Wednesday, July 23, 2025

 वृत्त क्र. 758 

जन्मजात दुभंगलेले ओठ, टाळू शस्त्रक्रियेसाठी अकोला येथे 9 बालकांवर होणार शस्त्रक्रिया

 

·         राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 18 बालकांची तपासणी

 

नांदेड दि. 23 जुलै :- राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्याने बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आज श्री गुरुगोबिदसिघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या नेतृत्त्वाखाली जन्मजात दुभंगलेले ओ व टाळूच्या शस्त्रक्रियेसाठी बालकांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील एकूण 18 बालकांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 9 बालकांची शस्त्रक्रिया श्रीराम हॉस्पिटल अकोला येथे करण्यात येणार आहे.  

 

या बालकांची तपासणी श्रीराम हॉस्पिटल अकोला येथील डॉ. मयूर अग्रवाल व डॉ. शब्बीर खान ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. नांदेड जिल्ह्यातील 45 आरोग्य पथकांद्वारे वर्षातून 2 वेळा अंगणवाडीतील व 1 वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 0 ते 18 या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब, आजार याचे निदान व उपचार करण्यात येतात. तसेच हृदयरोग तपासणी (2D ECHO), नेत्ररोग, आकडी, फेफरे याची मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते.

 

जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झाला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र स्त्री रुग्णालय श्यामनगर नांदेड येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो.  तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र अंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्मजात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया, औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.

 

सन 2024-25 या वर्षांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सदरील हॉस्पिटलमध्ये एकूण 42 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी RBSK जिल्हा कार्यक्रम समन्वयक अनिल कांबळे, DEIC व्यवस्थापक विठ्ठल तावडे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी व DEIC वैद्यकीय अधिकारी कर्मचारी  यांनी परिश्रम घेतले.

00000



 

वृत्त क्र. 757 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा : प्रा. डॉ. मंठाळकर

 

·   पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीची बैठक संपन्न  

 

नांदेड दि. 23 जुलै :- ज्येष्ठ विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य प्रा. डॉ. राम मंठाळकर यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव समितीची बैठक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय नांदेड येथे नुकतीच 19 जुलै रोजी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी राजेशकुमार गणवीर होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून अशासकीय सदस्य श्रीमती अंजली बाऱ्हाळे, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कृष्णा उमरीकर, श्री गुरुगोविंद सिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.

 

प्रा. डॉ. रामचंद्र मंठाळकर यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या गाजलेल्या 4 प्रमुख भाषणाचा तपशील देत या भाषणास 60 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेत राज्य व जिल्हा समित्या स्थापन केल्या आहेत. या समितीकडून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये विद्यापीठ, आयटीआय प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका आदी शिक्षण संस्थातून दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर विविध कार्यक्रम आयोजित करावेत असे नामनिर्देशित करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात ही आगामी काळात विविध स्पर्धा, भाषणे, व्याख्याने घेणार आहोत यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

 

सदस्या सौ. बाऱ्हाळे, कृष्णा उमरीकर यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले. प्राचार्य सचिन सूर्यवंशी यांनी ही जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आयटीआय व अन्य संस्थांमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय हीरक महोत्सव समितीकडून दिलेले सर्व कार्यक्रम राबवावेत असे आवाहन केले.

 

राजेशकुमार गणवीर यांनी ही मंत्री श्री. लोढा यांनी दिलेल्या निर्देशानुसार आम्ही सर्व संस्थांमध्ये विविध कार्यक्रम घेणार आहोत असे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य, शासकीय तंत्र प्रशाला केंद्रातील मुख्याध्यापक, अनुदानित व विनाअनुदानित अधिक दोन स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम व बायफोकल संस्थेचे प्राचार्य, सचिव, अध्यक्ष व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यातील सर्व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पोतदार यांनी केले.

00000






 वृत्त क्र. 756

जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वीमध्ये

प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी 29 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 23 जुलै :- शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर  ता. बिलोली  जि. नांदेड येथे इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 जुलै 2025 हा अंतिम दिनांक आहे. या प्रवेश परीक्षेसाठी पालक, विद्यार्थ्यांनी त्वरीत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय सुरु करण्यात आले आहे. या जवाहर नवोदय विद्यालयात गरजू व होतकरू हुशार, सर्व सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची निवड चाचणी प्रवेश परीक्षा द्वारे निवड करण्यात येते. अधिक माहितीसाठी 9926928732, 9977994732  क्रमांकावर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 755

शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता पिक विमा योजनेत सहभागी व्हावे

-  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत

नांदेड दि. 23 जुलै :-पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 असून यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न बघता पीकविमा योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2025 अंतर्गत पिक विमा भरणे चालू असून आज रोजीपर्यत 1 लाख 59 हजार 123 शेतकऱ्यांनी 2 लाख 98 हजार 502 विमा अर्ज दाखल केले आहेत. 1 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. पिक विमा नोंदीचा अंतिम दिनांक 31 जुलै 2025 आहे. मागील काही वर्षाचा अनुभव बघता पिकविमा नोंदणीची शेवटच्या हप्या अमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते. परिणामी पिकविमा पोर्टलवर प्रचंड ताण येऊन हळू होते किंवा पिक विमा भरतांना अडचणी येतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पिकविमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता आपले जवळचे ग्राहक सेवा केंद्रामध्ये, बँकेत किंवा स्वत: शेतकऱ्यांनी पिक विमा पोर्टलवर पिकविमा उतरवून घ्यावा. 

पिकविमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाते. तसेच फॉर्मर आयडी अनिवार्य असल्यामुळे सातबारा व आठ-अ या कागदपत्राची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी  विमा हप्याााव्यतिरिक्त ज्यादा रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केद्र चालकास देवू नये. तसेच ग्राहक सेवा केंद्रामध्ये सीएससी लॉगइन मधून पिकविमा नोंदणी करताना अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी पिक विमा पोर्टलवर शेतकरी लॉगइनमधून पिक विमा नोंदणी करावी. तसेच विमा कंपनीचा सुधारित टोल फ्री क्रमांक 14447 हा आहे. कृपया याची सर्व विमाधारकांनी नोंद घ्यावी, असे कृषी विभागाने प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

वृत्त क्र. 754

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

 नांदेड दि. 23 जुलै :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागात सन 2025-26 या द्वितीय सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी प्रशिक्षणार्थी 94 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व ॲटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्हयातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत ना. वडस्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

यात मेकॅनिक मोटर व्हेईकल -41, मेकॅनिक डिझेल- 32, शिट मेटल वर्क्स-8, ॲटो इलेक्ट्रीशीयन-5, मेकॅनिक रेफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंडीशनर-2, पेन्टर जनरल-2, वेल्डर गॅस ॲन्ड इलेक्ट्रीशन -2, टर्नर-2 अशी एकुण 94 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. (अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.) त्यासाठी आयटीआय उत्तीर्ण किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व ॲटो इंजिनियरिंग टेक्नीशियन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वत:चे रजिस्ट्रेशन करावे. व रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांनी एमएसआरटीसी विभागीय कार्यालय नांदेड या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करुन रा.प. महामंडळाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक राहील. हे छापील अर्ज आस्थापना शाखा, विभागीय कार्यालय, रा.प.नांदेड येथे 25 जुलै ते 14 ऑगस्ट 2025 पर्यत शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून 3 वाजेपर्यंत मिळतील व लगेच स्वीकारले जातील. या अर्जाची किंमत जीएसटीसह खुल्या प्रवगाकरीता 590 रुपये व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी जातीचा दाखला सादर केल्यास 295 रुपये आहे. ही शिकाऊ उमेदवारांची नेमणूक नांदेड जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे असे राज्य परिवहन मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

 00000

वृत्त क्र. 753

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी

शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यत मुदतवाढ 

नांदेड दि. 23 जुलै :-  राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 18 जुलै 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 1 ऑगस्ट 2025  पर्यत अंतिम मुदतवाढ दिली आहे. 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यासाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज लवकरात लवकर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्चपथ, पुणे-01 यांचेस्तरावर अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000

वृत्त क्र. 752

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 23 जुलै :- केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2025-26 अंतर्गत अ गट उत्पन्न निर्मितीच्या योजना क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजनाचे अर्ज 2 जून ते 15 जुलै 2025 पर्यत लाभार्थी लॉगीन मधून ऑनलाईन पध्दतीने https://nbtribal.in या संकेतस्थळावरुन मागविण्यात आले होते. तरी आता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी  31 जुलै 2025 पर्यत मुदतवाढ दिली आहे. 

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट जि. नांदेड या कार्यालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्हा असून संपूर्ण नांदेड जिल्या ातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गतच्या योजनांसाठी 31 जुलै 2025 पर्यत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी केले आहे. 

सन 2025-26 मधील न्युक्लिअस बजेट मंजूर योजनांची यादी पुढीलप्रमाणे आहे. 

अ-गट उत्पन्न निर्मितीच्या योजना 

•  85 टक्के अनुदानावर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी काटेरीतार व जाळीचे तार घेण्यासाठी अनुदानावर अर्थसहाय्य देणे. तसेच पोल व इतर अनुषंगिक खर्च डीबीटीद्वारे करणे.

* 100 टक्के अनुदानावर अदिम कोलाम जमातीच्या शेतकऱ्यांना वन्य जीवापासुन शेतीचे संरक्षण करण्यासाठी तारकुंपनासाठी काटेरीतार व जाळीचे तार घेण्यासाठी अनुदानावर अर्थसहाय्य देणे. तसेच पोल व इतर अनुषंगिक खर्च डीबीटीद्वारे करणे.

* अनुसूचित जमातीतील बांबु प्रोडक्ट प्रशिक्षण प्राप्त बेरोजगार युवक/युवती/महिलांना, बांबु कारागिरांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे. 

* अनुसूचित जमातीच्या महिलांना टु इन वन शिवनयंत्र घेण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे. 

* आदिम कोलाम जमातीच्या महिलांना टु इन वन शिवनयंत्र घेण्यासाठी 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

* अनुसूचित जमातीच्या दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

•अनुसूचित जमातीच्या बचतगट, समुहास फिरते फास्ट फुड सेंटरसाठी चारचाकी वाहनासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

* 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटास कागदापासून पत्रावळी प्लेट व द्रोण तयार करण्याचे मशीन डीबीटीद्वारे पुरविणे. 

* 85 टक्के अनुदानावर आदिवासी लाभार्थ्यांना मल्टीपर्पज पिठगिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे करणे. 

* 100 टक्के अनुदानावर आदिवासी लाभार्थ्यांना मल्टीपर्पज पिठगिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे करणे. 

•अनुसूचित जमातीच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना ब्युटी पार्लरचे दुकान लावण्यासाठी 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे. 

•100 टक्के अनुदानावर आदिम जमातीच्या कोलाम लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

* 85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

* अनुसूचित जमातीच्या महिला बचतगटास मिनी दाल मिल 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

* अनुसूचित जमातीच्या शेतकरी लाभार्थीना 85 टक्के अनुदानावर बांधावर उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करणेसाठी अर्थसहाय्य देणे विविध फळांचे झाड डीबीटीद्वारे देणे.

* 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटास दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अनुदानावर अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

* 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटास मालवाहक चारचाकी गाडी घेण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे करणे.

* 85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटास मंगल कार्यालयासाठी लागणारे साहित्य भांडी व मंडप साहित्य भाड्याने देणे हा व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य डीबीटीद्वारे देणे.

क गट- मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना

वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे. तरी सर्व अनुसूचित जमातीच्या सर्व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनांचा लाभ घ्यावा असे  आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 0000

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी !













 

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...