Monday, December 8, 2025

7.12.2025.

वृत्त 

स्वधर्म रक्षणाच्या बलिदानाचा गौरवशाली इतिहास सर्व घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवू -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मानवता, सत्य आणि धर्मरक्षा यासाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर होणाऱ्या आक्रमणाला थोपविले -  संत ज्ञानी हरनाम सिंग जी

नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन शिस्तीचे घडविले दर्शन

नागपूर, दि. ७ : भारतीय संस्कृतीवर, धर्मावर, विचारांवर आणि भाषेवर मुघलांनी अत्याचारांची परिसीमा गाठली. भारतीय संस्कृतीच संपविण्याचा मुघलांचा अट्टाहास होता. अशा कठीण प्रसंगी हिंद की चादर गुरु तेगबहादूर सिंग साहीबजी हे ढाल बनून पुढे आले. काश्मिरी पंडितांच्या संस्कृतीसह हिंदू धर्माचा पोत त्यांनी आपल्या बलिदानातून कायम राखला. स्वधर्माचे रक्षण व सहिष्णुता याचे प्रतीक असलेल्या श्री. गुरु तेग बहादूर सिंग साहीब यांच्या बलिदानाचा हा गौरवशाली इतिहास शालेय विद्यार्थ्यांसह प्रत्येकापर्यंत पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समारोहानिमित्त नागपुरात नारा येथील सुरेशचंद्र सुरी पटांगणावर आयोजित भव्य समारोहात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अल्पसंख्यांक विकास मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, श्री संत ज्ञानी हरनामसिंघ जी, पोहरादेवी येथील धर्मगुरु डॉ. बाबूसिंग महाराज, संत बाबा बलविंदरसिंग जी, बाबा सुखिंदरसिंग जी मान, रामसिंग जी महाराज, सुनील जी महाराज, क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष गुरमितसिंग खोकर, विजय सतबीरसिंग,  अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव जी ढोले, महेंद्र रायचुरा, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, या समारोहाचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

शीख समाजात विविधता आहे. सिकलीगर समाजाने शीख समाजाला हत्यारे तयार करून दिली. बंजारा समाजाने शीख समाजांच्या गुरुंप्रती व विचारांप्रती आपली कर्तव्यतत्परता जागृत ठेवली. एक ओमकार सतनाम यातील तत्वाप्रमाणे विविधतेतील एकात्मभाव लंगरच्या माध्यमातून सर्व समाजाने समाजमनावर बिंबवला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धर्मासाठी एवढे मोठे बलिदान जगाच्या पाठीवर कुठे आढळणार नाही. बलिदान देऊनही गुरुवाणीमध्ये मानवतेचे शब्द व मानवतेची प्रार्थना ही प्रत्येकाला भावनारी आहे. विशेषतः संत नामदेव महाराजांच्या असंख्य ओळी गुरुवाणीमध्ये समाविष्ट करून तेवढ्याच नम्रतेने त्यांना पुजले जाते, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

शीख समाजातील हा गौरवशाली इतिहास समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या दृष्टीने आम्ही नांदेड व नवी मुंबईत-खारगर येथे भव्य स्वरुपात कार्यक्रम घेऊन अभिवादन करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मानवता, सत्य आणि धर्मरक्षा यासाठी गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे -  नितीन गडकरी

मानवता, सत्य आणि धर्मरक्षेसाठी गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे योगदान सर्वांना ज्ञात आहे. भगवद्गगीतेमध्ये उधृत असलेले वचन गुरु तेगबहादूर साहिब यांनी धर्मसंरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाला पुन्हा प्रत्ययास आणून दिले आहे. जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्म हावी होईल-आक्रमण होईल, तेव्हा मी धावून येईल असे अभिवचन भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेमध्ये दिले होते, याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात करून दिली. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी मुघलांनी केलेले आक्रमण हे धर्म आणि संस्कृतीवरच होते. हे आक्रमण गुरु तेगबहादूर सिंग यांनी आपल्या बलिदानातून परतावून लावले. महाराष्ट्र शासनाने या भव्य आयोजनातून इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना व इतिहास या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पीढीपर्यंत पोहोचता केला. गुरु तेग बहादूर सिंग साहीब यांची प्रेरणा, कार्य आणि कर्तृत्व भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. गुरु श्री तेग बहादूर साहिबजी यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या राज्यभरातील भाविकांना एकत्र आणण्याचे कौतुकास्पद काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले असल्याचे श्री. गडकरी म्हणाले.

महाराष्ट्र व पंजाबने भारतीय संस्कृती व धर्मावर होणाऱ्या आक्रमणाला थोपविले

-  संत ज्ञानी हरनाम सिंग जी

ज्या देशाने सर्व विचारप्रवाहांचा, विविधतेचा, धर्म, जात, पंथांचा सन्मान केला, त्या आपल्या भारतावर मुघलांनी आक्रमण केले, प्रचंड अत्याचार केले. हिंदू धर्मातील सौहार्दतेला मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. श्री गुरु तेगबहादूर साहिब यांना धर्मरक्षणासाठी जे बलिदान द्यावे लागले, त्या शौर्याचे अभिवादन करताना मुघलांच्या क्रौयाला कदापि विसरता येणार नाही, असे प्रतिपादन संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी यावेळी बोलताना केले.

आपल्या धर्माचे पालन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धन, प्रलोभन व जबरदस्ती करून आपले अनुयायी निर्माण करणे, हे कोणत्याही धर्मात नाही. धर्मात बळजबरीला थारा नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारतीय संस्कृतीवर, येथील धर्मावर मुघलांनी जे आक्रमण केले, ते महाराष्ट्र आणि पंजाबने परतावून लावल्याने आजचा भारत आपण पहात आहोत, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्राची भूमी ही वीरांची आहे, संतांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन त्यांच्या शौर्यालाही अभिवादन केले. 

शीख समाजात अरदासची परंपरा आहे. अरदासच्या माध्यमातून भक्ती करणारे अनेक पंथ आहेत. यात बंजारा, शिकलकरी, सिंधी, लबाना, मोहयाल ही सारी एक आहेत. या समाजांना एकसंघ करून त्यांना न्याय देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याचे गौरवोद्गार आपल्या मनोगतात काढले. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी, सर्व मान्यवरांनी श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांना व सर्व गुरुंना वंदन केले. यावेळी विविध मान्यवर संत उपस्थित होते. 

नागपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देऊन शिस्तीचे घडविले दर्शन

हिंद की चादर समागमच्या निमित्ताने आज नारा येथील आयोजित कार्यक्रमास अभूतपूर्व प्रतिसाद देऊन नागपूरकरांनी शिस्तीचे अपूर्व दर्शन घडविले. कार्यक्रमस्थळी विविध ठिकाणी आयोजित केलेले पार्किंगचे स्लॉट सकाळीच भरल्या गेले. पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेऊन सूत्रबद्ध नियोजन, सुरक्षितता आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी मोबाईल व्हॅनद्वारे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे गर्दीवर कुणालाही न दुखावता नियंत्रण मिळवले. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आदरशील वर्तनातून गर्दीला एक दिशा दिली. 

कार्यक्रमासाठी दाखल होणाऱ्या भाविकांसाठी चहा, पिण्याचे पाणी, बिस्कीट, जुताघर, ई-रिक्षासेवा, वैद्यकीय सेवा आदी सुविधा लोकसहभागातून पुरविण्यात आल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत एक स्वतंत्र भव्य कक्ष उभारण्यात आला होता. लंगर व्यवस्थाही भक्कम असल्याने सुमारे दीड लाख लोक अवघ्या काही तासांत प्रसाद घेऊन शिस्तीने बाहेर पडले. जुताघर येथील सेवेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

00000








No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...