित अपीलार्थी आणि उत्तराथी (प्रतिवादी) यांना सुनावणी बाबत सुचना देण्यात आल्या असून सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. संबंधित नागरीक व अपीलार्थी आणि उत्तराधी (प्रतिवादी) यांनी आपले प्रकरणाचे संपुर्ण अभिलेखासह हजर राहूण प्रकरणाचा निपटारा करून घ्यावा. या उपक्रमामुळे नागरिकांना पारदर्शक आणि जलद न्याय मिळेल तसेच त्यांचा वेळ आणि संसाधने यांची बचत होण्यास मदत होईल, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

0000

वृत्त क्रमांक 1007 

केवायसी व प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेच्या

प्रतिसादासाठी ग्रामपंचायत पातळीवर महामेळावा संपन्न 

नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- नांदेड जिल्ह्यातील नायगाव व हदगाव येथे नुकतेच 18 सप्टेंबर रोजी विशेषवित्तीय साक्षरता मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यावतीने करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व पात्र बँक ग्राहकांनी प्रधानमंत्री जनधन खाते उघडावे तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यात सहभागी व्हावे. आपले बँक खात्याचे री-के वायसी व नामांकन करण्यासाठी आपल्या बँक शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. 

या मेळाव्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदिप कुमार हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथि म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक अनिरुद्ध चौधरी, आयडीबीआय बँकेचे सरव्यवस्थापक पुनीत गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार देशभरात जनधन योजनेला दहा वर्षे झाले आहेत. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर जनधन बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यांचे 100 टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत जन सुरक्षा योजनांचे लाभ पोहचले पाहिजेत तसेच नामांकन सुविधा व री-केवायसी या मुख्य उद्देशाने या ग्रामपंचायत पातळीवरील मेळव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. 

या अभियानाचा भाग म्हणून 18 सप्टेंबर रोजी नायगाव व हदगाव येथे ग्राहक मेळावा व रीकेवायसी कॅम्पचे आयोजन सर्व बँकांनी मिळून केले होते. या कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी बँक खाते व त्याचे महत्व उपस्थित लाभार्थ्यााना समजून संगितले तसेच या मेळाव्याबाबतची भारतीय रिझर्व बँकेची भूमिका विषद केली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी सायबर सिक्युरिटी व ऑनलाईन बँकिंग करताना घ्यावयाची काळजी याबाबत विश्लेषण केले. तसेच स्टेट बँकेचे सरव्यवस्थापक यांनी नामांकन सुविधा व रूपे कार्ड याचे महत्व सांगितले. 

या मेळाव्याच्या आयोजनात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण बँकेच्या नांदेड विभागात 65 शाखा असून नांदेडमध्ये असलेल्या 236 बँकमित्र (Business Correspondent) यांच्या मार्फत या मेळाव्याच्या निमित्ताने एक आठवड्यापासून अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रत्येक शाखेने व बीसी यांनी ग्रामपंचायत स्तरावर मेळावे आयोजित केले व त्यामधून री-केवायसी व प्रधानमंत्री सुरक्षा योजनाची माहिती गावागावातील खातेदारांना दिली गेली. नांदेड जिल्ह्यात ग्रामीण बँकेचे एकूण 4.26 लाख खाते री-केवायसीसाठी पात्र होते. या एकाच दिवशी 24007 बँक खात्याचे री-केवायसी रिझर्व बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संदीप कुमार यांचा मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले तर मागील आठ दिवसात मिळून 33,340 री-के वाय सी चे काम पूर्ण केले गेले त्यामुळे असे एकूण 1,11,998 रीकेवायसी ग्रामीण बँकेने पूर्ण केले आहे. 

नांदेड जिल्ह्यात भारतीय रिजर्व बँकेचे वरिष्ठ अधिकारी येऊन जन धन बँक खाते व त्याला उपलब्ध असलेल्या सामाजिक सुरक्षा योजना यांची माहिती सांगतात. याबाबतीत बँक ग्राहकामधून जनजागृतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी राहिली आहे. या मेळाव्यानंतर देखील संदीपकुमार यांनी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी उपस्थित ग्राहकांच्या शंकाचे समाधान केले. या मुळे खऱ्या अर्थाने बँक आपल्या दरी आल्याची भावना ग्राहकांमध्ये दिसून आली. 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक व नियोजन वित्तीय समावेशन विभाग प्रमुख संतोष प्रभावती, भारतीय रिजर्व बँकेचे नांदेड जिल्ह्याचे लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर अरुण बाबू यांनी मार्गदर्शन केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी लीड बँक मॅनेजर सोनकांबळे, विभागीय व्यवस्थापक नरेंद्र खत्री, सहाय्यक विभागीय व्यवस्थापक प्रशांत राठोड यांनी परिश्रम घेतले. शाखा व्यवस्थापक सर्वश्री राजेश मंडलिक, आनंद मुनेश्वर, चन्द्रशेखर वनखेडे, दिपंकर पाटील, आशुतोष कांबळे, अजिंक्य देशमुख, भारत नाईक, मानव कांबळे, महादेव पावणे इ. यांनी मदत केली.

0000

वृत्त क्रमांक 1006  

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या

पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन   

नांदेड, दि. 24 सप्टेंबर :- जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांनी वेबपोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in वर प्रत्यक्षात ई-केवायसीची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने शासन अधिसुचनेनुसार, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमुद केले आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ईकेवायसी ekyc करावयाचे आहे. 

लाडकी बहीण या योजनेचे त्याअनुषंगाने मुख्यमंत्री-माझी वेब पोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in या वर सदरची e-KYC ची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे. ही प्रक्रिया मोबाईल वरुनही सोप्या पध्दतीने करता येते. सदर प्रक्रिया अत्यंत सोपी असून सहज व सुलभ असून महिला स्वतःचे मोबाईलवरूनही ही प्रक्रीया पुर्ण करु शकतील अशी प्रणाली शासनाने विकसित केली आहे. 

त्यानुसार या वेब पोर्टलवर स्वतः लाभार्थ्यांना प्रत्यक्षात e-KYC बाबत करावयाची कार्यवाहीची सविस्तर तपशिल यासोबत देण्यात आला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीनी e-KYC चालू अर्थिक वर्षात संबंधित महाराष्ट्र शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 या दिनांकापासुन 2 महिन्यांच्या आत पुर्ण करणे बंधनकारक आहे. या कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी Aadhar Authentication केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी. 

या योजने अंतर्गत दरवर्षी जुन महिन्यापासुन 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक राहील. अशा सुचना शासन परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 अन्वये शासनाने दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचे परिपत्रक 18 सप्टेंबर 2025 मधील निर्देशानुसार मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांनी माहितीच्या फ्लोचार्ट नुसार वेब पोर्टल वर http://ladakibahin.maharashtra.gov.in या वर प्रत्यक्षात e-KYC बाबत कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 

वृत्त क्रमांक 1005

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड 

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज घेणार आढावा

नांदेड दि. 24  सप्टेंबर :-राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री  संजय राठोड हे उद्या 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अधीक्षक अभियंता सां.बा. नांदेड परिमंडळ, अधीक्षक अभियंता महावितरण नांदेड परिमंडळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद कृषी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी महसूल, कार्यकारी अभियंता, सां.बां विभाग नांदेड, कार्यकारी अभियंता महावितरण नांदेड, कार्यकारी अभियंता जलसंपदा नांदेड, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, नांदेड, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, सर्व तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, विषयाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधित अधिकारी यांनी या बैठकीस आवश्यक त्या माहितीसह उपस्थित राहावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक 1004

नांदेड जिल्ह्यासाठी 24 ते 26 सप्टेंबर या तीन दिवस यलो

तर 27 सप्टेंबर रोजी ऑरेज अलर्ट जारी

नांदेड दि. 24  सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २४ सप्टेंबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २४, २५ व २६ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. तर २७ सप्टेंबर या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. २४ व २५ सप्टेंबर २०२५ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. 

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.  तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

वृत्त क्रमांक 1003

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृहात

अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 नांदेड दि. 24  सप्टेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त 16 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींचे https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 सप्टेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन भरावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड, बिलोली, धर्माबाद मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड, मुखेड, देगलूर,गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, नायगांव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर, हदगांव, उमरी असे एकूण 16 शासकीय वसतिगृहांचा समावेश आहे. या शासकीय वसतिगृहात निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तेव्हा गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरून त्याची प्रिंट काढून एक प्रत  संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत.

000000

वृत्त क्रमांक 1002

वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा 

- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत

नांदेड दि. 24  सप्टेंबर :- कृषि यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील वैयक्तीक लाभधारकांना प्राधान्याने 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सादर करावा. अर्ज करताना शेतकऱ्यांनी आपली जात प्रमाणपत्र , फार्मर आयडी, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत.

जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या या संधीचा लाभ घेवून कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनक्षमता वाढवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...