Monday, September 29, 2025

वृत्त क्रमांक 1024 २८ सप्टेंबर 2025

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिवसांचे वेतन

महसूल व जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांचा निर्णय

नांदेड, २८ सप्टेंबर:- ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातील महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना (जिल्हा नांदेड), महाराष्ट्र राज्य तलाठी संघ (राज्यस्तरावरून) तसेच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना (जिल्हा) यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच जिल्हा परिषद, नांदेड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बाधितांना मदत म्हणून एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सदर जमा होणारा निधी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली आहे.



 

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...