Monday, August 25, 2025

 वृत्त क्रमांक 900

२५,२६ व २८ ऑगस्ट या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट

हवामान विभागाचा इशारा 

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.  २५,२६ व २८ ऑगस्ट २०२५ या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहान जिल्हा प्रशासनाने केले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

या गोष्टी करा :

१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

३) आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

४) तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

१) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

२) विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

४) धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

०००००

वृत्त क्रमांक 899

गवंडी व बेलदार शिष्टमंडळाच्या मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करा

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न

नांदेड दि. 25 ऑगस्ट :- नांदेड जिल्ह्यात गवंडी व बेलदार या जातीच्या समकक्षतेबाबत त्या समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या मांडल्या. सदर मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी दिल्या. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी नांदेड जिल्ह्यातील गवंडी, बेलदार या जाती संदर्भात  बैठक सुनावणी व कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, भोकर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, हदगाव उपविभागीय अधिकारी अविनाश काबंळे, कंधार उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, बिलोली उपविभागीय अधिकारी के.के. डोंम्बे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, अध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, संबंधित विभागाचे अधिकारी, बेलदार समाजाचे शिष्टमंडळाचे अध्यक्ष व सदस्यांची उपस्थिती होती. 

गवंडी व बेलदार हे दोन्ही समाज समकक्ष आहेत का ? या सर्व बाबींची पडताळणी करुन उपविभागीय अधिकारी यांनी तसा अहवाल मागासवर्ग आयोगास सादर करावा, असे निर्देश आयोगाचे सदस्यांनी दिले. यावेळी मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी ओबीसी, एसबीसी, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसीबीसी, ईडब्लुएस, मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितणाबाबत आढावा घेतला. सध्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीया सुरू असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र पडताळणीमुळे त्यांना अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी जात पडताळणी समितीने घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बेलदार व गवंडी समाजाच्या शिष्टमंडळानी  आयोगाचे सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्याकडे मांडल्या. 

00000









    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...