Tuesday, September 2, 2025

 वृत्त क्रमांक 931 

हवामान खात्याचा इशारा

पावसाचा यलो अलर्ट जारी 

नांदेड, दि. 2 सप्टेंबर :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 2 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट व 3 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. 2 सप्टेंबर  रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा व 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका:

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 930

 

अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकपत्नीपाल्यांचा विशेष गौरव

 

प्रस्ताव 15 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याची मुदत

 

नांदेडदि. सप्टेंबर :- विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकपत्नी त्यांचे पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठीचे प्रस्ताव सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. सन 2024-25 या वर्षासाठी कल्याणकारी निधीतून विशेष गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील कामगिरी नुसार दिले जाणार आहेत.

 

या पुरस्कारात इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्के व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू. साहित्यसंगीतगायनवादननृत्य इ. क्षेत्रातील राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीयजिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी (विद्यापीठात प्रथम / IIT, IIM, AIIMS मध्ये प्रवेश प्राप्त व्यक्ती). यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे उद्योजक यांचा समावेश राहील.

 

वरील नमूद क्षेत्रात विशेष गौरव पुरस्कारसाठी प्रस्तावअर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रे व शिफारशीसह सोमवार 15 सप्टेंबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे जमा करावीत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. विहित अर्ज ठराविक दिनांकापर्यंत संचालक सैनिक कल्याण विभाग पुणे यांना सादर करणे अनिवार्य आहेत. अधिक माहितीसाठी कल्याण संघटक व लिपिक (मोबाईल नंबर 8698738998, 8707608283) यांच्याशी संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000


 

वृत्त क्रमांक 929

स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी 

नांदेड, दि. सप्टेंबर :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यरत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी शर्तीची पुर्तता करुन अर्जदारांनी विह‍ित नमुन्यात आपला अर्ज परिपूर्ण भरुन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडुन स्वत: मंजुर करुन घेणे आवश्यक आहे. प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्व:हिस्सा कर्ज खात्यात जमा करणे  बंधनकारक राहील. प्रकल्प किंमतीच्या 15 टक्के मार्जिन मनी (Subsidy) कर्ज खात्यात शासनाकडून एनईएफटी/आरटीजीएसद्वारे जमा करण्यात येते. ज्या प्रकल्पासाठी या योजनेचा लाभ घेण्यात आला आहे, त्याच प्रकल्पावर सदरची रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे.

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील सुशिक्षित बेरोजगार यांच्याकडुन सन 2025-26 या आर्थ‍िक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचा ऑफलॉईन अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सुशिक्षीत बेरोजगारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 3535 

गणेशोत्सव : राज्य उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन

 

मुंबईदि. 2 : राज्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवास 2025 पासून राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य उत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे'चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा व राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रभरातील ४०४ मंडळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून स्पर्धेचे परीक्षण सहभागी तालुक्यांत सुरू आहे.

 

राज्योत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरलेले घरगुती व सार्वजनिक गणपती बाप्पांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील लोकांसाठी व मंडळांसाठी विशेष आकर्षण ठरले आहेत. या पोर्टलद्वारे मोठ्या संख्येने भाविक आपल्या गणपती बाप्पांची छायाचित्रे सर्व गणेशभक्तांच्या दर्शनासाठी अपलोड करत आहेत. या पोर्टलद्वारे आजवर २०० हून अधिक जणांनी आपल्या घरच्या व ७० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी फोटो अपलोड केले आहेत. घरोघरीच्या बाप्पांचे दर्शन व सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घरबसल्या घेणे यामुळे सर्व गणेशभक्तांना शक्य झाले आहे.

 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे थेट दर्शन जगभरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेयाकरिता सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला देखील गणेशभक्तांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. या पोर्टलमुळे प्रामुख्याने मुंबईचा लालबागचा राजामुंबईचा राजाखेतवाडीचा गणराजपुण्याचा दगडूशेठ हलवाईप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शनअष्टविनायकांचे व टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एकाच क्लिकवर उपलब्ध झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या विविध जिल्ह्यातील व शहरातील गणपतींचे अतिशय सुलभ दर्शन होत आहे.

 

या उदंड प्रतिसादाबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी भाविकांचे आभार मानत इतरांनीही ganeshotsav.pldmak.co.in या पोर्टलवर त्वरित छायाचित्रे पाठवून या राज्य उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

****

संजय ओरके/विसंअ/

वृत्त क्रमांक 928 

डिजेमुक्त पर्यावरणपूरक उत्सव साजरे करून  

नांदेडची नवी ओळख निर्माण करू या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

  • डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाचा सन्मानपत्र देऊन गौरव   

नांदेड, दि. 2 सप्टेंबर :- जिल्ह्यात श्री गणेशोत्सव उत्सवात शांततेने आनंदाने साजरा करतांना तो पर्यावरणपूरक डिजेमुक्त म्हणून आपण साजरा करत आहोत. या उपक्रमातून नांदेड जिल्ह्याची चांगली नवी ओळख निर्माण करू या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.     

जिल्ह्यात श्री गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध गणेश मंडळाचा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील जवळपास 250 गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आदींची उपस्थिती होती. 

सण उत्सव आनंदाने साजरा करतांना डिजे वाजवल्याने त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागतात. या आवाजामुळे हृदयावर वाईट परिणाम होतात. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील 250 गणेश मंडळांनी स्वत: पुढे येऊन डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे हमीपत्र दिले आहे. ही बाब कौतूकास्पद असून प्रत्येक सण उत्सवासाठी हा नवा आदर्श राहील, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चांगली शिस्त लावली आहे. समाजात नागरिकांनी स्वत: स्वयंशिस्तीने पुढे आल्यास सर्वांचे जीवन चांगले सोपे होईल. प्रत्येक ठिकाणी कायदाचा वापर न करता सहकार्यातून अनेक चांगल्या गोष्टी उपक्रम आपण राबवू शकतो. हे यातून दिसून येते. गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले.       

न्यायालयाच्या सुचनेनुसार आपण डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे चांगले नियोजन केले आहे. त्याबद्दल सर्व गणेश मंडळाचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले. नांदेड जिल्ह्यात उत्सव काळात शांतता राखून उत्तम नियोजन राखले जाते. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या नियोजनात आपला सहभाग असल्याने आम्हाला चांगले नियोजन करता येते. उत्सव सण काळात डिजेचा वापर न करता पर्यावरणपूरक उत्सव साजरे करुन चांगला आदर्श निर्माण करू शकतो. उत्सव काळात गणेश मंडळांना दिलेल्या सुचनेचे योग्य पालन करा. विसर्जन काळात रस्ता मार्गात बदल करू नका. वेळेचे बंधन पाळा. सर्व धर्मांचा आदर करून सण, उत्सव शांततापूर्वक आपण साजरे करु या, असे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार केले.   

प्रस्ताविकात अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी उत्सव काळाता शांतता आबाधित राखण्यासाठी समाजाचा खूप मोठा हातभार असतो. डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाचा पोलीस दलामार्फत स्वागत करण्यात आले आहे. जे डिजे वाजवतील त्यांच्यावर पोलीस दलामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

00000







    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...