Friday, September 12, 2025

 वृत्त

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यता

 आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील 

मुंबई, दि. १२ :  राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून या बाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. 

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे ही मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद  जाधव-पाटील यांनी व्यक्त केला. 

ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ३७ लाख ४० हजार रुपये तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून २०२५  ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले. 

जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यातील ९८० बाधित शेतकऱ्यांच्या ५५.६५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५६० शेतकऱ्यांच्या ७१.५४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ९६ हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३५ शेतकऱ्यांच्या ५०.६४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ६३ हजार रुपये असे १ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या १७७.८३ हेक्टरवरील  बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून ३७  लाख ४० हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. 

विभागीय आयुक्त नागपूर यांनी पाठवल्या २१ जुलै २०२५ च्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यात जून २०२५ मध्ये १ बाधित शेतकऱ्याच्या  ०.४० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९ हजार रुपये तर  जुलै २०२५ मधील नुकसानीच्या मदतीसाठी १८ ऑगस्ट २०२५ रोजी पाठविलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील ७ हजार ४५० शेतकऱ्यांच्या ४५५९.६२ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३९२.८३ लाख रुपये. वर्धा जिल्ह्यात जून  २०२५ मध्ये ८२१ शेतकऱ्यांच्या  ४८५.८० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४१.५४ लाख, तर जुलै २०२५ मधील नुकसानीच्या मदतीसाठी २ हजार ८२७ शेतकऱ्यांच्या  २२२४.९१ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १८९.२२ लाख, चंद्रपूर जिल्ह्यात जून व जुलै २०२५ मधील नुकसानीच्या मदतीसाठी १३ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या ८६२१.०६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७३३.०० लाखाच्या मदतीचा समावेश आहे. 

विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यात जुलै २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी  मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ३९६ शेतकऱ्यांच्या  २१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १८.२८ लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे. 

विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात जुलै २०२५ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार ५९ हजार ११० शेतकऱ्यांच्या  ५६ हजार ९६१.७३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५९७९.१७ लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

००००

वृत्त क्रमांक 954

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन  

नांदेड, दि. 12 सप्टेंबर :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 953

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या 

राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून मिळणार माफक दरात सेवा

नांदेड, दि. 12 सप्टेंबर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी (CSC) केंद्रामधून कॉमन सर्विस सेंटर महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार एमओयू (MOU) महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व सीएससी (CSC) केंद्राचे प्रमुख वैभव देशपांडे याच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. 

या करारानुसार, अण्णासाहेब पाटील आर्थिकमागास विकास महामंडळाचे लाभार्थी आता त्याच्या जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्रावर जाऊन महामंडळाच्या योजनांचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, योजनेची सद्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. सीएससी (CSC) केंद्र हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध सरकारी आणि खासगी सेवा पुरवण्याचे महत्वाचे माध्यम आहे. महामंडळाने सीएससी (CSC) केंद्रासमवेत केलेल्या करारामुळे महामंडळाच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल. 

महामंडळाचे अध्यक्ष म्हणाले, "याकरारामुळे आमची उद्दिष्टे अधिक प्रभावीपणे पूर्ण होतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गरजू आणि पात्र तरुणापर्यंत महामंडळाच्या योजना पोचणार आहेत. कमी खर्चात आणि त्यांच्या घराजवळच त्यांना आवश्यक सेवा मिळाल्यामुळे त्यांना स्वंयरोजगारासाठी प्रोत्साहित करुन मराठा समाजातील तरुणांना उद्योजक करण्याचे महामंडळाचा उद्देश पुर्णत्वास नेणे सोपे होईल. 

"राज्यामध्ये सीएसी (CSC) चे 72 हजारपेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभाथ्यांना त्याच्या गावातूनच पात्रता प्रमाणपत्र (LOI) कागदपत्र, बँकेचे कर्ज मंजुरी (Bank sanction) बँकेचा हप्ता (bank statement) अपलोड करण्यासाठी प्रत्येकी 70 रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. या करारामुळे लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे  आणि त्यांना जिल्ह्याच्या विकाणी जाण्याची गरज लागणार नाही. ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळेल." यामुळे सद्यस्थितीत महामंडळाच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैसे उकलणाऱ्या अनधिकृत एजंट लोकांना आळा घालणे शक्य होईल. भविष्यात लाभार्थ्यांसाठी महामंडळाचे मोबाईल अॅप व चॅट बॉट सारख्या सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नवीन उपक्रमामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि किफायतशीर होईल असे मत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी व्यक्त केले.

00000

 वृत्त क्रमांक 952

१३ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी 

नांदेड दि. १२ सप्टेंबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी  १२ सप्टेंबर २०२५ रोजी  दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १३ सप्टेंबर २०२५ या एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 

तसेच १२, १४, १५, १६ सप्टेंबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे.  १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा व १२ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा तसेच दि. १४,१५, व १६ सप्टेंबर २०२५ हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. 

या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

या गोष्टी करा :

१)विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२)आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३)आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४)तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५)पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१)आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२)विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३)उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४)धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५)जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

वृत्त क्रमांक 951 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडाचे आयोजन 

नांदेड, दि. 12 सप्टेंबर :- महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा प्रभावीपणे राबविला जाणार आहे.  हा उपक्रम मोहिम स्वरुपात तीन टप्यात महसूल विभागाकडून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

पहिला टप्पा  17 ते 22 सप्टेंबर

या कालावधीमध्ये पाणंद / शिवरस्त्यांना क्रमांक देण्याबाबतच्या महसूल विभागाच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे. अमरावती जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या समन्वयातून पाणंद रस्ते मेंपिंगचा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही करणे तसेच या मोहिमेत याव्यतिरिक्त पुढील नमूद बाबींवरही कार्यवाही करण्यात येणार आहे. शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे. ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे. शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमती पत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे. शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे याबाबींचा समावेश आहे. 

दुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर

सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करणे. "सर्वासाठी घरे" या उपक्रमातंर्गत घरे बांधण्यासाठी निर्बाध्यरित्या पाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे. या उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणे, (In Situ regulerisation of encroachment). महसूल विभाग शासन निर्णय 14 डिसेंबर 1998 मधील तरतुदीनुसार आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करुन त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण  नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे. 

पात्र लाभार्थ्यांना पटे वाटप मोहिमेत सर्वांसाठी घरे या योजनेतंर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या / अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे बाटप करणे. खाजगी मिळकतधारकांना पट्टे वाटप करणे. रहिवासी प्रयोजनासाठी शासकीय जमिनी प्रदान केलेले मिळकतधारक. शासकीय जमिनीवरील घरांसाठीची अतिक्रमणे नियमानुकूल केलेले मिळकतदार. 

तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर

नाविन्यपूर्ण उपक्रमात या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अधिकाधिक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात पुढील तीन नाविन्यपुर्न उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मशान भुमिसाठी आवश्यक जमीनी प्रदान करण्याची कार्यवाही करणे. Land bank अंतर्गत KML फाईल तयार करुन जीआयएस GIS द्वारे नकाशावर स्थापीत करणे. (Geo Fencing). व्हॉटसॲपद्वारे प्राप्त तक्रारी संकलित करुन तक्रारीचे निवारण करणे. 

याप्रमाणे 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत "सेवा पंधरवाडा" साजरा करण्याचा उपक्रम मोहिम स्वरुपात महसूल विभागाकडुन जिल्हयात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000


नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

मुंबई, दि. १२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.

या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदानसल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्येतालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाववस्तीतांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग

या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभागमहानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालयेमहात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनामुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी होणार आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी मोठा दिलासा

नेत्ररोग उपचाराचा खर्च गरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्धशेतकरीमजूरमहिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे.

या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यामुळे लाखो रूग्णांवर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत.  या शिबिराचा लाभ राज्यातील गरजू रूग्णांनी घ्यावाअसे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

0000

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...