Thursday, November 6, 2025

 वृत्त क्रमांक 1166 

कुष्ठरोग शोध अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक संपन्न 

नांदेड, दि. 6 नोव्हेंबर : जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहिम 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक घरोघरी भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कुष्ठरोग शोध अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह समितीचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

या अभियानात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन संसर्गित रुग्ण ओळखणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे, तसेच कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढविणे या विषयांवर सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले. 

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या-जिल्हा व तालुका समन्वय समित्या-स्थापन करून त्यांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप निश्चित करण्यात आले. तसेच मोहिमेच्या पूर्वनियोजनातील क्रियाकलापांचा (प्रशिक्षण, प्रसिद्धी, सूक्ष्मकृती आराखडा इ.) आढावा घेण्यात आला. 

घरोघर सर्वेक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि औषधोपचार पुरवठा यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला. मोहिमेचे संनियंत्रण व पर्यवेक्षण प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी दिले. 

प्रत्येक स्तरावर वेळेत अहवाल सादर करण्यावरही भर देण्यात आला. या वेळी डॉ. संगीता देशमुख यांनी अभियानाची सविस्तर माहिती सादर केली व आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन साध्य करण्यासाठी हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी व्यक्त केला.

0000




No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...