Sunday, September 14, 2025

 वृत्त क्रमांक 958

नांदेड शहरातील विविध कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश  

नांदेड, दि. 14 सप्टेंबर :- जिल्ह्यात 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने शासकीय ध्वजारोहण समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी या काळात कोणताही अनुचित प्रकार घडु नये या दृष्टीकोनातुन नांदेड शहरातील विविध कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहे.  पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी सायं 6 वाजेपासून  ते दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड परिसर, महानगरपालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिल कार्यालय नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-महात्मा गांधी पुतळा परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय तथा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, वजिराबाद नांदेड व परिसर तसेच माता गुजरीजी विसावा उद्यान, शिवाजीनगर नांदेड परीसर आयटीआय चौक ते आण्णाभाऊ साठे चौक, कुसुम सभागृह ते रेल्वेस्टेशन जाणारे रोड, 26 नंबर रोड, शासकीय विश्रामगृह ते एसटी ओव्हर ब्रिज जाणारे रोड या परीसरात शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहीता- 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी सायं 6 वाजेपासून  ते 17 सप्टेंबर 2025 रोजीचे 24 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. 

संबंधीतावर नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता- 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आले आहे.  

0000

वृत्त क्रमांक 957

रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा दौरा 

नांदेड, दि. 14 सप्टेंबर :- राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे सोमवार 15 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून माहूर तालुक्यातील माहूरगडकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वा. शक्तीपीठ रेणुकामाता मंदिर माहूरगड येथे आगमन व दर्शन. दुपारी 12.30 वा. माहूरगड येथून नाशिककडे प्रयाण करतील.  

00000

 वृत्त क्रमांक 956

अश्लील संदेश प्रकरण; जिल्हा परिषदेचा वस्तुस्थितीवरील खुलासा

नांदेड, दि. 14 सप्टेंबर : मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई या मथळ्याखाली काही माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेने खुलासा केला आहे.

सदर आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, निलंबित अधिकाऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. मात्र काही माध्यमांमध्ये कोणताही अधिकृत आधार नसताना वेगळ्या प्रकारे व वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्या प्रकाशित झाल्या.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व  सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी याबाबत स्पष्ट केले की, ही संपूर्ण बाब प्रशासकीय स्वरूपाची आहे. अशा बाबींवर अनधिकृत व आधारहीन बातम्या माध्यमांनी प्रकाशित करू नयेत. माध्यम प्रतिनिधींनी अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, असे त्यांनी आवाहन केले.

दरम्यान, या संदर्भात युट्युब चॅनेलवर प्रकाशित झालेल्या बातम्या त्वरित डिलीट कराव्यात, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

०००००

  वृत्त क्रमांक 955

“सेवा पंधरवाडा” अंमलबजावणीसाठी नांदेड तहसील कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

नांदेड, दि. 14 सप्टेंबर : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत या कालावधीत संपूर्ण राज्यात “सेवा पंधरवाडा” मोठ्या उत्साहात राबविण्यात येणार आहे. याच तयारीचा भाग म्हणून तहसील कार्यालय नांदेड येथे 11 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

ही बैठक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी तहसीलदार संजय वारकड विशेष उपस्थित होते. बैठकीस नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार,  सुनील माचेवाड,देवीदास जाधव, सहाय्यक महसुल अधिकारी , महसूल सहाय्यक व्यंकटी मुंडे, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या आदेशानुसार “सेवा पंधरवाडा” तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे –

1️⃣ पहिला टप्पा (17 ते 22 सप्टेंबर) – पाणंद रस्ते विषयक मोहिम : गावांमधील पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच संमतीपत्रे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

2️⃣ दुसरा टप्पा (23 ते 27 सप्टेंबर) – ‘सर्वासाठी घरे’ उपक्रम : या उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप, अनधिकृत बांधकामांचे नियमन आणि निवासी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे.

3️⃣ तिसरा टप्पा (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर) – नाविन्यपूर्ण उपक्रम : यामध्ये माननीय जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी निश्चित केल्याप्रमाणे खालील तीन कामांचा यामध्ये समावेश आहे. गाव तिथे स्मशानभूमी, शासकीय जमिनी व गायरान याला जिओ फेनसिंग करणे, तक्रार निवारणाच्या अनुषंगाने  व्हाट्सअप चॅटबॉट तयार करून तक्रारीचे तात्काळ निवारण करणे  इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असून, गावकऱ्यांना थेट फायदा होईल अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की, “सेवा पंधरवाडा हा केवळ एक उपक्रम नसून तो लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक आहे. प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यामध्ये जबाबदारीने सहभाग घेतल्यास लोकांना थेट न्याय व सुविधा मिळतील.”

तसेच तहसीलदार संजय वारकड यांनी स्पष्ट केले की, “गावपातळीवर जनतेपर्यंत प्रशासन पोहोचवणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. सर्वांनी समन्वयाने काम करून या उपक्रमाला तालुक्यात आदर्श ठरवावे.”

तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी निर्धार

बैठकीत सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांनीही एकमताने सहभागाची तयारी दर्शवली. “गावोगावी उपक्रम राबविताना लोकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देऊ,” असा निर्धार यावेळी करण्यात आला.

प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा

“सेवा पंधरवाडा”मुळे ग्रामीण भागातील प्रलंबित प्रकरणांना गती मिळणार असून, लोकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. प्रशासन व ग्रामपातळीवरील कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी होणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

०००००




 वृत्त 

राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक - सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

▪️'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने पत्रकारांना सन्मानित करण्याचा निर्णय लवकरच

छत्रपती संभाजीनगर, दि. १३ : सामाजिक न्याय विभाग हा समाजातील तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेला शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाने हाती घेतलेल्या समाज हिताच्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोनदिवसीय बैठकीचे उद्घाटन आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क संचालक (वृत्त - जनसंपर्क) तथा समितीचे सदस्य सचिव किशोर गांगुर्डे, राज्य समितीचे सदस्य आणि विभागीय माहिती उपसंचालक उपस्थित होते. 

लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चांगले काम जनतेपर्यंत पोहोचवणे आणि चुकीच्या गोष्टींना आरसा दाखवणे, हे काम प्रसारमाध्यमे करतात. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. या विभागामार्फत राज्यात नवीन १२० वसतिगृहे उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत ४८ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. समाजातील विषमतेची दरी कमी करून सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसोबत एकत्रित प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होईल, असा उद्देश असल्याचे पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

सामाजिक न्याय  विभागामार्फत समाजकल्याणासाठी सकारात्मक बदल घडविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि वंचित घटकांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सकारात्मक साथ द्यावी, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. समाज कल्याण क्षेत्रात, विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यापुढे या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनाही या पुरस्काराने गौरवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

योजनांच्या अंमलबजावणीत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची: मंत्री अतुल सावे

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अशी प्रसारमाध्यमांची ओळख आहे. आजही समाजाला दिशा देण्याचे आणि शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रसारमाध्यमे करतात. योजनांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया मांडणे आणि आवश्यक बदल सुचवणे यातही प्रसारमाध्यमांची भूमिका मोलाची आहे. त्यामुळे शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रसारमाध्यमांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी माहिती दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत पत्रकारांचा सहभाग घ्यावा: यदु जोशी

सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग समाजातील मोठ्या घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. शासनाच्या प्रतिमानिर्मितीत या विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या विभागांच्या योजनांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी विभागीय स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करून त्यात पत्रकारांचा सहभाग घेतल्यास योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, असे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी सांगितले. तसेच, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही बळकट झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञानाचे चांगले बदल तसेच काही दुष्परिणामही दिसत आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी समाजाला मार्गदर्शन करून येणाऱ्या आव्हानांची जाणीव करून द्यावी, असे मत आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमांमुळे प्रशासकीय कामकाजात सकारात्मक बदल घडतात, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी नमूद केले. तसेच, हुंडाबळी, बालविवाह, गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूण हत्या यासारख्या चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

प्रारंभी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक किशोर गांगुर्डे यांनी प्रास्ताविकात बैठकीच्या आयोजनाची भूमिका विशद केली आणि पत्रकारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉ. माधव सावरगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले.

**









13.9.2025

वृत्त क्रमांक 954

स्वस्थनारी सशक्त परिवार अभियाना अंतर्गत होणार महिलांची आरोग्य विषयक तपासणी

१७ सप्टेंबर रोजी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार अभियानाचे उद्घाटन

नांदेड,दि.१३ सप्टेंबर:-‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये स्तरावर आयोजित केले जाणार आहे.

ज्यामध्ये महिला आणि मुलांच्या विशिष्ट आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाईल.  १७ सप्टेंबर रोजी या अभियानाचा उदघाटन सोहळा हा राष्ट्रीय स्तरावर इंदोर मध्यप्रदेश येथे ऑनलाइन पद्धतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

त्यानुषंगाने त्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय श्याम नगर, नांदेड येथे या अभियानाचे प्रातिनिधिक स्वरूपातील उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार आहे. 

या अभियान कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत ठराविक तारखेस महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.  

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' अंतर्गत मधुमेह, रक्तदाब, कर्करोग तपासणी, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, किशोरवयीन मुलींच्या तपासणी, क्षयरोग तपासणी, रक्तदान शिबिरे, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या आरोग्य शिबिर तपासणीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी, किशोरवयीन मुलींनी व गरजू व जनसामान्य नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. 

०००००००

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...