Wednesday, July 2, 2025

 वृत्त क्र. 685

नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या 
मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई
 
नांदेड, दि. 2 जुलै :- शहरातील विविध भागातील औषधी दुकानांच्या तपासणी करून अशा औषधांची, गोळयांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नुकतेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. नांदेड शहरात दाखल झालेल्या पथकाने 25 व 26 जून रोजी शहरातील विविध भागातील मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली आहे. नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नांदेड येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या कार्यवाहीत एकूण 13 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 दुकानामध्ये नशेच्या औषधांची, गोळयाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. इतर 9 मेडिकल स्टोअर्सकडे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 मधील नियम 65 नुसार त्रुटी आढळून आलेल्या आहेत. उर्वरित 2 मेडिकल स्टोअर्सकडे तपासणी दरम्यान सर्वसाधारण जुटी आढळलेल्या आहेत.

कोटा राजस्थानच्या धर्तीवर नांदेड शहर हे शैक्षणिक हब तयार झाले असून याठिकाणी राज्यातून तसेच पराज्यातून मुले शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तवास आहेत. अशा मुलांना मेडिकल स्टोअर्सवरून नशेच्या औषधांची व गोळयाची सहज उपलब्ध होत असल्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन भवन येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नमूद केले होते. त्यामुळे तरुणपिढी नशेच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे चिंता व्यक्ती केली होती. 

सहायक आयुक्त (औषधे) नांदेड यांनी नांदेड कार्यालयात औषध निरीक्षकाची मंजूर पदे रिक्त असल्याने  सहआयुक्त (औषधे) (छत्रपती संभाजीनगर विभाग) छत्रपती संभाजीनगर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून नशेच्या औषधी, गोळयाची विक्री करणाऱ्या औषधी विक्री दुकानांविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून (छत्रपती संभाजीनगर,जालना,लातूर,हिंगोली) औषध निरीक्षक नांदेड येथे पाठविण्यात यावेत अशी विनंती केली आहे. 

नशेच्या औषधी / गोळयांची विक्री करणाऱ्या तसेच गंभीर स्वरूपांच्या त्रुटी आढळून आलेल्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध (दोषीविरूद्ध) औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमातील तरतूदीनुसार कारवाई घेण्यात येत आहे. यापुढे नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूध्द कारवाई घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी दिली. 

0000 

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...